Vikramgad Water Problem : विक्रमगड नगरपंचायतीतील महसूल गावे, पाडे, तसेच ओंदे ग्रुप ग्रामपंचायतीला खांड धरणातून पाणी पुरवठा केला जातो. आता या धरणात केवळ ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
त्यामुळे १० महसूल गावे, तसेच १० पाड्यांतील लोकवस्ती या पाण्यावर अवलंबून आहे. आता अन्य काही ग्रामपंचायतीमधील गाव, पाड्यांना धरणातून पाणी पुरवठा करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे विक्रमगड व ओंदे गावपाड्यांवर पाणी टंचाई उद्भवण्याच्या भीतीने अन्य ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात पाणी वळवण्यास स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
खांड बंधाऱ्यातून साखरे, खुडेद, जांभा, पोचाडे, सुकसाळे ग्रामपंचायतीतील गावपाड्यांना पाणी पुरवण्यासाठी ४५ कोटी रुपयांची जलजीवन मिशन योजना मंजूर करण्यात आली आहे.
मात्र या योजनेद्वारे पाणी उचलण्यास ओंदे ग्रामपंचायत, खांड ग्रामदान मंडळ, माण येथील नागरिक, शेतकऱ्यांनी विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला आहे. ओंदे ग्रामपंचायत परिसरातील खांड बंधाऱ्यामध्ये जल जीवन मिशन योजना अंतर्गत या ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा केल्यानंतर बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी होईल, अशी शेतकऱ्यांना भीती आहे.
त्यामुळे ओंदे परिसरात भविष्यात पाणी टंचाई निर्माण होईल, असे सांगण्यात आले. यामुळे धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी येथील ग्रामस्थांनी योजनेद्वारे पाणी उचलण्यास विरोध दर्शवला आहे.
या योजनेला ओंदे ग्रुप ग्रामपंचायतीची लेखी परवानगी न घेता खांड लघू बंधाऱ्यामध्ये योजनेचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले, तसेच संबंधित विभागाला आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही निवेदन सादर केले आहे.
खांड बंधाऱ्यातून पाणी अन्य चार ते पाच ग्रामपंचायतींना जलजीवन मिशन योजनेद्वारे उचलले, तर पाण्याची पातळी कमी होईल व पाणीसाठा संपल्यावर स्थानिक नागरिक, शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागेल. या योजनेद्वारे पाणी उचलण्यास स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असल्याचा ग्रामसभेचा ठराव घेण्यात आला असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा विभागाला त्याची माहिती देणार आहे.स्वप्नील गोविंद, सरपंच, ओंदे ग्रामपंचायत
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.