शेतकरी नियोजन
पीक ः डाळिंब
शेतकरी : पद्माकर भजनदास भोसले-पाटील
गाव : पापरी, ता. मोहोळ, जि. सोलापूर
एकूण क्षेत्र : ४३ एकर
डाळिंब क्षेत्र : ११ एकर
सोलापूर जिल्ह्यातील पापरी (ता. मोहोळ) येथे पद्माकर भोसले-पाटील यांची ४३ एकर शेती आहे. पद्माकर यांना रविराज आणि अमोल असे दोन भाऊ असून त्यांचे एकत्रित कुटुंब आहे. कुटुंबातील सर्व जण शेतीच करतात. एकत्रित कुटुंबाची शक्तीच खऱ्या अर्थाने शेतीतील प्रगतीचा महत्त्वाचा दुवा ठरल्याचे पद्माकर सांगतात.
त्यांनी ४३ एकरांपैकी ११ एकरांवर नव्याने डाळिंबाच्या भगवा वाणाची लागवड केली आहे. उर्वरित क्षेत्रावर साडेआठ एकरांत द्राक्ष, चार एकर ऊस याशिवाय कांदा, हरभरा, टोमॅटो, झेंडू, मका इत्यादी पिकांची लागवड आहे.
भोसले-पाटील कुटुंबीय आधीपासूनच डाळिंब शेतीमध्ये पारंगत होते. यापूर्वी त्यांची चार एकरांची डाळिंब लागवड होती. त्या वेळी योग्य नियोजनातून उत्पादित डाळिंबाची युरोपला निर्यात करत होते. डाळिंब बागेतील व्यवस्थापनाचा आधीचा अनुभव गाठीशी असल्यामुळे त्यांनी पुन्हा नव्याने सुमारे ११ एकरांवर लागवड करण्याचे ठरविले. त्यानुसार पुन्हा ११ एकरांवर १३ बाय ७ फूट इतक्या अंतरावर डाळिंब लागवड केली. संपूर्ण लागवड एकाचवेळी न करता टप्प्याटप्प्याने केली आहे. त्यापैकी काही क्षेत्रावर यंदा मृग बहर धरणार आहे. त्यासाठी नियोजन सुरू असल्याचे पद्माकर सांगतात.
लागवड नियोजन ः
- लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडून जमिनीची चांगली मशागत करून घेतली.
- लागवडीपूर्वी प्रतिझाड एक घमेले याप्रमाणे चांगले कुजलेले शेणखत टाकून घेतले.
- सूत्रकृमींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झेंडूचे आंतरपीक घेण्यात आले.
- त्यानंतर दर १० ते १५ दिवसांतून एकदा रासायनिक कीटकनाशके व बुरशीनाशकांच्या प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या.
- बागेस नियमितपणे विद्राव्य रासायनिक खतांच्या संतुलित मात्रा देत होतो. त्यामुळे झाडांची वाढ जोमाने होण्यास मदत झाली.
- सध्या बागेतील झेंडू हे आंतरपिकाची काढणी करून झाली आहे.
- बागेत आंतरपीक काढणीनंतर खुरपणी दोन ओळींमध्ये मशागतीची कामे केली.
- बागेत सिंचनाचे काटेकोर नियोजन केले जाते. त्यानुसार जमिनीतील वाफसा स्थिती आणि झाडांची पाण्याची गरज यांचा अंदाज घेऊन सिंचन करण्यावर अधिक भर देण्यात आला.
मृग बहराचे नियोजन ः
- यंदा मृग बहर धरण्याचे नियोजन केले आहे. त्यादृष्टीने सध्या बागेत तयारी सुरू आहे.
- त्यासाठी पूर्वतयारी म्हणून मागील आठवड्यात बागेची हलकी छाटणी करून घेतली.
- तसेच झाडांवरील शेंड्याची छाटणी केली. अतिरिक्त फांद्याची विरळणी इत्यादी कामे करून घेतली आहेत. तसेच झाडांना योग्य आकार देऊन घेतला.
- काडी पक्व होण्यासाठी पुढील तीन महिने पाण्याचा संतुलित वापर करणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यानुसार सिंचनाचे काटेकोर नियोजन करत आहे. जेणेकरून फुटींची अनावश्यक वाढ होणार नाही आणि फळकाडी चांगली तयार होईल.
- प्रतिझाड एक घमेले याप्रमाणे चांगले कुजलेले शेणखत तसेच एनपीके खताचा प्रत्येकी १५० ग्रॅम प्रमाणे बेसल डोस दिला आहे.
आगामी नियोजन ः
- पुढील आठवड्यात झिंक, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, फेरस या खतांच्या मात्रा प्रत्येकी ५ किलो प्रति एकर या प्रमाणात दिल्या जातील.
- प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक कीटकनाशक व बुरशीनाशकांच्या हलक्या फवारण्या घेतल्या जातील. जेणेकरून बागेतील कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळला जाईल.
- बागेत मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली जाईल. शिफारशीप्रमाणे रासायनिक बुरशीनाशकांची आळवणी केली जाईल.
- एक महिन्याच्या अंतराने १२ः६१ः० व तसेच पोटॅशिअम शोनाईट या विद्राव्य खताच्या दोन फवारण्या घेणार आहे.
--------------------
- पद्माकर भोसले, ७५८८०४६४५५
(शब्दांकन ः सुदर्शन सुतार)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.