Nashik News: मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे सरासरीच्या तुलनेत कांद्याच्या लागवडी कमी होत्या. यंदा समाधानकारक पाऊस असल्याने शेतकऱ्यांचा रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा लागवडीकडे कल दिसून येत आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार (ता. २७) अखेर नाशिक विभागात अडीच लाख हेक्टरवर रब्बी उन्हाळ कांदा लागवडी झाल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत ९० हजार हेक्टरवर या लागवडी वाढल्या आहेत.
यंदा पावसामुळे खरीप व लेट खरीप कांदा हंगाम प्रभावित झाला. त्यातच रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा रोपांचे मॉन्सूनोत्तर पाऊस व धुक्यामुळे नुकसान झाले. मात्र शेतकऱ्यांनी दुबार रोपवाटिका तयार करून लागवडी केल्या. एकीकडे मजूरटंचाई, उत्पादन खर्च वाढ, भारनियमन अशा अडचणी असताना यंदाचे क्षेत्र वाढले. कसमादे भागात काही ठिकाणी रात्री अंधारात लागवडी झाल्याचे पाहायला मिळाले तर अजूनही लागवडी फेब्रुवारी महिन्यातही चालतील असे चित्र आहे.
नाशिक विभागात यंदा सरासरीच्या तुलनेत क्षेत्र वाढले आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे सरासरीपेक्षा ३४ हजार हेक्टरने लागवडी कमी होत्या; यंदा वाढ दिसून येत आहे. नाशिकमध्ये ३१ हजार हेक्टर, धुळे जिल्ह्यात ४ हजार, नंदुरबार जिल्ह्यात १ हजार २००, तर अपवाद जळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा २ हजार १०० हेक्टर कमी लागवडी असल्याचे चित्र आहे. काही लागवडीमध्ये वातावरणीय बदलाचा फटका आहे. त्यात जानेवारीच्या मध्यावधीपर्यंत ढगाळ वातावरण, धुके यांच्यामुळे करपा आणि तुडतुडे यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर काही ठिकाणी तणनाशक वापरल्याने नुकसान दिसून येत आहे.
गेल्या दोन वर्षांतील लागवड स्थिती (हेक्टरमध्ये)
जिल्हा...सरासरी क्षेत्र...२०२३-२४...२०२४-२५
नाशिक...१,९३,१७३.५५...१,४१,९८१...२,२४,३३०
धुळे...१६,४९५...१५,३०१...२०,५७०
नंदुरबार...२,६५४...२,८२६.९३...३,८८३
जळगाव...१०,२१३...७,१७६.६०...८,०६४
एकूण...२,२२,५३५.५५...१,६७,२८६...२,५६,८४७
लागवडी सुरूच; अजून क्षेत्र वाढीची स्थिती
नाशिक विभागात उन्हाळ कांदा लागवडीचे सरासरी क्षेत्र २,२२,५३५.५५ हेक्टर इतके आहे. यंदा २,५६,९४७ हेक्टरवर लागवडी असून, सरासरीच्या तुलनेत (ता. २७) अखेर ३४,४१२ हेक्टर इतक्या लागवडी वाढल्या आहेत. अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे कांदा रोपे उपलब्ध असून, मजुरांच्या उपलब्धतेनुसार लागवडी सुरू आहेत. त्यामुळे लागवडीत अजून वाढ होऊ शकते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
यंदा लागवडी वाढल्या; मात्र दरवर्षीच्या तुलनेत लांबणीवर गेल्या आहेत. मॉन्सूनोत्तर पावसामुळे रोपांचे नुकसान झाल्याने दुबार रोपवाटिका तयार करून लागवडी होत आहेत. मात्र उष्णता वाढीमुळे हंगाम प्रभावित होत आहे.मधुकर मोरे, कांदा उत्पादक, मोरेनगर, ता. सटाणा
लागवडी वाढल्या असल्या तरी उत्पादकता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हवामान बदल, कीड, रोग या बाबी महत्त्वाच्या असून त्यावर उत्पादन व गुणवत्ता अवलंबून राहील. तरीही शेतकरी व ग्राहक या दोन्ही घटकांचा विचार करून शासकीय स्तरावर साठवणूक सुविधा, निर्यात धोरण यावर काम होणे गरजेचे आहे.डॉ. सतीश भोंडे, ज्येष्ठ कांदा पीक शास्त्रज्ञ
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.