Chhatrapati Sambhajinagar : पिण्यासाठी आणि औद्योगिक वापर यासह रब्बी हंगामात शेतीला दोन आवर्तने देण्यासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे रोहयो व फलोत्पादनमंत्री तथा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दिले.
गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहामध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक सोमवारी (ता. ८) झाली. या वेळी गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा सदस्य आ. रमेश बोरनारे, दूरदृश्यप्रणालीद्वारे आ. राजेश टोपे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सब्बीनवार, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, जालना येथील निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, बीड येथील उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी उपस्थित होते.
जायकवाडी प्रकल्पाची सिंचन क्षमता १८ लाख ३३२२ हेक्टर आहे. सद्यःस्थितीत तेथे ३२.६८७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, यापैकी ६.५१६ टीएमसी पाणी औद्योगिक वापरासाठी राखीव असून, १५.५ टीएमसी पाणी रब्बी पिकाच्या आवर्तनासाठी वापरता येईल, अशी माहिती प्रास्ताविकात सब्बीनवार यांनी दिली.
पालकमंत्री भुमरे यांनी निर्देश दिले, की रब्बी पिकासाठी पहिले आवर्तन फेब्रुवारी ते मार्च आणि दुसरे आवर्तन एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये देण्याचे नियोजन करावे. विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती भूमिका घेऊन पाण्याची मागणी शासनस्तरावर कळवावी व कार्यवाही करावी, अशी सूचना केली.
तसेच गोदावरी पाटबंधारे महामंडळाने शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून द्यावे; तसा प्रस्ताव प्रशासनाने शासनाकडे पाठवावा, असेही श्री. दानवे म्हणाले. आ. बोरनारे म्हणाले, की जायकवाडीच्या वितरिका व नांदूर मध्यमेश्वर कालवा प्रकल्पाच्या वितरिकांचे संगणक प्रणालीद्वारे जोडण्याची मागणी केली व गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील मुकणे, भाम, वाकी, भावली या धरणांत उपलब्ध पाण्याचे समन्यायी वाटप व्हावे, अशी मागणी केली.
आ. टोपे यांनी शेतीच्या आवर्तनासाठी जायकवाडी प्रकल्पातील उपलब्ध पाणी तसेच मृत साठ्यातून जास्तीत जास्त पाणी दिले पाहिजे अशी मागणी केली. पाणी वापर संस्थेच्या अंतर्गत पाणी वितरणाचे नियोजन करून याचे शेती, उद्योग आणि पिण्यासाठी पाण्याचे योग्य वितरण होण्यासाठी समिती सदस्यांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्याबाबत बैठकीत ठरविण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.