
डॉ. सुरेंद्र पाटील, डॉ. नरेंद्र रामटेके
Cold Weather Tips : मागील काही वर्षांत सातत्याने हवामान बदलाचा प्रभाव दिसून येत आहे. अति उष्ण उन्हाळा, अवेळी अतिमुसळधार पाऊस, गारपीट यासह तापमानात अचानक होणारी घसरण आदी हवामान बदल दिसून येत आहेत. किमान तापमानात झालेल्या घसरणीचे विविध पिकांसह फळपिकांवर देखील विपरीत परिणाम होतात. तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यानंतर उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील फळझाडांची कार्यशक्ती कमी होते.
मागील काही दिवसांपासून किमान तापमानात मोठी घसरण होत आहे. कमी झालेल्या तापमानामुळे झाडांच्या पानांना इजा होऊन ती वाळल्यासारखी दिसतात. फळांना भेगा पडतात, फळे काळी पडतात. अशी विविध परिणाम फळपिकांवर दिसून येतात. हे परिणाम टाळण्यासाठी सद्यःस्थितीत फळबागांची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
कमी झालेल्या तापमानाचे होणारे परिणाम
ब्लॅक हार्ट : या प्रकारात झाडाच्या खोडाचा व फांद्यांचा मध्यभाग काळपट होतो. परंतु बाहेरील साल सुस्थितीत असते. ही विकृती मुख्यत्वे रोपवाटिकेतील फळांच्या रोपांमध्ये दिसून येते.
खोडाला इजा होणे : यामध्ये खोडाची जमिनीलगतची साल तडकते. अति थंडी वातावरणामुळे पेशीतील पाणी गोठते. त्यामुळे पेशी फाटतात. तसेच मुळांना सुद्धा तडे जातात.
चिलिंग इंजुरी : खूप कमी तापमानात झाडाच्या चयापचय क्रियेत अडथळा निर्माण होऊन या प्रकारची इजा होते.
फ्रीजिंग इंजुरी : गोठणबिंदूच्या खाली तापमान गेल्यास अशा प्रकारची इजा झाडांना होते. पेशीच्या आतील आणि बाहेरील पाण्याचे बर्फाचे स्फटिक तयार होतात. झाडातील पाणी आणि अन्नद्रव्यांच्या वहनात अवरोध निर्माण होऊन झाड वाळते. पेशीतील द्रव्य थंडीमुळे गोठल्याने झाडे मरतात.
विंटर किलिंग : कमी तापमानात सदाहरित फळझाडे पाणी कमी प्रमाणात शोषण करतात. थंड आणि कोरड्या हवेमुळे पाण्याचे विसर्जन जास्त होते आणि झाडे वाळतात. थंड आणि कोरडी हवा काही दिवस सतत वाहत राहिली तर लहान झाडांमध्ये पाण्याचे विसर्जन जास्त होऊन झाडे मृत पावतात.
प्रतिबंधात्मक उपाय
बागेच्या पश्चिम व दक्षिण दिशेला मलबेरी, शेवगा, हादगा, पांगारा, शेवरी, बांबू यांसारख्या वारा प्रतिबंधक वृक्षांची लागवड करावी.
बागेभोवती चिलार, मेहंदी, करवंद इत्यादी मध्यम उंचीच्या झाडांची लागवड करून सजीव कुंपण तयार करावे. या झाडाची सतत निगा राखून छाटणी करावी.
मुख्य फळझाडे लहान असतील, तर रब्बी हंगामात दोन झाडांमधील मोकळ्या जागेत दाट पसरणाऱ्या हरभरा, फ्रेंचबीन्स, वाटाणा, पानकोबी इत्यादी आंतरपिके घ्यावीत.
नियंत्रणाचे उपाय
थंडीची लाट येण्यापूर्वी स्थानिक हवामान केंद्रामार्फत हवामानविषयक माहिती दिली जाते. कडाक्याची थंडीची माहिती मिळताच, फळबागांमध्ये त्वरित उपाययोजना कराव्यात.
फळबागेमध्ये शक्यतो सायंकाळी विहिरीच्या पाण्याने ओलित करावे. कारण विहिरीच्या पाण्याचे तापमान हे कालव्याच्या पाण्यापेक्षा थोडे जास्त असते. त्यामुळे बागेमधील तापमान वाढण्यास मदत होते.
झाडाच्या खोडाजवळ व आळ्यात तणीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तूस इत्यादींचे आच्छादन करावे.
रोपवाटिकेतील रोपे, कलमे, बियाण्यांचे वाफे यावर तनिस, गवत, तुराट्याचे खोपटे किंवा यांचे छप्पर उभारावे. असे छप्पर सायंकाळी पाच वाजता घालून सकाळी काढून घ्यावे. म्हणजे दिवसभर रोपांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल. छप्पर करण्यासाठी शक्य असल्यास काळ्या पॉलिथिनचा वापर करावा. रात्रीचे वेळी फळबागेत जागोजागी ओला पालापाचोळा पेटवून धूर करावा. त्यामुळे बागेचे तापमान वाढण्यास मदत होते.
पालाशयुक्त खते, वरखते, म्युरेट ऑफ पोटॅश ही खते किंवा लाकडी कोळशाची राख दिल्यास झाडाची पाणी व अन्नद्रव्ये शोषण करण्याची आणि वहन करण्याची क्षमता वाढते. तसेच झाडांची काटकताही वाढते.
अति थंडीच्या काळात झाडावर पाण्याचा फवारा मारावा. पाण्याच्या फवाऱ्याने झाडांच्या पानातील तापमान योग्य राहून अति थंडी पासून त्यांचे संरक्षण होण्यास मदत मिळते. नवीन फळझाडांची लागवड करताना भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध होईल, अशा जागेची निवड करावी. जेणेकरून हिवाळ्यात काही प्रमाणात झाडांचा त्याचा फायदा होईल.
- डॉ. सुरेंद्र पाटील, ९८८१७ ३५३५३, (फळशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.