Grape Farming : कमी खर्चिक ठिबक तंत्रातून द्राक्षशेती झाली सुकर

Success Story of Grape Farmer : राज्याला परिचित जुन्या पिढीचे प्रगतिशील शेतकरी जगन्नाथ मस्के (निमणी, जि. सांगली) यांची नवनाथ व जालिंदर ही मुले वडिलांचा द्राक्षशेतीचा वारसा धडाडीने यशस्वी पुढे नेत आहेत. सुमारे १६ एकर द्राक्षशेतीत कमी खर्चिक स्वयंचलित ठिबक सिंचन तंत्रज्ञान त्यांनी वापरले आहे.
Grape Farming
Grape FarmingAgrowon

Grape Agriculture Technology : सांगली जिल्ह्यातील तासगाव हा द्राक्ष शेतीत आघाडीचा तालुका आहे. कै. गणपतराव म्हेत्रे, कै. वसंतराव आर्वे यांच्यासह दिग्गज बागायतदारांचे द्राक्ष शेतीत मोठे योगदान आहे. याच तालुक्यातील नेहरूनगर (निमणी) गाव परिसरात सुमारे एक हजार एकर द्राक्ष शेती विस्तारली आहे.

गावातील जुन्या पिढीचे प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी म्हणून जगन्नाथ मस्के (बापू) यांचे नाव राज्याला परिचित आहे. महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पाहिली. त्या काळात द्राक्षाचे नवे वाण, तंत्रज्ञान यांचा प्रसार करण्यात त्यांचे योगदान आहे,

शेतीनिष्ठ व कृषिभूषण हे पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. वयाच्या ८० व्या वर्षीही शेतीतील त्यांची धडपड सुरूच असते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली थोरले चिरंजीव नवनाथ, त्यांची पत्नी निशा, धाकटे चिरंजीव जालिंदर, त्यांची पत्नी सौ. प्रिया द्राक्षशेतीचा वारसा धडाडीने पुढे चालवत आहेत.

द्राक्षशेती वृध्दीचे प्रयत्न

मस्के यांची १९७० च्या सुमारास दोन एकर द्राक्ष लागवड होती. क्षेत्र वाढवत आजमितीस द्राक्षाचे क्षेत्र आज ४० एकरांपर्यंत आहे. एकूण शेती ७० एकरांच्या आसपास आहे. द्राक्षात ज्योती, फ्लेम, सुपर सोनाका, एसएसएन, माणिक चमन आदी व्हाइट व रंगीत वाण आहेत.

पाण्याची कमतरता असल्याने १९८५ च्या सुमारास चार शेतकऱ्यांनी एकत्र येऊन १४ किलोमीटरवरून कृष्णा नदीचे पाणी पाइपलाइनद्वारे शेतात आणले. त्यासाठी ५० लाख रुपये खर्च आला.

मस्के यांच्या वाट्याला त्यातील १३ लाख रुपये आले. त्या काळात बापू यांनी कॅलिफोर्नियातील द्राक्ष पिकावरील पुस्तकाचे अखंड वाचन करून ज्ञानवृध्दी केली. दिल्ली, चेन्नई, कोलकता तसेच विविध कृषी विद्यापीठांत जाऊनही माहिती घेतली.

Grape Farming
Grape Farming : दुष्काळात शून्यातून उभारले वैभव

ठिबक सिंचनाचा अभ्यास

सन १९९१ मध्ये एका कंपनीचे ठिबक सिंचन तंत्रज्ञान बाजारात आले. त्यावेळी मस्के यांनी आपल्या दहा एकरांत त्याचा वापर केला. त्यातील अभ्यास वाढल गेला, महत्त्व पटू लागले तसे ठिबकखालील क्षेत्रही वाढवले. त्यातून पाण्याचा वापर अधिक काटेकोर होत त्याची बचतही होऊ लागली.

सन २०१० पासून कमी खर्चात स्वयंचलित ठिबक सिंचन तंत्रज्ञान कसे वापरता येईल याचा अभ्यास सुरु केला. त्यासाठी या क्षेत्रातील प्रत्येक कंपनीबरोबर चर्चा सुरु झाली. एकूण विचार करता दहा लाखांपासून ते २० ते २५ लाख रुपयांचा खर्च येत असल्याचे पुढे आले. अशावेळी सांगली जिल्ह्यातील एका ‘सॉफ्टवेअर इंजिनिअर’ने ठिबक सिंचनातील ‘सॉफ्टवेअर’ तयार केल्याची माहिती मित्र राहुल तेली यांनी दिली.

मस्के यांनी या तंत्रज्ञानाचा पूर्ण अभ्यास केला. बारकावे पाहिले. त्यानंतर आपल्या बागेत ती उभारण्याचा निर्णय घेतला. सन २०१६ मध्ये सुमारे चौदा एकरांत ही प्रणाली त्यांनी बसवली. त्यासाठी केवळ अडीच ते तीन लाख रुपये खर्च आला. आजगायत या प्रणालीच कार्य यशस्वीपणे सुरू असून त्यामुळे वेळ, पैसा, मजुरी याच मोठी बचत होऊन कामे सुकर होत आहेत.

Grape Farming
Grape Farming : म्हेत्रे घेताहेत निर्यातक्षम रंगीत द्राक्षांचे उत्पादन

कमी खर्चिक स्वयंचलित ठिबक प्रणालीची वैशिष्ट्ये

''सॉफ्टवेअर’ हाताळणीस सोपे. सन २०१६ च्या काळात त्यासाठी केवळ तीन लाखांपर्यंत खर्च आला.

त्यास ‘प्रोग्रॅमिंग’ केल्यानुसार पाणी, खते आपल्या गरजेनुसार देता येतात.

इंटरनेटची गरज नाही. मोबाईलमधील संदेशाच्या वापरानुसार कार्य. त्यामुळे देशात कोणत्याही ठिकाणाहून त्याचा वापर शक्य.

''मास्टर कंट्रोल पॅनेल’ला मोबाईलद्वारे मेसेज येतो. त्यानुसार प्रणाली सुरु-बंद करता येते.

तीन इंची व एक इंची असे मिळून एकूण सात व्हॉल्व्हज. २४ व्होल्ट करंटद्वारे त्यांचे कार्य.

प्रति ड्रिपर चार लिटर विसर्ग क्षमतेचा. प्रति वेलीला पाच ड्रिपर. दोन ड्रिपरमधील अंतर एक फूट.

पाण्याचा विसर्ग समप्रमाणात.

वाफसा व हंगामानुसार पाण्याचा विसर्ग. उदा. प्रति तास २० ते ४० लिटर.

या प्रणालीमुळे भारनियमनाच्या काळात दिवसा-रात्री केव्हाही पाणी देणे शक्य.

खते व पाणी वापरात ३० ते ५० टक्के बचत.

काही कंपन्यांच्या या तंत्रज्ञानात मोटरजवळ सर्व व्हॉल्व्हज आणावे लागतात. त्यामुळे वायर्स व पाईपचा खर्च वाढतो. या तंत्रज्ञानात तशी गरज नसल्याने हा खर्च वाचला आहे.

विहिरीतील पाणी संपल्यानंतर मोटर आपोआप बंद होते. पाण्याची पातळी वाढल्यानंतर पुन्हा मोटर सुरू होऊन दिलेला ‘प्रोग्रॅम’ पुन्हा सुरू होतो.

प्री कुलिंग, शीतगृहाची उभारणी

द्राक्षशेतीत दरांची जोखीम मोठी असते. तासगाव तालुक्यात द्राक्षाचे क्षेत्र मोठे व निर्यातही तशीच असल्याने शेतकऱ्यांना द्राक्षे साठवण्यासाठी तंत्रज्ञानाची गरज होती. त्या दृष्टीने मस्के यांनी पाच वर्षांपूर्वी माऊली प्री कुलिंग व शीतगृह उभारले. कोरोना काळात त्याचा फायदा झालाच. शिवाय सध्याही दर कमी असण्याच्या काळात हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरते आहे.

त्यातून दीडपट ते दुप्पटीपर्यंत दर अधिक मिळाला आहे. मस्के स्वतःसाठी त्याचा वापर करतातच. पण एका निर्यातदार कंपनीला तसेच अन्य बागायतदारांनाही ते भाडेतत्वावर दिले जाते. प्रति किलो साडेपाच रुपये असा त्याचा दर आहे. त्यासाठी चार कोटी रुपये गुंतवणूक करावी लागली. त्याची एकूण क्षमता १३० टन असून पैकी प्री कुलिंग क्षमता १६ ते १८ टन आहे. मस्के यांचे एकरी द्राक्ष उत्पादन १२ ते १४ टन आहे. त्यांच्या मालास प्रति किलो ५० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत दर मिळतो.

अलीकडील काळात द्राक्ष शेतीतील धोके वाढले आहेत. डिसेंबरमध्ये झालेल्या पावसाने द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे मस्के यांनी द्राक्षाचे क्षेत्र कमी करून ते ऊस शेतीकडे वळविले आहे. सध्या १० ते १५ एकर ऊस आहे. लागवडीसाठी सहा फूट सरी, आठ फूट सरी यासह नवे वाण, तंत्रज्ञानाचा वापर करीत असल्याचे जालिंदर यांनी सांगितले.

जालिंदर मस्के ७९७२७५४२०७, ९४२३८७००६७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com