Agriculture Plowing Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Plowing : नांगरटीची वेळ, खोली अन् फायदे

डॉ. आदिनाथ ताकटे 

Indian Agriculture : जमिनीमध्ये पीक चांगले येण्याकरिता त्या जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी जमिनीची मशागत अत्यंत महत्त्वाची आहे. कोणत्याही पिकाच्या लागवडीपूर्वी पूर्वमशागत करणे आवश्यक असते. पूर्वमशागतीमध्ये नांगरट, कुळवणी, ढेकळे फोडणे किंवा वखरणे, सपाटीकरण, खत मिसळणे, सरी काढणे,

बांधबदिस्ती करणे इत्यादी कामांचा समावेश होतो. त्यापैकी नांगरट ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. प्रत्येक जमिनीची दरवर्षी नांगरट करावी असे नाही. कारण, जमीन आणि आपण घेणाऱ्या पिकाच्या गरजेनुसार मशागत करण्याची गरज असते. त्यासाठी संबंधित जमिनीवरील मागील पीक, आगामी पीक, जमिनीचा प्रकार आणि हवामान इत्यादी बाबींवर नांगरट अवलंबून असते.

नांगरटीची वेळ, खोली

आधीचे पीक काढल्यानंतर लगेच नांगरट करणे फायदेशीर ठरते. कारण त्या वेळी जमिनीत ओलावा असल्याने नांगरटीचे काम हलके होते. ढेकळे निघत नाहीत आणि नांगरट खोल होते. तसेच आधीच्या पिकाचे अवशेष, पालापाचोळा, काडीकचरा जमिनीत गाडला जातो. जमिनीस सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा होतो.

रब्बी-उन्हाळी हंगामातील पिके काढल्यानंतर म्हणजेच सर्वसाधारणपणे मार्च–एप्रिल महिन्यांत त्वरित नांगरणी करावी. हलक्या जमिनी पीक काढण्याच्या वेळी घट्ट होतात म्हणून एप्रिल किंवा मे महिन्यांत वळवाचा पाऊस पडल्यानंतर किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला पहिला पाऊस पडल्यानंतरच नांगराव्यात.

नांगरट उतारास आडवी करावी. नांगराचे तास उतारास आडवे असल्याने पाणी सावकाश थबकत उताराच्या दिशेने पुढे जाते. त्यामुळे जमिनीत अधिक पाणी मुरायला वेळ मिळतो. पाण्याच्या प्रवाहाचा वेग मंदावल्याने मातीचे बारीक कण पाण्याबरोबर वाहून जात नाहीत. जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते.

जमिनीची नांगरट ही प्रामुख्याने जमिनीचा प्रकार, जमिनीचा उतार, तणांचा प्रकार व प्रादुर्भाव, स्थानिक हवामान, आगामी पीक नियोजन या सर्व बाबींचा विचार करून नांगरटीची खोल ठरवावी.

खोल मुळे जाणाऱ्या पिकांकरीता खोल नांगरट तर उथळ मुळ्याच्या पिकांसाठी उथळ नांगरणी करणे जरूरीचे आहे. दरवर्षी एकाच खोलीवर नांगरट करू नये. कारण त्यामुळे जमिनीमध्ये ठरावीक खोलीवर एक टणक, घट्ट थर तयार होतो. अशा थरात पिकाच्या मुळ्यांना शिरकाव करता येत नाही. तसेच अशा थरातून पाणी मुरण्यास आणि निचरा होण्यास वेळ लागतो.

हंगामात घ्यावयाच्या पिकानुसार, नांगरटीची खोली ठरवावी. सर्वसाधारणपणे ऊस, बटाटा, आले, भाजीपाला इत्यांदी पिकांसाठी जमिनीची १५ ते २० सेंमी खोल नांगरट करणे आवश्यक आहे. ज्वारी, बाजरी, गहू, भुईमुग या पिकांसाठी १० ते १५ सेंमी खोल नांगरट करावी.

प्रत्येक जमिनीची दरवर्षी नांगरट करावी असे नाही. कारण, जमिनीच्या आणि पिकाच्या गरजेनुसार मशागत करण्याची गरज असते. नांगरट ही त्या जमिनीवरील मागील पीक, आगामी पीक, जमिनीचा प्रकार आणि हवामान इत्यादीवर अवलंबून असते.

ज्या जमिनीत हराळी, कुंदा, लव्हाळा यासारख्या खोल मुळे असलेल्या तणांचा उपद्रव नसेल तर अशा जमिनीत तीन वर्षांतून एकदा नांगरट करावी. तूर, कापूस, सूर्यफूल यासारख्या पिकांच्या मुळ्या, धसकटे जमिनीत खोलवर जातात. त्यामुळे कुळवाच्या पाळीने ही मुळे, धसकटे निघणे शक्य होत नाही. अशावेळी नांगरट अत्यावश्यक ठरते.

कोरडवाहू क्षेत्रातील नांगरट

कोरडवाहू भागातील जमिनी या काळ्या आणि भारी असतात. अशा जमिनीत चिकणमातीचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा जास्त असते. जमिनीची खोली ६० ते ९० सेंमीपर्यंत असते.

या जमिनीतील ओलीचे प्रमाण कमी होताच, भेगा पडण्यास सुरुवात होते. आणि जमीन कठीण बनते. अशा जमिनीची नांगरट प्रत्येक वर्षी केल्याने जमिनीच्या कण रचनेवर विपरीत परिणाम होतो. जमीन प्रमाणापेक्षा जास्त पोकळ राहते. ज्वारी, बाजरी यांसारख्या लहान आकाराचे बियाणे असलेल्या पिकांची उगवणशक्ती कमी होते. कारण बियाणे, माती आणि पाणी यांचा संपर्क तसेच जमिनीतील ओलावा आणि तापमानाचा एकत्रित परिणाम बियाणाच्या उगवणशक्तीवर होतो. म्हणून भारी, काळ्या जमिनीची तीन वर्षांतून एकदाच नांगरट करावी.

कोरडवाहू शेतीमध्ये ४५ सेंमी खोलीपर्यंतच्या जमिनीत तूर अथवा सूर्यफुलासारखी पिके घेतल्यानंतर पुढील हंगामापर्यंत जमिनी मोकळ्याच असतात. अशा जमिनीची नांगरट ही पिके निघताच जमिनीत ओल असेपर्यंत हिवाळी हंगामात पूर्ण करावी. म्हणजे काम जलद गतीने आणि कमी कष्टात होते. नांगरट उताराला आडवी करावी. जेणेकरून पावसाळी हंगामाच्या सुरुवातीला पडणारे पावसाचे पाणी या नांगरटीत पूर्ण मुरेल.

हलक्या जमिनीची नांगरट

हलक्या म्हणजे २५ ते ३० सेंमी आणि तांबड्या जमिनीमध्ये खोल नांगरट फायद्याची दिसून येते. कारण जमिनीच्या खालच्या थरातील कठीणपणा कमी केला जातो. त्यामुळे पाणी मुरण्याचा वेग वाढतो. आणि जास्त पाणी मुरते. हलक्या जमिनी पीक काढण्याच्या वेळी घट्ट होतात, म्हणून एप्रिल किंवा मे महिन्यात वळवाचा पावसानंतर किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला पहिला पाऊस पडल्यानंतर नांगरट करावी.

नांगरटीचे फायदे

जमीन भुसभुशीत होते. त्यामुळे पावसाचे व ओलिताचे पाणी जमिनीत सहज मुरते.

जमिनीत हवा खेळती राहते. पाण्याचा निचरा चांगला होतो.

मातीच्या थरांची उलथापालथ होऊन जमीन भुसभुशीत होते.

जमिनीत हवा खेळत राहते.

पीक अवशेष जमिनीत गाडले जाऊन जमिनीचे आरोग्य चांगले राहते.

जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन जलद होऊन पिकांना आवश्यक असलेली अन्नद्रव्ये मुक्त होतात. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची वाढ होते.

तणांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

खोल नांगरटीमुळे पिकांच्या मुळांची योग्य वाढ होऊन वेगवेगळ्या थरातील अन्नद्रव्ये पिकास उपलब्ध होतात.

मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

डॉ. आदिनाथ ताकटे,

९४०४०३२३८९

(मृदा शास्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT