Pomegranate Agrowon
ॲग्रो विशेष

Climate Change : बदलत्या वातावरणाचा देशातील डाळिंबाला फटका

Pomegranate Damage : डाळिंब उत्पादक राज्यांत अति पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका अंबिया बहरातील डाळिंबाला बसला आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : डाळिंब उत्पादक राज्यांत अति पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका अंबिया बहरातील डाळिंबाला बसला आहे. डाळिंब पट्ट्यातील ज्या भागात अति पाऊस झाला आहे, अशा भागात तेलकट डाग रोग व फळकुजीचा १५ ते २० टक्के प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे डाळिंब बागा धोक्यात आल्या आहेत.

देशात सर्वसाधारणपणे अंबिया बहरातील डाळिंबाचे क्षेत्र ६० ते ७० हजार हेक्टर असते. परंतु गेल्या तीन वर्षांपासून काही प्रमाणात नैसर्गिक आपत्तीमुळे या बहरातील डाळिंबाचे नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांनी या बहरातील क्षेत्र कमी केले असल्याचे डाळिंब संघाने सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रासह, डाळिंब उत्पादन घेणाऱ्या इतर राज्यात पाणी टंचाईचा फटका अंबिया बहरातील डाळिंबाला बसला आहे. त्यामुळे या बहरात शेतकऱ्यांनी ४५ हजार हेक्टरवर डाळिंब साधले आहे.

पाणीटंचाईची झळ कमी झाली नसल्याने ऐन फुलोरावस्थेत डाळिंबाला फटका बसला. बागा सेटिंग होण्याच्या काळात पोषक वातावरण नसल्याने कळी निघण्यास अडचणी आल्या. त्यामुळे सुमारे ५० टक्के फूलगळ झाली. मात्र शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत पाणी उपलब्ध करून डाळिंबाच्या बागा फुलविल्या आहेत. सुमारे १५० ते २०० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाची फळे झाडाला लगडली. पुढच्या महिन्यापासून या बहरातील डाळिंबाची विक्री सुरू, असा अंदाज डाळिंब उत्पादकांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, डाळिंब उत्पादकांवर संकटाची मालिका संपण्याचे चित्र नाही. मे-जूनमध्ये राज्यासह अन्य डाळिंब पट्ट्यात अति पाऊस झाला. पावसाचे पाणी बागेत साचले. वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. कधी उष्णता, कधी ढगाळ वातावरणाचा फटका डाळिंबाला बसत आहे. बदलते तापमान, आर्द्रता यांचा परिणाम होत आहे. त्यामुळे तेलकट डाग रोग आणि फळकुजीसारख्या समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

कमी पाण्याचा डाळिंबाला फटका

अंबिया बहार मार्चपर्यंत धरला जातो. त्यानंतर एप्रिल-मेमध्ये फुलोरावस्थेत बागा येतात. परंतु या दरम्यान, पाण्याची टंचाई असल्याने फूलगळ झालीच आहे. त्याचबरोबर पाणी कमी पडल्याने फळांच्या आकार वाढीलाही फटका बसला आहे. त्यामुळे फळाची सुरवातीलाच अपेक्षित वाढ झाली नसल्याने उत्पादनही कमी होण्याची शक्यता आहे.

आगाप बहरातील काढणी सुरू

शाश्वत पाण्याची उपलब्धता आहे, अशा शेतकऱ्यांनी आगाप अंबिया बहार धरला आहे. मुळात पाण्याची कमतरता हंगाम धरल्यानंतर भासू शकते. त्यामुळे आगाप अंबिया धरण्याचे प्रमाण फारच कमी असते. सध्या या बहरातील डाळिंबाची विक्री सुरू झाली आहे. डाळिंबाला प्रतवारीनुसार ७० रुपयांपासून १२५ रुपयांपर्यंत प्रति किलो असा दर मिळत आहे. सध्या बाजारात डाळिंबाची आवक कमी असल्याने दर चांगले आहेत.

शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत डाळिंब बहार साधला. परंतु पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे डाळिंबावर तेलकट डाग रोग, फळकूज आदी विविध समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे पाणी टंचाईबरोबरच आता हे दुसरे संकट ओढावले आहे. त्यामुळे शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे.
प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT