Unseasonal Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : मॉन्सूनपूर्व पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा

Team Agrowon

Pune News : पुणे आणि परिसरामध्ये मंगळवारी (ता.१६) सायंकाळी सहा वाजता वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटांसह पावसाने चांगलाच तडाखा दिला. काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. पुणे शहर, बाणेर, बालेवाडी, सिंहगडरस्ता, लोहगाव, पिंगळे गुरव, यांसह अन्य भागांतही पाऊस झाला. भोर, खेड, वेल्हे या तालुक्यांतही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांची मात्र चांगलीच धावपळ झाली.

पुणे जिल्ह्यात मंगळवारी दुपारपासूनच हवेत प्रचंड उकाडा होता. शहरातील बहुतांश भागातील तापमान हे ४० अंश सेल्सिअसच्या पुढेच होते. त्यामुळे दिवसभर उन्हाचा तडाखा असल्यामुळे नागरिक हैराण झाले होते.

मात्र, सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमाराला वादळ, वारे आणि विजांच्या गडगडाटाला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाच्या हलक्या सरी पडायला सुरुवात झाली. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही काळ दिलासाही मिळाला.

भोर तालुक्यात विसगाव खोऱ्यात सायंकाळी पाचच्या सुमारास सायंकाळी विजांच्या गडगडाटांसह पाऊस झाला. काढणीस आलेले कांदा, ज्वारी व काढून ठेवलेले पीक भिजून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

वीसगाव खोऱ्यातील धावडी, राऊतवाडी, भाबवडी, पोळवाडी, फडतरवाडी, थोपटेवाडी, गोकवडी, खानापूर, उत्रौली या भागांत ज्वारी, कांदा काढणीला वेग आला आहे. पावसामुळे शेतात पाणी साठल्याने काढलेल्या ज्वारीचा दाणा काळा पडण्याची शक्यता आहे.

तसेच कांदा खराब होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे सध्या सुरू असलेल्या ज्वारी पिकाची कापणी केलेला कडबा भिजून शेतात पाणी साचल्याने कांदा, ज्वारी खराब होऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्याचेही नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील बळीराजा काकुळतीला आला आहे. गेल्या वर्षी पावसाने अत्यल्प हजेरी लावल्याने खरिपाचे पीक परिपूर्णपणे हाती आले नाही. तर रब्बीत सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजाला मरकळ, धानोरे, सोळू, वाडा, केळगाव, चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे परिसरांतील बळीराजाने उन्हाळी हंगामातील बाजरी भुईमूग व इतर पिके घेतली आहेत.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणाबरोबच अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तसेच अंतिम टप्प्यात काढणी सुरू असलेल्या कांदा व ज्वारी पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून बळीराजाची धांदल उडाली आहे.

या पिकांचे झाले पावसामुळे नुकसान
- खेड भागात बाजरी जमीनदोस्त
- विटभट्ट्यांचे नुकसान
- राजगड परिसरात फळझाडांचे नुकसान
- जनावरांचा चारा भिजल्याने काही प्रमाणात नुकसान
- वाघोली परिसरात वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या, तर अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT