Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट

Team Agrowon

Pune News : अवकाळी पावसामुळे शेतीमालाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे आता अंतिम टप्प्यात आहेत. २८ जिल्ह्यांमधील अंदाजे एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

‘‘गेल्या महिन्यात राज्यात अनेक जिल्ह्यांना तीन ते चार वेळा अवकाळी पावसाने झोडपले आहे. काही भागांमध्ये गारपीट व वादळी वारे झाल्यामुळे उभ्या पिकांचे तसेच फळबागांचे नुकसान झाले. सार्वजनिक सुट्ट्या व निवडणुकांचा माहोल असल्यामुळे अनेक भागांमध्ये पंचनामे वेळेत होऊ शकले नाही. परंतु एकूण नुकसानीचे क्षेत्र एक लाखाच्या आसपास राहू शकते. त्यापैकी एकट्या अमरावती जिल्ह्यात झालेले नुकसान ५६ हजार हेक्टरहून अधिक आहे,’’ अशी माहिती शासकीय सूत्रांनी दिली.

राज्य शासनाकडे २५ एप्रिलअखेरपर्यंत झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीचा आकडा ९५ हजार हेक्टरच्या पुढे आहे. अवकाळी पाऊस किंवा गारपीट झाल्यास कृषी विभागाकडून नजरपाहणीच्या आधारे पीकहानीचे आकडे निश्‍चित केले जातात. या आकडेवारीच्या आधारे राज्य शासनाला प्राथमिक अहवाल पाठविला जातो.

दुसऱ्या बाजूला कृषी, ग्रामविकास आणि महसूल विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष पंचनामे केले जातात. त्याआधारे मदत व पुनर्वसन विभागाला अंतिम अहवाल पाठविला जातो. कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले, की पीकनुकसानीचे अंतिम अहवाल अजून तयार झालेले नाहीत.

सर्व जिल्ह्यांचे अहवाल येताच राज्य शासनाला एकत्रित माहिती दिली जाईल. मदत व पुनर्वसन विभागाकडून ही माहिती राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवली जाईल. त्यानंतर मदत वाटपाबाबत धोरणात्मक निर्णय होईल.

सद्यःस्थितीत राज्यात झालेल्या नुकसानीबाबत राज्य नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद निधीच्या नियमावलीनुसार कामकाज चालू आहे. प्रत्यक्ष मॉन्सूनचे आगमन होण्यापूर्वी राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस झाल्यास नुकसानीचा आकडा वाढू शकतो. कारण यंदा तीव्र उन्हामुळे फळबागा मोठ्या प्रमाणात कमकुवत झालेल्या आहेत.

पावसाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमरावती जिल्ह्यात गहू, हरभरा, ज्वारी, तीळ, भाजीपाला, आंबा, संत्रा, लिंबू, मोसंबी, केळी व पपई बागांचे नुकसान झालेले आहे. याशिवाय वर्धा जिल्ह्यातील ५२८ हेक्टर, नागपूर ९८ हेक्टर, भंडारा २५७ हेक्टर, गोंदिया ४५ हेक्टर, चंद्रपूर ७८ तर गडचिरोलीतील ४० हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. पुण्याच्या जुन्नर, मुळशी, खेड, हवेली, बारामती तालुक्यातील ११७ हेक्टरवरील पिके वाया गेली आहेत. अहमदनगर जिल्ह्यात २८२ हेक्टर, सांगली २९४ हेक्टर, नाशिक ७२० हेक्टर, धुळे २२२ हेक्टर तर नंदुरबारमधील १२२ हेक्टर आणि छत्रपती संभाजीनगर भागातील १६३ हेक्टरवरील पिके पावसाने नष्ट झाली आहेत.

अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशीममध्ये जास्त नुकसान

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यात ११३४९ हेक्टर, तर यवतमाळ २५२४ हेक्टर, अमरावती ५६०९६ हेक्टर, बुलडाणा ९९४३ हेक्टर, वाशीम ३९५५ हेक्टर, बीड १०२१ हेक्टर, सोलापूर १६०६ हेक्टर तर जळगाव जिल्ह्यातील ४६०० हेक्टरवरील केळी, आंबा, पपई, लिंबू, भाजीपाला यांसह ज्वारी, बाजरी, गहू आणि मक्याचे नुकसान झालेले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT