Fodder Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Shortage : परभणी जिल्ह्यात जूनमध्ये उद्‍भवू शकते चाराटंचाई

Fodder Issue : परभणी जिल्ह्यातील पशुधनाची संख्या ६ लाख १ हजार ७२७ आहे. सध्या उपलब्ध असलेला चारा मे अखेरपर्यंत पुरणार आहे. जूनमध्ये लवकर पाऊस झाला नाही तर गंभीर चाराटंचाई उद्‍भवू शकते.

माणिक रासवे

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील पशुधनाची संख्या ६ लाख १ हजार ७२७ आहे. सध्या उपलब्ध असलेला चारा मे अखेरपर्यंत पुरणार आहे. जूनमध्ये लवकर पाऊस झाला नाही तर गंभीर चाराटंचाई उद्‍भवू शकते. हिंगोली जिल्ह्यातील पशुधनाची संख्या ४ लाख ७७ हजार ५१९ असून, सध्या उपब्लध असलेला चारा ऑगस्ट अखेरपर्यंत पुरणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यातील एकूण पशुधनामध्ये दुधाळ गायी १ लाख २८ हजार ५०० व दुधाळ म्हशी ४२ हजार ८०० मिळून एकूण दुधाळ पशुधनाची संख्या १ लाख ७१ हजार ३०० एवढी आहे. वासरांना प्रतिदिन ३ किलो, गायी, बैल, म्हशी आदी मोठ्या जनावरांस प्रतिदिन ६ किलो, शेळ्या मेंढ्याना प्रतिदिन ६०० ग्रॅम नुसार एकूण पशुधनास प्रतिदिन २ हजार २५५ टन चाऱ्याची गरज आहे.

सद्यःस्थितीत उपलब्ध १ लाख १ हजार ४७५ टन चारा मे अखेरपर्यंत पुरू शकेल. जून महिन्यात पाऊस वेळेवर पडला नाही तर चारा टंचाईची समस्या गंभीर होऊ शकते. २०२३ मध्ये जून ते ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात ५२३.५ मिलिमीटर (६२.४० टक्के) पाऊस झाला. वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३१५.४ मिलिमीटर पावसाची तूट झाली आहे.

त्यामुळे रब्बी मोठे क्षेत्र नापेर राहिले होते. परंतु नोव्हेंबरच्या अखेर या दोन जिल्ह्यांत झालेल्या जोरदार पाऊस झाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी दुष्काळी स्थितीत पशुधनास चारा उपलब्ध व्हावा यादृष्टीने नापेर क्षेत्रावर तसेच हरभरा मोडून ज्वारीची पेरणी केली. रब्बी हंगामात ज्वारीची १ लाख ९ हजार ६२४ हेक्टर व मका ८८८ हेक्टरवर पेरणी झाली. त्यामुळे कडबा व हिरवा चारा उपलब्ध होत आहे.

उन्हाळी हंगामात मक्यापासून हिरवा चारा, तसेच भुईमुगाचा पाला उपलब्ध होईल. या शिवाय पशुपालक शेतकऱ्यांनी सोयाबीन, हरभरा, ज्वारी, तूर, गहू आदी पिकांचे कुटार (भुस्सा) जमा करून ठेवलेला आहे. उन्हाळी ज्वारी, भुईमुगाचा पाला उपलब्ध होईल. सध्या परभणी येथील चारा बाजारात स्थानिक परिसरातून ज्वारीचा कडबा, मक्याचा चारा विक्रीसाठी येत आहे.

पशुसंर्वधन विभागाच्या उपाययोजना

परभणी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांत मक्याचे २ हजार १२६ किलो व न्यूट्रीफिड ७५७ किलो असे एकूण २ हजार ८८३ किलो बियाणे १ हजार ६६० लाभार्थींना वाटप करण्यात आले असून, त्यावर ९ लाख ९९ हजार २३० रुपये खर्च झाला. चारा पिकांसाठी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत ५० लाख रुपयांची तरतूद आहे.

जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन जिल्ह्याबाहेर चार वाहतूक व विक्री करण्यास बंदी करण्यात आली आहे. अद्याप चारा छावण्याची मागणी नाही. परंतु जिल्ह्यातील गो शाळांकडून चाऱ्याची मागणी केली जात आहे. जिल्ह्यात नोंदणीकृत ३९ गोशाळा आहेत. त्यापैकी १७ कार्यरत असून, त्यामध्ये सुमारे ३ हजार ६०० जनावरे आहेत, असे पशुसंवर्धनच्या सूत्रांनी सांगितले.

