Agriculture Journalism: समृद्ध करणारी पत्रकारिता

Agrowon Success Story: ‘ॲग्रोवन’साठी दीर्घकाळ काम करणाऱ्या राज्यातील विविध ठिकाणच्या बातमीदारांचे अनुभवविश्‍व रसरशीत बनले आहे. ‘ॲग्रोवन’च्या द्विदशकपूर्तीनिमित्त या बातमीदारांच्या व्यक्तिगत अनुभवांचा पट उलगडणारी मालिका.
Sustainable Farming Conference
Sustainable Farming ConferenceAgrowon
Published on
Updated on

Agriculture Rural Journalism: मागील दशकभरापेक्षा अधिक काळापासून मी ‘ॲग्रोवन’साठी पूर्णवेळ पत्रकारिता करीत आहे. हा केवळ लेखनाचा नाही, तर शेती, शेतकरी आणि त्यांच्या जीवनाशी जोडलेला एक प्रवास आहे. ‘ॲग्रोवन’शी नाते तसे पहिल्या दिवसापासूनच. २० एप्रिल २००५ रोजी ‘ॲग्रोवन’ सुरू झाला त्यावेळी मी बुलडाण्यात ‘सकाळ’मध्ये कार्यरत होतो. जिल्ह्यातून ‘ॲग्रोवन’ला बातम्या देण्याची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली.

हळूहळू ‘ॲग्रोवन’मध्ये मी रुळू लागलो. मला आठवते विदर्भात त्या काळात शेतकरी आत्महत्यांचा उद्रेक व्हायला सुरुवात झाली होती. त्याचे वार्तांकन सर्वत्र येत होते. मात्र पहिल्यांदा ‘ॲग्रोवन’ने पुढाकार घेत सखोल अभ्यास केला, सर्वेक्षण केले. त्याचा अहवाल तयार केला. यासाठी पुण्यातील वरिष्ठांना घटनांचा अभ्यास करण्यासाठी थेट गावशिवारात पाठवले. त्या वेळी पुण्यातून आलेल्या सहकाऱ्यांसह मी बुलडाणा जिल्हयातील काही आत्महत्‍याग्रस्त कुटुंबाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलो. त्यांच्या वेदना जाणल्या.

शेतकरी कुटुंबातील असल्याने शेती अन् मातीशी नाते जन्मापासूनच जुळलेले. सप्टेंबर २०१५ मध्ये ‘ॲग्रोवन’मध्ये पूर्णवेळ पत्रकार म्हणून रुजू झालो. अकोला मुख्यालय मिळाले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, महाबीज अशा मोठ्या संस्थांसह प्रक्रिया उद्योगाचे (डाळ मिल) हे ठिकाण म्हणजे माहेरघर. मोठी बाजारपेठ येथे आहे. माझ्या कार्यक्षेत्रातील अकोला, बुलडाणा, वाशीम हे तीनही जिल्हे प्रयोगशील शेतीसाठी ओळखले जातात. येथे प्रत्येक भागाची वेगवेगळी पीक पद्धती आहे.

Sustainable Farming Conference
Sustainable Agriculture Conference: ‘अॅग्रोवन’च्या द्विदशकपूर्तीनिमित्त पुण्यात उद्या शाश्‍वत शेती परिषद

कुठे सोयाबीनचे वर्चस्व, कुठे कापूस. संत्रा, केळी, पेरू, सीताफळ, मोसंबी या पिकांसोबतच बीजोत्पादनात देशात अग्रेसर असलेला हा भाग आहे. ‘ॲग्रोवन’मध्ये पाऊल ठेवले, तेव्हा ही पत्रकारिता नियमित पत्रकारितेपेक्षा वेगळी आहे, याची जाणीव होत होती. अभ्यास, चिकित्सकपणा, विषयाची सखोल माहिती हवीच हे, कळाले. हळूहळू शेतकरी, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, महाबीज, उद्योगजगत, बाजारविश्‍वात संपर्क विस्तारत गेले. आज गावोगावी शेतकऱ्यांसह विविध घटकांशी जनसंपर्क तयार झालेला आहे. त्यातील अनेकांशी तर जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ही केवळ ‘ॲग्रोवन’ची देन.

हे साहजिकच सरधोपट पत्रकारितेची चाकोरी सोडल्याने घडू शकले हे नाकारून चालणार नाही. हे काम करताना नवनवीन आव्हानेही आली. मला आजही आठवते, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू झाला तेव्हा त्यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजनांचा समावेश होता. यामध्ये शेळी गट वाटपात मोठा घोटाळा सुरू असल्याचे कानावर यायचे. शेवटी त्याच्या खोलात जाऊन जेव्हा हे प्रकरण चव्हाट्यावर आणले, त्यानंतर अनियमिततेची एक मालिकाच बाहेर आली.

केवळ ‘ॲग्रोवन’ने घेतलेल्या ठोस भूमिकेमुळे सरकारी पातळीवर सुधारणांचे कठोर निर्णय घ्यावे लागले. सूक्ष्म सिंचन घोटाळा, ‘पोकरा’तील घोळ, स्मार्ट कॉटन प्रकल्प, कृषी निविष्‍ठा विक्री, पीकविमा अनागोंदी... अशी मोठी यादीच बनते. ‘ॲग्रोवन’सारखे राज्यस्तरीय व्यासपीठ मिळाल्याने त्या बातम्यांचा इम्पॅक्टसुद्धा तेवढाच मोठा आला. स्थानिक दैनिकात कितीही मोठी बातमी आली तरी ‘ॲग्रोवन’मध्ये प्रकर्षाने यावी असा अनेकांचा आग्रह असतो, त्याचे कारण हे!

Sustainable Farming Conference
Sugarcane Farmer Conference: कोल्हापुरात २७ मे रोजी ऊस परिषदेचे आयोजन

शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येमागे एक हृदयस्पर्शी गोष्ट असते. दुष्काळात सुकलेली आशा, नव्या तंत्रज्ञानातून उगम पावणारी उमेद, बाजारभावातील चढ-उतारांतून होणारा संघर्ष आणि या सगळ्यांना शब्दांत गुंफण्याचं एक जबाबदारीचं काम मला मिळाले आहे.‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून केवळ बातम्या पोहोचवल्या नाहीत, तर शेती, शेतकरी आणि पर्यायाने ग्रामीण जीवनाचा आवाजही बनण्याचे भाग्य लाभले. एखाद्या शेतकऱ्याची यशोगाथा लिहिताना अभिमान वाटला, तर कधी महामार्गासाठी शेती जाणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज प्रखरतेने मांडल्याचे समाधानही लाभले.

हताश झालेल्यांच्या चेहऱ्यांवर अनेकदा आशेचे नवे किरण उमटवण्याची भूमिका माझ्या बातमीने निभावली, तेव्हा त्या शब्दांनाही मोठा अर्थ लाभला. या पत्रकारितेने मलाही समृद्ध केले. राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान झाला. या प्रवासात मी अनेक गोष्टी शिकलो. पत्रकारितेचे तंत्र, शेतीतील बदल, नवे प्रयोग, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे मानवी संवेदनशीलता, शेतकऱ्यांचं दुःख, आनंद, संकटे आणि त्यातून पुन्हा उभारी घेणारी स्वप्ने, हे सगळे जवळून अनुभवले. या आनंदाला शब्दांत मांडणे कठीण आहे.

‘ॲग्रोवन’मध्ये एखाद्या शेतकऱ्याची यशोगाथा प्रकाशित झाल्यानंतर त्याला राज्यभरातून शेकडोच्या संख्येत येणारे फोन कॉल्स हे त्या शेतकऱ्यांचा आत्मविश्‍वास अन् नवी उमेद जागविणारे ठरतात. शेतकरी आत्महत्यानंतर त्या कुटुंबाच्या माउलीने सावरलेली शेती अन् संसाराच्या यशोगाथा जगासमोर आणता आल्या. या यशोगाथांनी अनेकांचा राज्यभर गोतावळा तयार झाला, त्यातून मार्केटिंगची सुविधा निर्माण झाली. ‘ॲग्रोवन’मुळे हे कसे झाले, याची माहिती यशोगाथेत चमकलेले शेतकरी, महिला वर्षानुवर्षे भरभरून सांगत असतात. अशा प्रतिक्रियांनी नक्कीच मान उंचावते.

कार्यालयात बसून शेतीबद्दल लिहिणं सोपं असते, पण खऱ्या अर्थाने पत्रकार म्हणून बांधावर गेल्यावर मातीचं खरंखुरं जग कळते. शेतकऱ्याएवढा आशावादी कुणीच नाही. डोंगराएवढी संकटे, समस्या आ वासून उभ्या असतानाही तो प्रत्येकवेळी नव्या जोमाने सुरुवात करतो. अनेक यशोगाथांनी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. माझ्या बातमीमुळे अनेक वेळा मदतीचे मार्ग मोकळे झाले. कुठे मदतीचा हात पोहोचला. या सर्व गोष्टींनंतर येणारा व ‘धन्यवाद’ मानणारा फोनकॉल खूप काही समाधान देऊन जातो. शेती ही फक्त उत्पन्नाचं साधन नाही, ती एक संस्कृती आहे, एक जीवनशैली आहे आणि या संस्कृतीचं दस्तऐवजीकरण करणारा मी एक नम्र संवादकर्ता, शब्दांचा पाईक बनलो. हा प्रवास बराच मोठा आहे आणि अजून खूप काही शिकायचं आहे!

( ९८५०२०९६७४)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com