Paddy Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Farming : रायगडमधील भातशेती बहरली

Team Agrowon

Alibaug News : समाधानकारक पावसाने रायगड जिल्ह्यातील भातशेती चांगलीच बहरली आहे. खलाटीतील उशिराने लागवड झालेली भातशेती हिरवीगार दिसत आहे, तर हळव्या जातीच्या पिकाच्या लोंब्या आता फुलोऱ्यातून डोकावू लागल्या आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये ९८ हजारांहून अधिक भातलागवडीचे क्षेत्र आहे.

यंदा मॉन्सून वेळेवर दाखल झाल्याने पावसाची सरासरी उत्तम राहिली आहे. यामुळे भाताचा उतारा चांगला येईल, अशी येथील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. शेतीखर्चाच्या वाढीमुळे काहींनी भातशेती सोडून दिली असली तरी येथील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने भातशेती करीत ही कसर भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.

जिल्ह्यात कर्जत, पेण, अलिबाग, रोहा, मुरूड ही सरासरी जास्त भातपीक घेणारे तालुके आहेत. येथील लहरी हवामानामध्ये भातपिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी येथील शेतकरी पीकविमा उतरवण्यास प्राधान्य देत आहे. भातपिकाबरोबर शेताच्या बांधावर तूर, उडीद यांसारखे कडधान्य तर उताराच्या जमिनीवर नागली पिकांना येथील शेतकरी प्राधान्य देऊ लागले आहेत. येथे काही भाग वगळता सिंचनाची व्यवस्था नाही.

यामुळे शेतकऱ्यांना पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. या वर्षी भातलागवड केल्यापासून ते आतापर्यंत दररोज संततधार पाऊस पडत असल्याने भाताचे पीक चांगलेच बहरले आहे. संततधार पावसामुळे या वर्षी रोगाचे प्रमाणही अत्यंत कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

पीक बहरले असून या वर्षी उत्पन्न चांगले येणार असल्याची आशा शेतकऱ्यांना आहे. सर्वत्र हिरवीगार शेती पाहायला मिळत आहे. पावसाची उघडीप असल्याने भाताला पोषक वातावरण मिळत आहे. यामुळे शेतकरीही आनंदला आहे. जिल्ह्यात हळवे, गरवे व निमगरवे भातपीक घेतले जाते. सद्यस्थितीत हळवे भातपीक निसावायला यायला सुरुवात झाली आहे.

विविध भाताचे वाण

या ठिकाणी गुजरात चार, गुजरात ११, सुरती, वायएसआर, जोरदार, कर्जत तीन, कर्जत चार, पूनम आदी अनेक भाताच्या वाणांची लागवड शेतकरी करीत असून उत्पादन घेत असतात. याच तालुक्यात डोंगर उतारावर भातपीक घेतले जाते, भातपिकाबरोबर नाचणीच्या पिकात मागील तीन वर्षांत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाने राबवलेल्या विविध योजनांचा येथील शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.

यावर्षी भातपिकाला आवश्यक असणारा पाऊस पडत असल्याने भातशेती चांगली आली आहे. सततच्या पावसामुळे भातपीक बहरले आहे. गणपतीनंतर पावसाने बऱ्यापैकी उघडीप घेतली आहे. दिवसातून एक-दोन अशा हलक्या सरी येत असून त्या भातपिकाला योग्य अशाच आहेत.
- माधव पाटील, प्रयोगशील शेतकरी
साधारणपणे दिवाळीच्या दरम्यान भातपिकाची कापणी होईल. दिवाळीनिमित्ताने घरात धनधान्य येईल, या आशेने मन भरून येत आहे. पिकावर रोगाचे प्रमाण कमी दिसत आहे. दाणा भरण्याच्या वेळेला कमीत कमी पाऊस आणि उन्हाची गरज असते, असेच सध्याचे वातावरण आहे.
- शांताराम गुरव, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Moong Rate : हिंगोली बाजार समितीत मूग १०,००० ते १३,०५० रुपये दर

Rain Update : बावड्यात १२३ मिलिमीटर पावसाची नोंद

Agricultural Issue Protest : पीकविमा, मदतीच्या मुद्यावर तुपकर यांचा ‘ठिय्या’

Clean Village Competition : काळवाडीस स्वच्छतेचा राज्यस्तरीय पुरस्कार

Onion Export Policy : स्थिर कांदा निर्यात धोरण हवे; २० टक्के निर्यात शुल्क माफ करा

SCROLL FOR NEXT