Nagpur News : ‘‘फळांच्या दर्जाकडे लक्ष दिल्यास अपेक्षित उत्पादन मिळविणे शक्य होते. त्या आधारेच इस्राईलच्या शेतकऱ्यांनी युरोप आणि अमेरिकेची बाजारपेठ काबीज केली. त्यातून प्रति फळ एक युरो असा दर मिळविण्यात ते यशस्वी झाले,’’ अशी माहिती इंडो-इस्राईल प्रकल्पाचे समन्वयक ऊरी रॉबिनस्टंन यांनी दिली.
नागपूर दौऱ्यावर असलेल्या ऊरी रॉबिनस्टंन यांनी ‘ॲग्रोवन’शी संवाद साधला. ते म्हणाले, की इस्राईलमध्ये सुमारे ४० हजार एकरांवर लिंबूवर्गीय फळपिकाची लागवड आहे. यातील बहुतांशी क्षेत्र हे संत्रा फळपिकाखालील आहे. जाफा जातीच्या संत्रा वाणाची लागवड आणि व्यवस्थापन होते. त्याद्वारे एकरी १२ टन इतकी उत्पादकता मिळते.
मोसंबीवर्गीय ग्रेप फ्रुटखालील क्षेत्र देखील इस्राईलमध्ये असून त्याची उत्पादकता १२० टन प्रति हेक्टर इतकी प्रचंड आहे. फर्टिगेशन, सुक्ष्म सिंचनाचा अवलंब या मूलभूत बाबींवर या ठिकाणी भर दिला जातो. पाऊस अत्यल्प होतो त्यामुळे पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व जपले जाते. त्यामुळे जल वितरणाची संपूर्ण यंत्रणा सरकारच्या नियंत्रणात आहे. शेतीसाठीच्या पाण्याकरिता शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागतात.
एक क्युबिक मिटर (२०० लिटर) पाण्यासाठी २.५ डॉलर (साधारणतः २१३ रुपये) असा दर द्यावा लागतो. पाण्यासाठी जितके पैसे मोजले तितकेच पाणी मिळते. त्यामुळे पाटपाणी ही संकल्पनाच इस्राईल शेतकऱ्यांना माहिती नाही. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा नियोजनबद्ध वापर व्हावा याकरिता सुक्ष्म सिंचनाचा वापर होतो.
बेडवरील संत्रा लागवडीचे देखील अनेक फायदे आहेत. या पर्यायातून अतिरिक्त पाणी बागेच्या बाहेर निघण्यास मदत होते. अशा छोट्या बाबीदेखील फळपिकाच्या व्यवस्थापनात मोलाच्या ठरतात. यातूनच फळांचा दर्जा राखला जातो. अशा फळांना चांगला परतावा मिळत असल्यानेच इस्राईलमध्ये शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे शासकीय अनुदान दिले जात नाही, अशी पुष्टीही त्यांनी केली.
‘सिट्रस ऑर्गनायझेशनद्वारे कीड नियंत्रण’
‘‘कीडरोग नियंत्रणासाठी सिट्रस ऑर्गनायझेशन ही सरकारच्या नियंत्रणातील संस्था आहे. शासनस्तरावर ठरावीक शुल्काचा भरणा केल्यानंतर सिट्रस ऑर्गेनायझेशनचे प्रतिनिधी तुमच्या शिवाराला भेट देत कोणत्या प्रकारच्या उपायांची गरज आहे. याची माहिती घेतात. त्याआधारे कीडरोगाचा अंदाज घेत विमानाद्वारे फवारणी केली जाते,’’ असेही ऊरी यांनी सांगितले.
शेतात गेल्यावर तेथील झाडे, माती यांच्याशी संपर्क आलाच पाहिजे. पीक आपल्याशी बोलले पाहिजे. त्याआधारे त्याच्या गरजा कळतील. तंत्रज्ञानाचे देखील असेच असून संबंधित तंत्रज्ञानाची गरज आणि उपयोगिता लक्षात घेऊनच त्यांचा अंगीकार झाला तरच ते शेतीक्षेत्रात फायदेशीर ठरणार आहे.- ऊरी रॉबिनस्टंन, इंडो-इस्राईल प्रकल्पाचे समन्वयक, दिल्ली
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.