डॉ. श्रीकांत ब्राह्मणकर, डॉ. अनिल कोल्हे
Integrated Disease Management (IDM) :
खोड कुजव्या
खोड कुजव्या या रोगामुळे खोडावर चट्टे, जखमा तयार होतात. लोंब्यात पांढरे दाणे तयार होऊन लोंब्या भरत नाही. या रोगाची बुरशी बीजे जमिनीच्या वरच्या थरामध्ये असतात. ते कोरड्या, ओलसर जमिनीत व पाण्यात जिवंत राहतात. बुरशी प्रादुर्भावग्रस्त जमिनीतील कांड्यांमध्ये जिवंत राहते. बुरशी बिजे पाण्यात सोबत वाहत जाऊन नवीन झाडामध्ये प्रादुर्भाव होतो. खोडाला तीव्र प्रादुर्भाव झाल्यास झाडे कोलमडतात, त्यावर किडीचा प्रादुर्भाव होतो. लोंब्यामधील ओलावा व नत्र खताचा अवास्तव वापर केल्यास या रोगाची तीव्रता वाढते.
लक्षणे : खोडकुजव्या रोगाची (काळी व पांढरी) बुरशी बीजे मुळालगत खोडाच्या आत चुडामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. प्रादुर्भावग्रस्त भाताचे चूड कोलमडून पडते. रोगाचा प्रादुर्भाव होताच पाण्याच्या वर पर्णकोषावर लहान अनियमित चट्टे / जखमा दिसतात. हे चट्टे रोगाच्या तीव्रतेमुळे वाढत जातात. अतितीव्र प्रादुर्भावामध्ये फुटवे मरतात. रोगाचा प्रादुर्भाव लोंब्या निसवण्यापूर्वी व दाणे भरण्याच्या वेळी होते. पर्णकोष कुजल्यामुळे फुटवे कोलमडून पडतात, व लोंबीत दाणे अत्यंत कमी भरतात. दुर्लक्षित पिकामध्ये साधारणतः ३० ते ८० टक्के नुकसान होते.
व्यवस्थापन :
रोग प्रतिकारक वाणांचा वापर करावा.
भात कापणीनंतर धसकटे, काड व अन्य अवशेष नष्ट करावेत. किंवा रोगग्रस्त नसलेल्या अवशेषांपासून कुजवून खत तयार करावे.
तीव्र स्वरूपाच्या प्रादुर्भावामध्ये बांधीमधील पाणी काढून टाकावे.
खताचा संतुलित वापर करावा. जमिनीचा सामू वाढण्यासाठी पोटॅश व चुना विभागून द्यावा.
या रोगाच्या नियंत्रणासाठी लेबल क्लेम रासायनिक बुरशीनाशके उपलब्ध नाहीत. मात्र पर्णकोष करपा या रोगासाठी लेबल क्लेम असलेली खालील बुरशीनाशके खोड कुजव्या रोगासाठी प्रभावी आढळून आली आहेत. त्या अनुषंगाने रोगाचा प्रादुर्भाव होताच थायोफेनेट मिथाईल (४१.७ टक्के प्रवाही) २० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या फवारणी करावी.
टीप : एकदा वापरलेले बुरशीनाशक पुन्हा न वापरता अन्य शिफारशीतले बुरशीनाशक वापरावे.
पर्णकोष करपा
हा बुरशीजन्य रोग असून प्रादुर्भावग्रस्त पाने आकाराने लहान राहून झपाट्याने वाळतात. प्रादुर्भाव झालेले नवीन फुटवेसुद्धा वाळतात, त्यामुळे ठोंबाचा घेर कमी होऊन फुटव्यांची संख्या कमी होऊन उत्पादनात घट येते. या रोगांच्या वाढीसाठी मध्यम ते उच्च तापमान (२८ ते ३२ अंश से.), आर्द्रता ८५ टक्क्यांपेक्षा अधिक, दाट लागवड व नत्र खतांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर या बाबी पोषक ठरतात.
लक्षणे : फुटवे ते दाणे भरण्याच्या अवस्थेत या रोगांची लक्षणे दिसतात. बांधामध्ये पाण्याच्या किंवा जमिनीच्या अगदी वर खोडाच्या पानाच्या आवरणावर हिरवट राखाडी रंगाची लांबुळके अनियमित व्रण/चट्टे दिसतात. पोषक वातावरणाला या चट्ट्यांची वाढ झपाट्याने होते. ते वरच्या बाजूला पसरतात व नंतर दुसऱ्या फुटव्याला सुद्धा प्रादुर्भाव होतो. जुने वाढलेले चट्टे मध्यभागी राखाडी पांढऱ्या रंगाचे असून त्याला तपकिरी किनार असते.
व्यवस्थापन :
नत्रयुक्त खतांचा शिफारशीनुसार वापर करावा.
बांध व धुऱ्यावरील तणाचा वेळोवेळी नायनाट करावा.
बांधीतील पाणी तुलनेत लवकर काढूनही या रोगाचा प्रसार कमी करता येतो.
पिकावर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच, फवारणी प्रति १० लिटर पाणी.
प्रोपिकोनॅझोल (२५ ईसी) १० मि.लि. किंवा
हेक्झाकोनॅझोल (५ ईसी) २० मि.लि. किंवा
डायफेनोकोनॅझोल (२५ टक्के ई.सी.) ५ मि.लि. किंवा
क्रिसॉक्झिम मिथाईल (४४ टक्के एस.सी.) १० लि. किंवा
टेब्युकोनॅझोल (३८.३९ टक्के एस.सी.) १० मि.लि. किंवा
ॲझोक्सिस्ट्रॉबीन (१८.२ टक्के) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४ टक्के एस. सी.) (संयुक्त बुरशीनाशक) १० मि.लि. किंवा
ॲझोक्सिस्ट्रॉबीन (७.१ टक्के) अधिक प्रोपीकोनॅझोल (११.९ टक्के एस. सी.) (संयुक्त बुरशीनाशक) १५ मि.लि.
आवश्यकता भासल्यास ८ ते १० दिवसांच्या अंतराने दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
करपा :
हा महाराष्ट्राच्या सर्व भागात आढळणारी बुरशीजन्य रोग आहे. सतत व दीर्घकाळ रिमझिम पाऊस, थंड वातावरण (तापमान २४ ते २६ अंस से.) या रोगास पोषक आहे. बांधीमध्ये पुरसे पाणी असल्यास या रोगांची व्यवस्थित वाढ होत नाही. मात्र पाणी कमी झाल्यावर हा रोग वाढतो. या रोगाचा प्रसार रोगग्रस्त बियाणे, पिकांचे अवशेष, पर्यायी तन वनस्पती, इ. द्वारे होतो. रोप अवस्थेपासून ते पीक पक्वतेच्या विविध काळात पानावर, खोडावर, पेरावर तसेच लोंबीच्या मानेवर करपा रोग दिसून येतो. रोपे व फुटवे अवस्थेपर्यंतचे झाड मरते, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा रोग ठरतो. झाड वाढीच्या अवस्थेनंतर तीव्र स्वरूपाच्या प्रादुर्भावात पानाचा आकार कमी होऊन, त्याचा दाणे भरण्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे उत्पादनात घट येते.
लक्षणे : या रोगाची लक्षणे झाडाच्या सर्व भागावर दिसतात. झाडावर सुरुवातीला गर्द हिरवी किनार असलेले पांढरे ते राखाडी हिरव्या रंगाचे चट्टे / ठिपके दिसतात. कालांतराने ते लांबोळक्या आकाराचे पांढरट ते राखाडी रंगाचे होतील. त्यांना लाल किंवा तपकिरी किनार दिसते. काही वेळा चट्टे / ठिपके मध्यभागी फुगीर तर दोन्ही बाजूला टोकदार असतात. हे चट्टे मोठे मोठे होत जाऊन कालांतराने संपूर्ण पान वाळून जाते. लोंबीच्या दांड्यावरसुद्धा रोगांची लक्षणे दिसतात. त्यामुळे दांडा कुजतो व मोडतो. त्यामुळे अनेकवेळा करपा रोगाला स्थानिक लोक ‘मानमोडी’या नावाने ओळखतात.
करपा व तपकिरी ठिपके या रोगांच्या लक्षणात बरेचदा गोंधळ होतो. त्यातील नेमका फरक असा...
करपा रोगाचे चट्टे सामान्यतः लांबुळके, मध्यभागी फुगीर व दोन्ही बाजूंने टोकदार (डोळ्याच्या आकारासारखे) असतात. तपकिरी ठिपके रोगाच्या लक्षणामध्ये असंख्य चट्टे जास्त गोलाकार व प्रामुख्याने तपकिरी रंगाचे असून त्याला पिवळी किनार असते.
व्यवस्थापन :
नत्र खतांची शिफारशीत मात्रा २ ते ३ टप्प्यांत विभागून द्यावी.
तीव्र स्वरूपाचा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात बांधीतील पाणी वेळोवेळी काढावे.
सिलिकॉनची कमतरता असलेल्या जमिनीत योग्य प्रमाणात कॅल्शिअम सिलिकेट वापरावे किंवा दरवर्षी हंगाम सुरू होताच भाताचे निरोगी काड बांधीत गाडावे. म्हणजे ते पहिल्या पावसापासून ते रोवणीपर्यंत सडून त्यातील सिलिकॉन मातीत मिसळले गेल्याने कमतरता दूर होण्यास मदत होईल.
करपा रोगाची लक्षणे दिसताच, फवारणी प्रति १० लिटर पाणी.
हेक्झाकोनॅझोल (५ टक्के इसी) २० मि.लि. किंवा ट्रायसायक्लाझोल (७५ टक्के भुकटी) ७ ग्रॅम किंवा किटाझीन (४८ टक्के ईसी) १० मि.लि. किंवा क्रेसॉक्झिम मिथाईल (४४.३ टक्के एस. सी.) १० मि.लि. किंवा मॅन्कोझेब (७५ टक्के डब्ल्यू. पी.) ३० मि.लि. किंवा मेटीराम (७० टक्के डब्ल्यू. जी.) ३० मि.लि. किंवा पिकोक्सिस्ट्रॉबीन (२२.५२ टक्के एस. सी.) १० मि.लि. किंवा टेब्युकोनॅझोल (२५.९ टक्के ईसी) १५ मि.लि. किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन (१८.२ टक्के) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४ टक्के एस. सी.) (संयुक्त बुरशीनाशक) १० मि.लि.
आवश्यकता भासल्यास ८ ते १० दिवसांच्या अंतराने दिवसांनी दुसरी फवारणी करावी
डॉ. श्रीकांत ब्राह्मणकर, ९५५२१७९२३९ (सहयोगी प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
डॉ. अनिल कोल्हे, ९९२२९२२२९४ (सहयोगी संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही, जि. चंद्रपूर)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.