Chhattrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जून अखेरपर्यंत खरीप पीककर्जपुरवठा करण्याच्या उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ४६ टक्केच कर्जपुरवठा होऊ शकला आहे. यंदाच्या हंगामासाठी मराठवाड्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका व ग्रामीण बँका मिळून सुमारे १२७४५ कोटी रुपये कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
३० जून अखेरपर्यंत या सर्व बँकांना ७ लाख ६८ हजार १८५ शेतकऱ्यांना केवळ ५८९६ कोटी ६७ लाख रुपयांपर्यंत कर्जपुरवठा करणे शक्य झाल्याची स्थिती आहे. राज्यातही ५५८२० कोटी रुपये कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट ठेवलेले असताना सर्व बँकांना मिळून ३० जून अखेरपर्यंत २७ लाख २६ हजार शेतकऱ्यांना २५ हजार ६४१ कोटी रुपये म्हणजे उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ४६ टक्के कर्जपुरवठा करणे शक्य झाले आहे.
विभागनिहाय विचार करता जूनअखेर कोकण विभागात ४१ टक्के, नाशिक विभागात ३८ टक्के, पुणे विभागात ६१ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात ४६ टक्के, अमरावती विभागात ४२ टक्के तर नागपूर विभागात ४४ टक्केच कर्जपुरवठा करण्यात आला आहे. कर्जपुरवठ्यात वाढत चाललेले गुंते पाहता पेरणीपूर्व कर्जपुरवठा, वेळेत कर्जपुरवठा हे मुद्दे पुन्हा एकदा बासनातच राहिल्याची स्थिती आहे.
थकित कर्जाचा मोठा अडथळा?
थकित असलेल्या पूर्वीच्या कर्जामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या कर्जपुरवठ्याचा घोडं अडल्याची स्थिती आहे. शेतकऱ्यांकडे थकित असलेल्या कर्जामुळे त्यांना नव्याने कर्ज द्यावे कसे हा प्रश्न बॅंकांसमोर आहे. फक्त ज्यांना जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात बँक ऑफ महाराष्ट्राने गत हंगामात ४९२ कोटी रुपये कर्जाचे वाटप केले होते. त्यापैकी तब्बल ४६० कोटी रुपये थकीत आहेत. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा विचार करता वाटप केलेले ८३९ कोटींपैकी ५५९ कोटी रुपये थकित आहेत.
संपूर्ण जालना जिल्ह्याचा विचार करता वाटप झालेल्या ३२७८ कोटी १९९७ कोटी म्हणजे जवळपास ६१ टक्के कर्ज परतफेड होणे बाकी आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात यापेक्षा वेगळी स्थिती नाही तिथेही वाटप झालेल्या ३२०० ते ३३०० कोटी रुपये वाटपा पैकी सुमारे दीड हजार कोटी रुपये कर्ज विविध बँकांचे थकले आहे.
शेतकऱ्यांकडे कर्ज थकले म्हणजे उत्पन्न झाले नाही आणि ते भरू शकले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी जोर धरते आहे. थकित कर्जामुळे बॅंकांना शेतकऱ्यांना नव्याने कर्जपुरवठा करण्याचा गुंता सोडविण्यासाठी आता शासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हानिहाय कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट व प्रत्यक्ष कर्जपुरवठा (रक्कम कोटींत)
जिल्हा....उद्दिष्ट....पूर्तता... शेतकरी संख्या
छ. संभाजीनगर... १५६०... ८६५... १,३७,०००
जालना....१३०८... ४२९... ७२,०००
बीड...१७०६....८५१... १,०९,०००
लातूर...२४००... १३००...१,५९,०००
परभणी...१४७१....४६८....५९,०००
हिंगोली...८९२.... ३४४...४८,०००
नांदेड...१८२६.... ९३८...१,०३,०००
धाराशिव...१५८४..... ७०७...८२,०००
पीककर्ज खातेदार आपले कर्ज नियमित फेडून केंद्र व राज्य सरकारच्या ३ लाख रुपयांपर्यंत उपलब्ध असलेल्या व्याज सवलतीचा फायदा घेऊ शकतात. शिवाय दुसऱ्या वर्षी पीककर्जामध्ये १० टक्के वाढीव पीककर्ज बँका देऊ शकतात. बँका पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवताना सध्या घेतलेल्या पीककर्जाचे नूतनीकरण व सर्वसाधारण ५ ते १० टक्के नवीन खातेदार यांचा विचार केला जातो. परंतु सध्या घेतलेल्या पीककर्जाचे नूतनीकरण थांबल्याने उद्दिष्टपूर्ती होताना बँकांना अडचणी निर्माण होत आहेत.- मंगेश केदार, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक, छत्रपती संभाजीनगर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.