Sustainable Farming Conference Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Journalism: ‘लोग साथ आते गये और कारवाँ बनता गया!’

Experience in Journalism: विनोद इंगोले यांचा ‘ॲग्रोवन’मध्ये कार्यरत होण्याचा अनुभव केवळ एक व्यावसायिक अनुभव नव्हता, तर शेतकऱ्यांच्या यशकथा आणि समस्यांवर आधारित एका सामाजिक नात्याची निर्मिती करणारा प्रवास ठरला.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Agricultural Reporting in Maharashtra: ‘सकाळ’मध्ये अकोला कार्यालयात दाखल होऊन नुकतीच दोन वर्षे झाली होती. याच दरम्यान २००५ मध्ये ‘सकाळ माध्यम समूह’ ‘ॲग्रोवन’ हे कृषी दैनिक सुरू करणार असल्याची घोषणा करण्यात आली. या वेगळ्या धाटणीच्या दैनिकात कुणी काम करण्यास इच्छुक आहे का, अशी विचारणा अकोला कार्यालयात संपादकीय नियोजन बैठकीत करण्यात आली. मात्र मुख्य प्रवाहातील दैनिकात सर्व विषय हाताळण्याची मुभा असल्याने अशा विशिष्ट विषयाला वाहिलेल्या दैनिकात कोण काम करणार?

त्यामुळे उपस्थित सर्वजण एकमेकांकडे बघत होते. मी मात्र त्यास तत्काळ सहमती दर्शविली. माझा हाच होकार माझे जीवन समृद्ध करणारा ठरला. गेल्या वीस वर्षांत कृषी क्षेत्र किती व्यापक आहे याची कल्पना देखील आली. सुरुवातीला आम्हाला बारामती कृषी विज्ञान केंद्रात कृषी क्षेत्राशी निगडीत विविध विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशीही आमचा संवाद झाला.

हजारो शेतकऱ्यांशी जुळले ऋणानुबंध

गेल्या दोन दशकांत कृषी पत्रकारिता करताना अनेक हृद्य अनुभव आले. अनेकांशी व्यक्तिगत ऋणानुबंध तयार झाले. शेतकऱ्यांच्या यशकथा, समस्या मांडता मांडता मीही त्यांच्या जीवनाचा भाग बनून गेलो. त्याबाबतचे अनेक अनुभव सांगता येतील. तांदळवाडी (ता. रिसोड, वाशीम) या गावातील श्यामराव देशमुख हे प्रयोगशील शेतकरी. या गावात जाण्यासाठी धड रस्ताही नव्हता. नदी पात्रातून गावात जावे लागले. त्यांनी तीन किलोमीटर अंतरावरून ठिबक नळ्यांचा उपयोग करीत बायोगॅस घरापर्यंत आणला होता.

त्यांची यशोगाथा प्रकाशित झाली आणि त्यांना राज्यभरातून फोन आले. राज्यात काही संस्थांकडून त्यांचा सन्मान झाला. त्यामुळे त्यांच्याशी कौटुंबिक ऋणानुबंध जुळले. यातूनच त्यांच्या मुलीच्या साक्षगंध कार्यक्रमाला मी उपस्थित राहावे याकरीता ते आग्रही होते. सातत्याने फोनवर संपर्क साधत वारंवार विचारणा करीत होते. मी सोहळ्याला पोहचल्यावरच त्यांची अस्वस्थता दूर झाली. माझ्या लग्नानंतर याच श्यामराव यांनी मला परिवारासह निमंत्रण देत मला आणि पत्नीला आहेर केला, जणू आम्ही त्यांचे पाहुणेच!

काही शेतकऱ्यांसह वसमत जिल्ह्यात हळद पाहणीकरिता गेलो असता आम्हाला पोचण्यासाठी रात्रीचे दहा वाजले होते. तत्कालीन वसमत तालुका कृषी अधिकारी दत्ता काळे यांच्याशी आमचा संपर्क झाला. परंतु त्याचवेळी ते सहकारी सूतगिरणीची निवडणूक असल्याने आणि ते निवडणूक अधिकारी असल्याने त्यांनी सुरुवातीला असमर्थता दर्शविली. परंतु त्यांचेही मन मानवत नसल्याने त्यांनी शेवटी आम्हाला रात्री हळद दाखविण्यासाठी वेळ दिला. काही शेतकऱ्यांच्या शिवारात नेत टॉर्चच्या उजेडात हळद पीक दाखविले. त्यानंतर गावात जात आमच्यासोबत असलेल्या शेतकऱ्यांच्या चहापाण्याची सोय केली.

त्यानंतर रात्री साडेबारा ते एक वाजता दरम्यान त्यांनी आम्हाला निरोप दिला. श्री. काळे हे हळद पिकातील मास्टर होते. त्यांच्याविषयी ‘ॲग्रोवन’मधून प्रकाशित होताच त्याची दखल घेत या कृषी अधिकाऱ्याला बारामतीमध्ये हळदीवर मार्गदर्शनासाठी पाचारण करण्यात आले. अकोल्याचे तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांच्या सोबत जात अनेक यशकथा लिहिल्या. रक्‍ताच्या नसल्या तरी प्रेमाच्या अशा हजारो माणसांचा गोतावळा गेल्या वीस वर्षांत वाढता राहिला. माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे हे तर निवृत्तीनंतर खास माझ्या लग्नसोहळ्यात सहकुटुंब उपस्थित राहण्याकरिता अकोल्यात आले होते.

‘ॲग्रोवन’ला बातमी आलीच पाहिजे

‘ॲग्रोवन’ने सतत विश्‍वासार्हता जपली आहे. त्यातूनच तत्कालीन कृषी सचिव हे सातत्याने संपर्क साधत बातम्या देत असत. एकदा रात्री आठ वाजताच्या सुमारास श्री. विजय कुमार यांचा फोन आला. एका बड्या राजकीय पुढाऱ्याचे नातेवाईक असलेल्या एका मोठ्या कंपनीचे बेकायदा बियाणे पकडल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिस तक्रार होईस्तोवर काय-काय घडले याचा लेखाजोखा देखील त्यांनी मांडला. ही बातमी ‘ॲग्रोवन’ला यावी असा त्यांचा आग्रह होता. अशाप्रकारे विश्‍वासर्हता जपण्याचे काम ‘ॲग्रोवन’ने सातत्याने केले आहे.

ॲग्रोवन कट्ट्याची उभारणी

मंगरूळपीर (वाशीम) येथील रशीद शॉँदा हे सायकल भाड्याने देण्याचा व्यवसाय करीत होते. ‘ॲग्रोवन’चे वाचक असलेले रशीद शॉँदा दुकानावर दहा ‘ॲग्रोवन’ अंक येणाऱ्या जाणाऱ्या वाचनाकरिता उपलब्ध करीत होते. त्यांनी शबनम सायकल हे दुकानाचे नाव बदलून ‘ॲग्रोवन कट्टा’ असे केले.

पुरस्कारांनी जीवन केले समृध्द

ॲग्रोवनने मान सन्मान आणि समाजातही प्रतिष्ठाही प्राप्त करुन दिली. तत्कालीन कृषी आयुक्‍त प्रभाकर देशमुख हे अकोला कृषी विद्यापीठ दौऱ्यावर आले होते. त्यांची मुलाखत घेतल्यानंतर तुमचे इतके चांगले काम असताना शेतीमित्र पुरस्कारासाठी प्रस्ताव का देत नाही, अशी थेट विचारणा श्री. देशमुख यांनी केली. मात्र राजकीय पाठबळाशिवाय हे पुरस्कार मिळत नाही, असे म्हटल्यावर श्री. देशमुख यांनी तत्कालीन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांना सांगत आत्मामधून प्रस्ताव तयार करण्यासाठी निधी देण्यास सांगितले. त्यामुळे माझा नाईलाज झाला.

प्रस्ताव तयार करून तो सर्व प्रक्रियेअंती वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला आणि २०१० साली ‘शेतीमित्र’ च्या माध्यमातून पहिल्यांदा माझा शासकीय पुरस्कारार्थीच्या यादीत समावेश झाला. त्यानंतर आजवर शासकीय, अशासकीय संस्थांचे मिळून सुमारे ५७ पुरस्कार माझ्या नावावर आहेत. त्यात भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मानाच्या ‘चौधरी चरणसिंग एक्‍सलन्स इन जर्नालिझम’ या पुरस्काराचाही समावेश आहे. मराठी भाषक वृत्तपत्रातील पत्रकाराला पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळाला. त्यामुळे या पुरस्काराचे महत्व माझ्यासाठी अधिक आहे. वरिष्ठांकडून कामाची मोकळीक आणि प्रोत्साहन मिळाल्याने देश व राज्यातील विषय देखील मांडता आले आणि माझी कृषी पत्रकारिता समृध्द होत गेली.

( : ८२७५२२०२२०)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Crop Loss: परभणीत दोन लाख हेक्टरवरील कपाशीला फटका

Onion Farmers: शिरूर तालुक्यात कांदा रोपे धोक्यात

Agriculture Damage: उरली सुरली पिकेही उद्ध्वस्त

Aster Flower Farming: ॲस्टरकडे शेतकऱ्यांची पाठ

Ethanol Export: अनुदानासह इथेनॉलच्या निर्यातीला परवानगी द्या

SCROLL FOR NEXT