Poultry Health Management:
शेतकरी नियोजन । कुक्कुटपालन
शेतकरी : दादासाहेब जयवंतराव बेंद्रे
गाव : आंबळे, ता. शिरूर, पुणे
एकूण क्षेत्र : सात एकर
पोल्ट्री शेड : दहा गुंठे
ऊस पिकासाठी मी दरवर्षी दीड लाख रुपये खर्चून कोंबडी खताचा वापर करत असे. बाहेरून खत घेण्याऐवजी आपणच कोंबडीपालन सुरू केले तर ... या विचारातून पोल्ट्री व्यवसाय निवडला. सध्या माझ्या शेडमध्ये चार हजार १०० कोंबड्या आहेत. हा व्यवसाय शाश्वत उत्पन्नाचा मार्ग बनला आहे.
व्यवसायाचे स्वरूप :
सुरुवातीला हा व्यवसाय निवडताना अधिक माहितीसाठी मी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पोल्ट्री फार्मला भेटी दिल्या. व्यवसाय वाढविण्याचा उद्देश लक्षात घेऊन बारकावे समजून घेत ब्रॉयलर आणि लेयर अशा दोन्ही प्रकारची अधिक माहिती घेतली. त्या वेळी लागणारा खर्च, जागा, आर्थिक उलाढाल अशा बाबी लक्षात घेत अखेर ब्रॉयलर कुक्कुटपालनाचा निर्णय घेतला. माझ्याकडे ३० फूट बाय २०० फुटांचे शेड आहे. त्यासाठी सुमारे सात लाख २० हजार रुपयांचे कर्ज काढून व्यवसाय सुरू केला आहे. लहान पिलांच्या संगोपनापासून ते विक्रीपर्यंतचे व्यवस्थापन केले जाते.
व्यवसाय सुरू करताना आर्थिक अडचणी आल्या होत्या. त्या वेळी शेतीच्या उत्पन्नातून थोड्याफार रकमेची तजवीज केली. परंतु खर्च अधिक असल्याने बॅंकेकडून किमान सात लाख रुपयांचे कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला. त्यासाठी शेतीचा सातबारा उतारा तारण म्हणून ठेवल्यानंतर एक महिन्याच्या आत कर्ज मंजूर झाले होते.
ब्रॉयलर कोंबडीपालनासाठी एका खासगी कंपनीसोबत करार करून पिलांची खरेदी केल्यानंतर ३५ ते ४५ दिवसांपर्यंत संगोपन केले जाते. या कालावधीत योग्य ते लसीकरण केले जाते. त्यानंतर कंपनीला विक्री केली जाते. या कार्यकाळात कंपनीच्या एका व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन केले जाते.
सुरुवातीपासून कंपनी खाद्याचा पुरवठा करते. त्यानुसार योग्य ते नियोजन करून दिवसातून दोन वेळा खाद्य दिले जाते. त्यासाठी एक मजूर काम करतो. हा मजूर सर्व कामांचे योग्य नियोजन करतो. पाण्यासाठी कूपनलिकेची व्यवस्था केली. प्रयोगशाळेमध्ये पाण्याचा टीडीएस आणि हार्डनेस तपासला आहे. कोंबड्यांना त्याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थापन केले जाते. शेडमध्ये पाणीपुरवठ्यासाठी चार टाक्या बसविण्यात आल्या आहेत. त्या टाक्यांद्वारे स्वयंचलित निप्पल सिस्टीम पद्धतीने कोंबड्यांना थेट जागेवर पाणी पिण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सध्या एका वर्षात सहा लॉट घेतले जातात. एका वेळी लॉटला चार ते साडेचार हजार कोंबड्यांचे संगोपन केले जाते. एका लॉटसाठी ५ ते ४० हजार रुपयांचा खर्च येतो. खर्च वजा जाता प्रत्येक लॉटला ५० हजार रुपयांची उलाढाल होते. त्यामध्ये वाहतूक, खाद्य, मजूर, लाइट असा खर्च असतो. सध्या बाजारपेठेमध्ये मला सरासरी प्रति किलो सात रुपये दर मिळतो. कोंबडी खत चांगल्या प्रतीचे मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्याकडून मागणी असते. वर्षभराच्या कालावधीत साधारणपणे ६० हजार रुपयांची खत विक्री होते. त्यातील काही खत घरच्या शेतीमध्ये वापरतो.
सध्याच्या काळातील कामे
ऊन वाढत असल्याकारणाने शेडच्या कडेने सावलीसाठी वेल लावले आहेत.
पत्रे गरम होऊ नये यासाठी पत्र्यावर पाणी फवारणी यंत्र बसवले आहे.
सध्या दहा दिवसांची पिले असल्याने त्यांचे काटेकोर व्यवस्थापन.
शिफारशीनुसार लसीकरणावर लक्ष.
कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीच्या मार्गदर्शनानुसार वाढीच्या टप्यात खाद्य, आरोग्य व्यवस्थापन.
दादासाहेब बेंद्रे ९८५०१७५०१२
(शब्दांकन : संदीप नवले)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.