हिंगोली जिल्ह्यात ऑगस्टपर्यंत पुरू शकेल चारा

हिंगोली जिल्ह्यातील एकूण पशुधनाची संख्या ४ लाख ७७ हजार ५१९ आहे. त्यात दुधाळ गायी २ लाख ३२ हजार २०३, म्हशी ७४ हजार १२५ यासह शेळ्या १ लाख ५४ हजार २८४, मेंढ्या १६ हजार ९०७ आहेत. प्रतिदिन २ हजार ९ टन चाऱ्याची गरज आहे. हिंगोली जिल्ह्यात ७४६.६० मिलिमीटर (८६.८५ टक्के) पाऊस वार्षिक सरासरीपेक्षा ११३ मिलिमीटर कमी पाऊस झाला.

रब्बी हंगामात ज्वारी १६ हजार ९०० हेक्टर, मका ४७९ हेक्टर पेरा आहे. सिद्धेश्‍वर, इसापूर धरणाच्या कालव्याच्या आवर्तनावर पेरणी केलेल्या उन्हाळी हंगामातील ज्वारी, मका यापासून चारा तसेच भुईमुगाचा पाला उपलब्ध होईल. सध्या उपलब्ध असलेला चारा ऑगस्टपर्यंत पुरणार असल्यामुळे जिल्ह्यात चाराटंचाई नाही, असे पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

चारा दर स्थिती (प्रति शंभर पेंढ्या)

चार प्रकार दर रुपयात

ज्वारी कडबा १७०० ते २०००

हिरवा चारा २००० ते २५००

रब्बी ज्वारीचा कडबा तसेच मक्याचा हिरवा चारा उपलब्ध असल्याने चारा टंचाई नाही. जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक व विक्रीस बंदी करण्यात आली आहे. चारा टंचाई उपाययोजना अंतर्गत मका पिकांचे बियाणे वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन, हरभरा आदी पिकांचे कुटार जमा करुन ठेवले आहे. जिल्ह्यातील डोंगराळ भागातील पशुधनास पाण्याची टंचाई जाणवत आहे. जून महिन्यात वेळेवर पाऊस झाला तर चारा टंचाईवर मात करता येईल.
डॉ.पी.पी.नेमाडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, परभणी.
तीन महिन्यापूर्वी ज्वारी कडबा पेंढ्याचे दर प्रतिशेकडा ३००० ते ३५०० रुपये होते.त्यावेळी प्रतिदिन किमान ५०० पेंढ्यांची विक्री होत असे. परंतु नवीन कडब्याची आवक सुरु झाली तेव्हापासून कडब्याचे दर निम्म्यावर आले आहेत. मागणी देखील. कमी झाली आहे.
शेख महंमद शेख समी, कडबा व्यापारी, खंडोबा बाजार, परभणी.
दुधाळ म्हशीचे दर १ लाख ४० हजार रुपये ते १ लाख ७५ हजार रुपयापर्यंत आहेत. शेतकऱ्यांकडे ज्वारीचा कडबा उपलब्ध आहे. परंतु शेतमालास दर नसल्यामुळे तसेच दुष्काळामुळे उत्पादकता घटल्याने जनावरे खरेदीसाठी पैसे नाहीत. त्यामुळे दुधाळ जनावरांना मागणी नाही.
अब्दुल माजीद, म्हैस व्यापारी, परभणी.
आमच्याकडे १५ गायी व ४ म्हशी आहे. दोन एकरावर चारा पिकांची लागवड आहे. मुरघास तयार केलेला आहे. हरभरा, गव्हाचे भूस, ज्वारीचा कडबा आहे. योग्य नियोजन केल्यामुळे चारा टंचाई भासत नाही.
रामेश्वर आहेर, पिंपळगाव कुटे, ता. वसमत, जि. हिंगोली.
कमी पावसामुळे गंभीर चारा टंचाई उद्भवली असती. परंतु नोव्हेंबरमध्ये पाऊस पडल्यामुळे ज्वारीचा पेरा वाढला. त्यामुळे शेतकरी पशुपालकांना दिलासा मिळाला.
रामेश्वर साबळे, भोगाव, जि. परभणी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT