Agrowon Climate Change Conference Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Anniversary 2024 : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे काटेकोर शेती हाच पर्याय

Team Agrowon

Pune News : हवामान बदलामुळे शेतीत उद्‍भवणाऱ्या समस्यांचा सामना करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे काटेकोर शेतीची संकल्पना प्रभावीपणे स्वीकारावी लागेल. त्यातून कमी खर्चात सिंचन, अन्नद्रव्यांसह कीड, रोगाचे प्रभावी व्यवस्थापन साधत उत्पादन वाढविणे शक्य होईल, असा सूर हवामान बदल परिषदेत शनिवारी (ता. २०) व्यक्त करण्यात आला.

‘ॲग्रोवन’च्या एकोणिसाव्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित हवामान बदल परिषदेत ‘हवामान अनुकूल शेतीचे प्रारूप’ या विषयावरील गटचर्चेत मंथन झाले. चर्चेत महाधन ॲग्रीटेक लिमिटेडचे मुख्य कार्यपालन अधिकारी नरेश देशमुख, बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे प्रमुख तुषार जाधव तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार सहभागी झाले होते.

उत्पादनवाढीचे मोठे आव्हान

श्री. देशमुख म्हणाले, की देशाची लोकसंख्या २०५० पर्यंत दीडशे कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. मात्र पीक लागवडीयोग्य क्षेत्र वाढणार नाही. एकीकडे हवामान बदलाची संकटे वाढतील. अशा स्थितीत उत्पादनवाढीचे मोठे आव्हान देशासमोर उभे राहील. खत उद्योगात मी तीन दशकांपासून कार्यरत आहे. दुर्दैवाने देशात अद्यापही रासायनिक खतांचा संतुलित वापर होत नाही.

पिकाला दिलेल्या खतमात्रेपैकी ३० ते ४० टक्केच लागू पडते व इतर वाया जाते आहे. नत्र, स्फुरद, पालाश वापराचे सूत्रदेखील विस्कळीत झाले आहे. त्यामुळे विविध कीड-रोगांना पिके बळी पडत आहेत. परिणामी, काटेकोर शेती अपरिहार्य झालेली आहे. यामुळे सिंचन, अन्नद्रव्य व कीड, रोग यांत एकात्मिक व्यवस्थापन पद्धत आणणे, हवामान बदलास अनुकूल बियाणे वापरण्यास चालना मिळू शकते.

काटेकोर शेतीची प्रारूपे उपयुक्त ठरतील

डॉ. गोरंटीवार म्हणाले, की जैविक व अजैविक ताण यांचा अभ्यास करीत वातावरण बदलास सुसंगत ठरणारे शेती तंत्रज्ञान आणावे लागेल. गेल्या १०० वर्षांत १.२ अंश सेल्सिअने तापमानात वाढ झाली आहे. त्यातून शेती व्यवस्थेत अनेक बदल झाले आहेत. मात्र हेच तापमान यापुढे अजून २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढण्याचे भाकित आहे.

त्यामुळे आपल्याला गांभीर्यपूर्वक विचार करून हवामान बदलास अनुकूल अशा काटेकोर शेतीची विविध प्रारूपे तयार करावी लागतील. काटेकोर शेतीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून मौलिक संशोधन सुरू आहे. त्यात माती, हवामान, पीक संरचना आणि व्यवस्थापन पद्धत आधारित काटेकाेर शेतीची तंत्रांचा समावेश आहे.

कमी खर्चात अधिक उत्पादन शक्य ः

शेतीमधील कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी श्री. जाधव म्हणाले, की कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना आणण्यासाठी मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड विद्यापीठ, ॲग्री पायलट आणि बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या चार नामांकित संस्था एकत्र आलेल्या आहेत. या संस्थांमार्फत बारामती कृषी विज्ञान केंद्रात राबविलेले प्रयोग यशस्वी झाले आहेत.

त्यामुळे राज्यातील शेतकरी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे कमी खर्चात अधिक उत्पादनाची शेती करू शकतील. यात उपग्रह, संवेदके, हवामान केंद्रांचा वापर होत असल्यामुळे पीक उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत वाढ शक्य आहे. कमी पाणी, कमी अन्नद्रव्यांत जास्त ऊस उत्पादन व जादा साखर उतारा मिळवून देणारी ऊस शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT