Vatana Market Agrowon
ॲग्रो विशेष

Vatana Market : पुणे ‘मार्केट’मध्ये वाटाणा खातोय चांगलाच भाव

Pune APMC : थंडीच्या काळात बाजारात मोठी आवक व मागणी असलेले पीक म्हणजे वाटाणा. पुणे- गुलटेकडी येथील बाजार समिती हे वाटाण्याचे मोठे मार्केट आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

संदीप नवले

Vatana Rate : थंडीच्या काळात बाजारात मोठी आवक व मागणी असलेले पीक म्हणजे वाटाणा. पुणे- गुलटेकडी येथील बाजार समिती हे वाटाण्याचे मोठे मार्केट आहे. यंदाचा विचार केल्यास प्रतिकूल हवामान, पावसाचा परिणाम होऊन वाटाण्याची आवक कमी आहे. परिणामी, दर चांगले आहेत. पुढील काही दिवसही हे दर असेच राहतील. त्याचा वाटाणा उत्पादकांना चांगलाच आधार मिळेल अशी स्थिती आहे.

पुणे- गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार समितीमध्ये बहुतांशी फळभाज्यांची
आवक तुलनेने घटलेली असून, दरांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. या हंगामात नेहमीच चांगली मागणी असलेला व भाव खाणारा वाटाणाही त्यास अपवाद ठरलेला नाही. मागील आठ ते दहा दिवसांपासून प्रति किलो ३० ते ४० रुपये त्याचा दर असून, किरकोळ ग्राहकांना तो ४० ते ८० रुपयांप्रमाणे खरेदी करावा लागत आहे. सध्या परराज्यांतून दररोज २० ते २५ गाड्यांची आवक सुरू असून, दरही तेजीत आहेत.

वर्षभर मागणी असलेला वाटाणा

वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून त्याच्या ओल्या दाण्यांना (मटार) भाजी तसेच ‘स्नॅकवर्गीय’ पदार्थांसाठी मोठी मागणी असते. पुणे, नगर भागातील पुरंदर, पारनेर हे तालुके या पिकांसाठी ओळखले जातात. लागवडीनंतर अडीच ते तीन महिन्यानंतर त्याचे उत्पादन सुरू होते. त्यानंतर सात ते दहा दिवसांच्या फरकाने सतत काढणी करावी लागते. या कालावधीत एकरी जवळपास ३ ते ४ टन उत्पादन मिळते. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गुलटेकडी बाजारपेठेची चांगली सोय झाली आहे. काढणी केल्यानंतर वाटाणा दहा दिवस टिकतो. ग्राहकांकडून त्यास वर्षभर मागणी असते. सर्वाधिक मागणी व्यावसायिकांकडून असते.

पाऊस व आवकेचे स्थिती

गेल्या वर्षी पावसाळ्यात पश्‍चिम महाराष्ट्रासह अनेक भागांत कमी पाऊस झाला. नोव्हेबर, डिसेंबरमध्ये अवकाळी परिस्थिती तयार झाली. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन उत्पादनात घट झाली. यंदा पश्‍चिम महाराष्ट्रात अधूनमधून झालेल्या अवकाळी पावसामुळे वाटाण्याचे देखील नुकसान झाले.
परिणामी, बाजारातील आवक कमी झाली आहे. नोव्हेबर ते जानेवारी या थंडीच्या काळात वाटाण्याची मोठी आवक असते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दर मिळण्यास मदत होते. परराज्यांतून म्हणजे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर, इंदूर, जालोन या भागांतून डिसेंबर काळात जवळपास ७० ते ८० टक्के आवक होते. वाटाण्याला दोन प्रकारांनुसार दर मिळतात. यात गोल्डन किंवा पेन्सिल नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाटाण्याला प्रति किलो ३० ते ५० रुपये दर मिळतो. त्याच्या शेंगांची लांबी जास्त असते. रंग हिरवा असतो. शेंग वजनदार व चमकदार असते. त्यास उठाव जास्त असतो. खाण्यासाठी हा वाटाणा चांगला असतो. दुसऱ्या प्रकारच्या वाटाण्याची लांबी थोडी कमी असते. बऱ्यापैकी वजनदार, चमक थोडी कमी असा हा वाटाणा असतो.

