
Kharif Onion Cultivation Khandesh : खानदेशात खरिपातील कांद्याची लागवड १५ ते १८ हजार हेक्टरवर अपेक्षित आहे. उन्हाळ कांदा लागवड जळगाव जिल्ह्यात सुमारे १२ हजार हेक्टरवर होती. तर धुळ्यात सुमारे २० हजार हेक्टरवर उन्हाळ कांदा होता. या तुलनेत खरिपातील कांदा पीक कमी राहील. कांदा लागवड मुबलक जलसाठ्यांच्या भागात स्थिर राहील. तर दुष्काळप्रवण क्षेत्रात लागवड कमी होईल, अशी स्थिती आहे.
कारण पावसाबाबत कुठलीही निश्चित स्थिती नसते. धुळे, शिंदखेडा भागात लागवड घटेल. परंतु धुळ्यातील साक्रीत लागवड स्थिर राहील. धुळे जिल्ह्यात खरीप हंगामातील कांद्याची सात ते आठ हजार हेक्टरवर लागवड केली जाते. एकट्या साक्री तालुक्यातील लागवड सुमारे तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर असते.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, चाळीसगाव, धरणगाव, जामनेर या भागात कांदा लागवड स्थिर राहू शकते. तर नंदुरबारमधील शहादा, नवापूर, नंदुरबार भागात कांदा लागवड फारशी वाढणार नाही, असे दिसते. कांद्याचे दर सध्या अस्थिर आहेत. काही शेतकऱ्यांना चांगले उत्पादन आले. तसेच दरही सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल, असे मिळाले. कापूस पिकात नुकसान येत असल्याने अनेक शेतकरी कापूस लागवड कमी करून कांदा पीक घेण्याची तयारी करीत आहेत.
कांदा लागवडीसाठी बियाणे खरेदी सुरू आहे. अनेकांनी कृषी केंद्रांतून बियाणे खरेदी केले आहे. तर काही शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांकडून कांदा बियाणे खरेदी केले आहे. पुढे कांदा रोपांचे दरही स्थिर राहतील. लागवडीचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपापल्या कांदा रोपवाटिका निर्मितीवर भर दिला आहे. अनेकांनी व्यावसायिक रोपवाटिका तयार केल्या असून, त्यातील रोपांची विक्री केली जाईल, असे सांगण्यात आले.
कांदा रोपवाटिका जळगावातील धरणगाव, चोपडा, यावल, धुळ्यातील साक्री, धुळे, नंदुरबारमधील शहादा भागात तयार करण्यास या आठवड्यात सुरुवात झाली आहे. यंदा किमान १५० हेक्टरवर कांदा रोपवाटिका खानदेशात राहतील, असाही अंदाज आहे.
कांदा रोपवाटिकांची निर्मिती पावसाळ्यात किंवा पाऊस सुरू झाल्यानंतर केल्यास त्यात कमीअधिक पावसाने नुकसानीची भीती असते. यामुळे शेतकरी याच आठवड्यात रोपवाटिकांत बियाणे पेरणीचे नियोजन करीत आहेत. पाऊस सुरू होण्यापूर्वी रोप तरारल्यास पुढे त्याचे कमी व अधिक पावसात नुकसान फारसे होत नाही, असे शेतकरी मानतात. तसेच लागवडदेखील आगाप करता येईल. रोपवाटिकांमध्ये ठिबक, मिनी स्प्रिंकलरच्या मदतीने सिंचन केले जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.