Pune News : लोकसभा निवडणूक २०२४ च्या पाचव्या टप्प्याच्या प्रचाराचा जोर वाढला आहे. नाशिकसह कल्याण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (ता.१५) प्रचारासाठी येणार असून नाशिक आणि कल्याण येथे ते जनसभेला संबोधित करतील. तसेच मुंबईत मोदींचा रोड शो होणार आहे. यादरम्यान कांद्याची बाजारपेठ असणाऱ्या लासलगावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले आहे. यावरून पोलिसांनी १५ शेतकऱ्यांनी ताब्यात घेतले असून एका वॉट्स ग्रुप अॅडमिनला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लोकसभा निवडणूक २०२४च्या पाचव्या टप्प्यासाठी २० मे ला मतदान होणार आहे. यासाठी सध्या सत्ताधारी भाजपसह विरोधकांकडून प्रचाराचा धुरळा उडवला जात आहे. पाचव्या टप्प्यात मुंबई ठाण्यासह महाराष्ट्रातील अन्य मतदारसंघात मतदान होणार आहे. यासाठी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट मैदानात उतरवण्यात आले आहे. मोदी यांच्या दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी नाशिकच्या पिंपळगाव येथे जनसभा होणार आहे. दिंडोरीतून भाजपाच्या भारती पवार तर नाशिक मधून शिवसेनेचे हेमंत गोडसे महायुतीचे उमेदवार असून सध्या पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
यादरम्यान लासलगावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून पंतप्रधान मोदींसह केंद्र सरकारच्या कांदाविरोधी धोरणांचा निषेध केला आहे. तसेच आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी कांदा निर्यात बंदी पूर्णपणे हटवावी अशी प्रमुख मागणी केली आहे.
मोदी यांच्या दौऱ्याचा पार्श्वभूमीवर शेतकरी संघटेनच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा याआधीच धाडण्यात आल्याच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप यांनी आरोप केले होते. तर एबीपी माझाच्या वृत्तानुसार आज नाशिकच्या पिंपळगाव येथे होणाऱ्या सभेच्या आधी काही शेतकऱ्यांसह नेत्यांना नजरकैदीत ठेवले जात असल्याचे समोर आले आहे. तसेच कांदा निर्यात बंदी केल्याने सर्वाधिक नुकसान हे नाशिकसह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे झाले होते. यावरून मोदींच्या दौऱ्याला विरोध म्हणून शेतकऱ्यांनी आज आंदोलन केले.
आज मोदींच्या विरोधान लासलगाव कांदा उत्पादक शेतकरी, लासलगाव शहरविकास आघाडीसह शेतकरी संघटेनच्या पदाधिकाऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन केले. यावरून पोलिसांनी १५ शेतकऱ्यांनी ताब्यात घेतले असून २० शेतकऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच एका वॉट्स ग्रुप अॅडमिनला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यावरून शेतकऱ्यांना सभेला जाऊ देत नसेल तर मग सभा कशाला घेता असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष जगताप यांनी भाजपला केला आहे. तसेच जगताप यांनी, मोदी पाकिस्तान आणि चीनला घाबरत नाहीत, मग मग शेतकऱ्यांची भीती का वाटते? शेतकऱ्यांना विनाकारण पोलिसांकडून त्रास का दिला जातोय? अशी विचारणा त्यांनी केली आहे.
तसेच ‘शेतीचे उत्पन्न दुप्पट करून त्याला योग्य भाव देऊ,’ अशी घोषणा करणाऱ्या मोदींना जाब विचारायला या सभेत शेतकऱ्यांनी यावे असे आवाहन निफाड तालुका शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आले आहे.
मोदींनी कांदाप्रश्नी आश्वासन देऊनही कुठलेही ठोस निर्णय झालेले नाहीत. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यावरून शिवसेनेकडून आता मोदींना घेरले जात आहे.
तसेच ‘शेतीसह शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू म्हणाणाऱ्या मोदींनी दहा वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का, योग्य हमीभाव का असा सवाल केला आहे. तर उलट कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांचे कष्ट मातीत घालण्याचे काम मोदींनी केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.