डॉ. निशान पाटील
Sugarcane Farming Management : पारंपरिक पद्धतीने ऊस लागवडीसाठी वेळ, खर्च वाढत चालला आहे. हे लक्षात घेऊन यंत्राच्या साह्याने ऊस लागवड केल्यास या सर्व समस्या सोडविण्यास मदत होऊ शकते. यंत्रांच्या साहाय्याने ऊस लागवड करत असताना सरी पाडणे, तीन डोळ्यांचे बेणे तयार करणे, बेणे प्रक्रिया, बेणे सरीत मातीआड करणे, खते पेरून मातीआड करणे ही सर्व कामे एकाचवेळी ट्रॅक्टरच्या एकाच फेरीत पूर्ण होतात.
आकारमान आणि वजनानुसार अनुरूप ट्रॅक्टरला जोडणी करून हे यंत्र वापरता येते.
यंत्रावर ऊस हाताळणीसाठी शेतमजुरांना बसण्यासाठी खुर्चीची सोय असते.
यंत्राच्या तळाला रिजर आहेत, त्याच्या साहाय्याने सरी पाडली जाते. यंत्राच्यावर, पुढील बाजूस अखंड ऊस ठेवण्यासाठी स्टॅण्ड आहे.
ऊस तुकडे करण्यासाठी ब्लेड्स व बेणे प्रक्रियेसाठी ड्रम आहे. उसाच्या टिपऱ्या मातीआड करण्याची यंत्रणा आहे.तसेच, दाणेदार खतांसाठी स्वतंत्र पेटीची व्यवस्था असते.
दोन रिजरमधील अंतर हे उसाच्या दोन ओळींमध्ये किती अंतर ठेवायचे आहे, त्यानुसार बदलता येते.
सर्वप्रथम रिजरच्या साह्याने सरी पाडली जाते. उसाच्या टिपऱ्या करण्याच्या यंत्राला ट्रॅक्टरच्या पॉवर टेक ऑफ (पीटीओ) शाफ्टकडून गती मिळते. मजूर खुर्चीवर बसून, स्टॅण्डमध्ये उभे ठेवलेले ऊस हातात घेऊन तुकडे करण्याच्या यंत्राच्या छिद्रात ढकलतात. यंत्राच्या साह्याने बहुतांशी टिपऱ्या समान लांबीच्या मिळतात. उसाच्या टिपऱ्या होत असतानाच स्वतंत्र पिस्टन पंपाच्या साह्याने त्यावर रासायनिक बेणे प्रक्रिया केली जाते.
यंत्रातील रोलरच्या साह्याने टिपऱ्या बाहेर टाकल्या जातात. याचवेळी खतांचा बेसल डोस या यंत्राद्वारे देता येतो.
सध्या विविध कंपन्यांची एका ओळीची, दोन ओळींची, तसेच त्याहून जास्त ओळींची यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत. ओळींची संख्या जसजशी वाढत जाते, तसतसा लागवडीसाठी लागणारा वेळ आणखी कमी होतो.
साधारणतः ४५ व त्यापुढील अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरच्या साह्याने यंत्रे वापरता येतात. दोन ओळीच्या यंत्राच्या साह्याने ताशी ०.६ हेक्टर क्षेत्रावर लागवड करता येते. यंत्राच्या साह्याने ऊस लागवड केल्यास, पारंपारिक पद्धतीने ऊस लागवड करण्याच्या तुलनेत ४,००० ते ४,५०० रुपये कमी खर्च येतो.
अकुशल कामगार देखील थोड्याशा सरावाने हे यंत्र योग्यरीतीने हाताळू शकतो. दोन टिपऱ्यांमध्ये जादाचे अंतर हवे असल्यास ट्रॅक्टरची गती वाढवावी, अंतर कमी हवे असल्यास गती कमी करावी लागते. यंत्राला दिलेल्या चाकांच्या साह्याने बेणे लागवडीची खोली ठरवता येते. याप्रमाणे योग्य आणि एकसारख्या खोलीवर सर्व टिपऱ्यांची लागवड झाल्याने उगवण क्षमता सुधारते. लागवड केल्यानंतर लगेचच हलके पाणी द्यावे.
डॉ. निशान पाटील, ९०९६३३९५९५
(विभाग प्रमुख, कृषी अभियांत्रिकी विभाग, उद्यानविद्या महाविद्यालय, कडेगाव, जि.सांगली)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.