Chhatrapati Sambhajinagar Rain Pachod : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड परिसरात मंगळवारी (ता. २०) दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु झाला. यामध्ये फळबागासह कच्ची घरे, विजेचे खांब, विविध झाडे, शेडनेट उध्वस्त झाल्याची घटना घडली. सुदैवाने ही घटना दिवसा घडल्याने मोठा अनर्थ टळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
पाचोड परिसरातील वडजी, थेरगाव, लिंबगाव, हर्षी शिवारात अचानक दुपारी चार वाजेच्या सुमारास चक्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरवात झाली. शेतात असलेल्या बहुतांश मोसंबीच्या झाडांच्या फांद्या तुटल्या तर पपई, आंबा, डाळिंब, या फळबागासह लिंब, बाभूळीचे झाडे तुटून तर काही उन्मळून घरावर, रस्त्यावर पडली. वादळी वाऱ्यामुळे कच्ची पत्र्याची घरे भुईसपाट झाली.
शेकडो घरांवरील पत्रे उडून गेली. घरात बसलेल्यांना काही कळण्यापूर्वीच हे निसर्ग संकट ओढवले गेले. शेतातील अनेक विजेचे खांब आणि तारा तुटल्या. बहुतांश ठिकाणी आडवे पडलेल्या झाडांमुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबली. परंतु जेसीबी आणून रस्त्यावरील झाडे, विजेचे खांब बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. विजेचे खांब पडल्याने काही काळ परिसरातील गावाचा विद्युत पुरवठा खंडित झाला.
शेतावर गेलेले शेतकरी, शेतमजूर वादळ, मुसळधार पाऊस पाहून भांबावले. सर्वत्र अर्धा तास जोरदार झालेल्या पावसामुळे जमिनीतील उष्णता निघून गारवा पसरला. शेतावर गेलेल्यांनी बचावासाठी निंब, बाभूळ आदी विविध झाडांचा आश्रय घेतला, शेकडो झाडे अर्ध्यातून तुटली. तर काही उन्मळून पडली. मात्र नशीब बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नाही. शेतातील कुटुंब सर्वत्र सैरभैर झाले.
मोसंबीच्या बागासह डाळिंब, पपईच्या बागा, उन्हाळी बाजरीचे पीक उध्वस्त झाले. तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत आहे. वडजी येथील कृष्णा भांड व अशोक भांड यांच्या डाळिंबाच्या बागा भुईसपाट झाल्या, तर शाळेवरील पत्रे उडून गेल्याने शाळा उघड्यावर पडली. थेरगाव येथील सोमा निर्मळ व शरद निर्मळ यांच्या शेतातील शेडनेट, त्यातील टोमॅटो व केळीचे पीक भुईसपाट झाले. तर बाळू रामराव बांगर याच्या घरावरील पत्रे उडून गेली. घरावर निंबाचे झाड कोसळल्याने पूर्णतः कोसळले.
वडजीचे सरपंच भाऊसाहेब गोजरे, डॉ. बाबासाहेब गोजरे, बाबुतात्या गोजरे, महेश झरकर, थेरगावचे बाळू बांगर, हर्षीचे डॉ. गणेश राऊत, कृष्णा आंगळे आदींनी तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.