दरांची स्थिती

थंडीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने शेतकरी टप्प्याटप्प्याने माल विक्रीसाठी आणतात. या कालावधीत गुलटेकडी मार्केटमध्ये गाड्यांची मोठ्या प्रमाणात आवक होते. रविवारच्या दिवशी जवळपास २० ते ३० गाड्या बाजारात येतात.
साधारणपणे या कालावधीत प्रति किलो ३० ते ४० रुपये दर असतात. काही वेळेस त्याहून कमी दर होतात. यंदा रविवारीही कमी आवक दिसत असून दर चांगले असल्याचे पाहण्यास मिळाले आहे.

आवक आणि दर (इन्फो)

कालावधी --- आवक (गाड्या) सरासरी दर रु. (प्रति किलो)

ऑक्टोबर ते फेब्रुवारी --- २० ते २५ --- २० ते ३०
मार्च ते सप्टेंबर २ ते ३ --- ७० ते ८०

-पुणे मार्केटमध्ये वर्षभर सरासरी मिळणारा दर ३० ते ४० रुपये.
-दिवाळीनंतरच्या कालावधीत माल अधिक उपलब्ध होत असल्याने आवक जास्त होते. त्या वेळी कमी दर असले, तरी उलाढाल कमी- अधिक प्रमाणात असते. वर्षभराच्या कालावधीत ८० ते १०० कोटींच्या दरम्यान उलाढाल होते.

उलाढालीवर दृष्टिक्षेप- (प्रातिनिधिक) (स्रोत - गुलटेकडी बाजार समिती, पुणे)

वर्ष --- आवक (क्विंटल) --- सरासरी दर (प्रति क्विंटल) --- उलाढाल (सुमारे) रुपये


२०२०-२१ --- १,६८,४०६ --- ५६१० --- ९४ कोटी ४७ लाख ५७ हजार
२०२२-२२ --- १,५५,८१० --- ५०५० --- ७८ कोटी ६८ लाख ४० हजार
२०२२-२३ --- १,३१,९७२ --- ५००० --- ६५ कोटी ९८ लाख ६० हजार

वाटाणा उत्पादक अनुभव

दिवे (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील वाटाणा उत्पादक कैलास झेंडे म्हणाले, की माझी नऊ एकर शेती आहे. त्यामध्ये अंजीर, सीताफळ, पेरू, वाटाणा अशी विविध पिके घेतो. यंदा पाऊण एकरावर वाटाण्याची नोव्हेंबरमध्ये लावण केली. या पिकाच्या वाढीसाठी थंड वातावरण आवश्यक आहे. सिंचनासाठी मी स्प्रिंकलरचा वापर केला आहे. वाटाण्याची गुणवत्ता चांगली मिळावी यासाठी पोल्ट्री खताचा वापर केला.

पंधरा दिवसांनंतर शेंगांच्या काढणीस सुरुवात होईल. दरवर्षीचा अनुभव पाहता एकरी दोन ते अडीच टन उत्पादन होते. गावापासून पुणे मार्केट जवळ असल्याचा फायदा मिळतो. एकूण हंगामाचा विचार करता किलोला ३० रुपयांपासून ते कमाल काही वेळा १५० रुपयांपर्यंतही दर मिळतो. यंदा प्रतिकूल हवामानामुळे वाटाणा आवक कमी व त्यामुळे दर जास्त अशी स्थिती झाली आहे. स्थानिक वाटाण्याला ८० ते ९० रुपये दर मिळत आहे.

कैलास झेंडे, ८८०५१७३३९१

वाटाणा खरेदी- विक्री व्यवसायात आमची दुसरी पिढी कार्यरत आहे. पुणे मार्केटमध्ये वाटाण्याची
सर्वाधिक आवक परराज्यांतून होते. पिंपरी- चिंचवड, चाकण, भोसरी, हडपसर व पुणे शहरांतील ग्राहकांकडून त्यास चांगली मागणी असते. गेल्या महिन्यात काही प्रमाणात वाटाण्याचे दर कमी झाले होते. आता आवक कमी झाल्याने काही दिवसांपासून दर बऱ्यापैकी टिकून आहेत. येत्या काळातही ते कमी होतील असे वाटत नाही.
महेश वाडकर, ७५०७३५६००३ (व्यापारी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT