Nagpur News : नोव्हेंबर महिन्यात झालेला वादळी पाऊस, गारपिटीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांचे हिवाळी अधिवेशनाकडे लक्ष लागून राहिले होते. मात्र विरोधक तोंडात बोटे घालतील अशी मदत जाहीर करू, असे जाहीर सभेच्या छापाचे उत्तर मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी दिले. मात्र ना मदत जाहीर झाली ना विरोधकांनी तोंडात बोटे घातली.
पहिले दोन दिवस आणि दुसरा आठवडा उलटला तरीही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत केवळ भाकड चर्चा ऐकण्यापलीकडे हातात काहीही उरले नाही. शेतीच्या प्रश्नावरील अल्पकालीन चर्चा संपून आठवडा उलटला तरीही अद्याप शेतकऱ्यांना मदत जाहीर न झाल्याने आता उरलेल्या तीन दिवसांत काय होते ते पाहावे लागणार आहे. अधिवेशनाचा शेवटचा आठवडा असून, आता लोकसभा निवडणुकीआधी फायद्याच्या ठरणाऱ्या घोषणांनी शेवटचा आठवडा लक्षात राहील असे दिसते.
अल्पकालीन चर्चा संपल्यानंतर विरोधकांनी या प्रश्नांवर सरकार कधी उत्तर देणार असे विचारले असता मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी ‘तोंडात बोटे घालाल, अशी मदत मुख्यमंत्री शुक्रवारी जाहीर करतील,’ असे सांगून वेळ मारून नेली. विरोधकांची शस्त्रे इतकी बोथट झाली, की त्यांनी ना याचा जाब विचारला ना सरकारला घेरले. वादळी पावसाने राज्यातील आठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
दुष्काळाच्या झळा सहन करत हातातोंडाशी आलेले थोडेफार पीकही अवकाळीने गिळले. पीकविम्याच्या अग्रिमचे आकडे फेकले जात असले तरी पीकविम्यावरून शेतकऱ्यांत तीव्र भावना आहेत. एक रुपयातील पीकविम्याचा कितीही गाजावाजा केला तरीही पीकविमा हा सरकारच्या गळ्याशी आला हे नक्की आहे.
नुकसान, पीकविमा आणि पिण्याच्या पाण्याचा मुद्दा हा सर्वच सदस्यांच्या भाषणातील गाभा होता. मात्र सरकारने शेतीप्रश्न आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा घेऊन अधिवेानातील एक आठवडा ढकलला.
शेती प्रश्नावरील अल्पकालीन चर्चेनंतर लगेचच मराठा आरक्षणावरील चर्चेला सुरुवात केली. मात्र विरोधकांनी तोंडी लावण्यापुरता विरोध केला आणि मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी जाहीर सभेत भाषण करावे, त्यापद्धतीने डॉयलॉगबाजी करत उत्तर दिले आणि विरोधकांचेही समाधान झाले.
या आठवड्यातील शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देतील असे सांगितले होते. मात्र सुट्टीचे वेध लागलेले बहुतांश आमदार सकाळीच सही करून निघून गेले होते. मुख्यमंत्रीही सभागृहात नसल्याने उत्तराचा प्रश्नच नव्हता. सरकारने उत्तर दिले नाही तरीही विरोधकांनी तोंड उघडले नाही हे विशेष.
विदर्भावर चर्चाच नाही
वादळी पाऊस आणि गारपिटीने विदर्भातील शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्याबरोबरच हिवाळी अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र या अधिवेशनात विदर्भातील एकाही विषयावर चर्चा झाली नाही. शेती आणि मराठा आरक्षणाच्या विषयावरील त्याच त्याच भाषणांनी अधिवेशन नीरस झाले. भास्कर जाधव, बच्चू कडू, कैलास पाटील, अशोक पवार, हरिभाऊ बागडे, आशिष शेलार यांचे अपवाद वगळता, अन्य भाषणांत तेच तेच विषय येत होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.