Pre Cultivation Land : शाश्‍वत पद्धतीने जमिनीची पूर्वमशागत

Agriculture Land : योग्य प्रकारे नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जिरते, त्यामुळे जमिनीतील ओल टिकून राहते. त्याचा फायदा पिकाच्या वाढीसाठी होतो. जमीन ओली राहिल्याने सेंद्रिय पदार्थांचे विघटन लवकर होते, त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात.
Pre Cultivation Land
Pre Cultivation LandAgrowon

अक्षय इंझाळकर, डॉ. नंदकिशोर हिरवे

Indian Agriculture in Sustainable Manner : शेतीमध्ये जमिनीची उत्पादकता टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी या नैसर्गिक साधनसामग्रीचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. जमिनीमध्ये चांगले पीक येण्याकरिता, त्या जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी जमिनीच्या मशागतीस अनन्य साधारण महत्त्व आहे.

पूर्वमशागतीमध्ये नांगरट, कुळवणी, ढेकळे फोडणे किंवा वखरणे, सपाटीकरण, खत मिसळणे, सरी काढणे इत्यादी कामांचा समावेश होतो. प्रत्येक जमिनीची दरवर्षी नांगरट करावीच असे नाही. जमीन आणि आपण घेणाऱ्या पिकाच्या गरजेनुसार मशागत करण्याची गरज आहे. त्यासाठी शेतीमधील मागील पीक, पुढे घ्यावयाचे पीक, जमिनीचा प्रकार आणि हवामान इत्यादीवर अवलंबून असते.

Pre Cultivation Land
Indian Agriculture : स्वदेशी तंत्र हाच विकासाचा मंत्र

नांगरटीचे उद्देश साध्य होण्यासाठी, पूर्वीचे पीक काढल्याबरोबर लगेच नांगरट करणे फायद्याचे ठरते. कारण या वेळी जमिनीत ओलावा असल्याने नांगरटीचे काम हलके होते, ढेकळे निघत नाहीत, नांगरट खोलवर होते, पूर्वीच्या पिकाचा पालापाचोळा, काडीकचरा जमिनीत गाडला जातो.

जमिनीस सेंद्रिय पदार्थाचा पुरवठा होतो. रब्बी-उन्हाळी आणि हंगामातील पिके काढल्यानंतर म्हणजेच सर्वसाधारणपणे मार्च- एप्रिलमध्ये त्वरित नांगरणी करावी. हलक्या जमिनी पीक काढण्याच्या वेळी घट्ट होतात म्हणून एप्रिल किंवा मे महिन्यात वळवाचा पाऊस पडल्यानंतर किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला पहिला पाऊस पडल्यानंतर नांगरणी करावी.

हंगामात घ्यावयाच्या पिकानुसार, नांगरटीची खोली ठरवावी. सर्वसाधारणपणे ऊस, बटाटा, आले, भाजीपाला इत्यादी बागायती पिकांसाठी जमिनीची १५ ते २० सेंमी खोल नांगरट करणे आवश्यक आहे, ज्वारी, बाजरी, गहू, भुईमूग या पिकांसाठी जमीन १० ते १५ सेंमी, सोयाबीनसाठी १५ ते २० सेंमी, कपाशीसाठी २०ते २५ सेंमी जमीन खोल नांगरावी.

जमिनीचा भुसभुशीतपणा टिकून राहण्यासाठी कणांची रचना सुधारली पाहिजे. यासाठी सेंद्रिय खते म्हणजे शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर आवश्यक आहे. शेणखताच्या वापराने जलधारणशक्ती वाढते म्हणून पूर्वमशागतीच्या वेळी शेणखत जमिनीत मिसळले जाते.

Pre Cultivation Land
Agriculture Cultivated Land : खडकाळ प्रक्षेत्राचे लागवडयोग्य जमिनीमध्ये रूपांतर

खरीप आणि रब्बी पिके घेतल्यानंतर उन्हाळा सुरू होण्यापूर्वी जमीन नांगरून तापू द्यावी. उन्हाळ्यात ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान गेले, की १५ सेंमी खोलीपर्यंत जमिनीचे तापमान वाढते. अशा मशागतीमुळे जमिनीतील बुरशी बऱ्याच प्रमाणात नष्ट होते. ज्या किडी सुप्तावस्थेत किंवा कोषावस्थेत जातात त्या नष्ट होतात.

जमीन तापल्याने त्यातील नत्राचे प्रमाण सहा पट वाढते, शिवाय जमिनीची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी वाढते. जमिनीतील पोटॅश, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम यांची घनता वाढते.

नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जिरते, त्यामुळे जमिनीतील ओल टिकून राहते. त्याचा फायदा पिकाच्या वाढीसाठी होतो. जमीन ओली राहिल्याने सेंद्रिय पदार्थांचे विघटन लवकर होते, त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात.

फायदे

जमीन भुसभुशीत होते, त्यामुळे पाऊस, ओलिताचे पाणी जमिनीत सहज मुरते.

जमिनीत हवा खेळती राहते, पाण्याचा चांगला निचरा होतो.

थरांची उलथापालथ होते, जमीन भुसभुशीत होते.

हवा, पाणी आणि उष्णता जमिनीत योग्य प्रमाणात खेळती राहते.

पिकांचे अवशेष जमिनीत गाडले जाऊन जमिनीची प्राकृतिक, रासायनिक व जैविक अवस्था सुधारते. जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे विघटन जलदरीत्या होऊन पिकांना आवश्यक असणारी अन्नद्रव्ये मुक्त होतात. जमिनीतील जिवाणूंची वाढ होते.

खोल नांगरटीमुळे पिकांच्या मुळांची योग्य वाढ होऊन वेगवेगळ्या थरातील अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतात.

जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते.

अक्षय इंझाळकर, ९०२१६३७५७४

(विषयतज्ज्ञ (कृषिविद्या), कृषी विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे) ता. दारव्हा, जि. यवतमाळ)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com