Cultivation of Nishigandha Agrowon
ॲग्रो विशेष

Floriculture : शाश्‍वत उत्पन्नासाठी निशिगंध ठरले फायदेशीर

Team Agrowon

शेतकरी : सोमा म्हेत्रे

पुणे जिल्ह्यातील सोमा म्हेत्रे (रा. नारायगाव) यांची स्वमालकीची आणि खंडाने करत असलेली अशी मिळून एकूण ६ एकर शेती आहे. त्यातील ४ एकरांत ऊस तर दोन एकरांमध्ये निशिगंध (गुलछडी) लागवड आहे. एकदा निशिगंध लागवड केल्यानंतर सलग किमान तीन वर्षांपर्यंत यापासून शाश्वत फूल उत्पादन मिळत राहते. त्यामुळे दुग्ध व्यवसायाप्रमाणेच दैनंदिन उत्पन्न या फुलपिकापासून मिळते. त्यामुळे निशिगंध लागवड आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

लागवड नियोजन

लागवडीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत ३ ट्रॉली आणि १ ट्रॉली मळी प्रति एकर प्रमाणे शेतात पसरवून घेतले जाते. त्यानंतर ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी करून उभी आडवी फणणी केली जाते.

लागवडीसाठी रोटर मारून साडे चार फुटांचे बेड तयार केले जातात.

बेड तयार झाल्यावर रासायनिक खतांचे बेसल डोस दिले. त्यात सिंगल सुपर फॉस्फेट, २४-२४-०, निंबोळी पेंड, जैविक खत यांच्या मात्रा दिल्या जातात.

रासायनिक खतांचे बेसल डोस दिल्यावर पुन्हा रोटर मारून बेड व्यवस्थित करून घेण्यात येतात.

सिंचनासाठी बेडवर ठिबकच्या नळ्या अंथरल्या जातात.

त्यानंतर साधारण १ फूट अंतर गुलछडीचे चार कंद एकत्रित लावून घेतले. एक एकर लागवडीसाठी साधारण २५ पोती कंद म्हणजेच एकरी साधारण १ हजार ते १२०० किलो कंद लागतात.

संपूर्ण क्षेत्रातील लागवड पूर्ण झाल्यावर ठिबकद्वारे सिंचन केले जाते.

सध्या श्री. म्हेत्रे यांच्याकडे मागील वर्षी मार्च महिन्यात लागवड केलेली आणि या वर्षी एप्रिलमध्ये केलेली निशिगंध लागवड आहे.

सध्या दोन्ही प्लॉटमधून फुलांचे उत्पादन मिळत आहे.

खत व्यवस्थापन

लागवडीनंतर कंदाच्या वाढीसाठी १२-६१-० तर दर्जेदार फुटव्यांसाठी १३-४०१३ या खतांच्या मात्रा दर ८ ते १० दिवसांच्या अंतराने ड्रीपद्वारे दिले जाते.

फुलांचे उत्पादन सुरु झाल्यावर ०-५२-३४ आणि ०-६०-२० या खतांच्या मात्रा ड्रीपद्वारे ८ ते १५ दिवसांच्या अंतराने दिल्या जातात.

कीड-रोग व्यवस्थापन

निशिगंध फुलपिकामध्ये प्रामुख्याने फुले खाणारी अळी, मावा, तांबेरा, करपा या कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. नियंत्रणासाठी पिकाचे नियमित निरिक्षण करून रासायनिक फवारणीचे नियोजन केले जाते.

कळी लागल्यावर प्रादुर्भाव जास्त वाढल्यास फुलांचा दर्जा खालावतो. त्यामुळे नियमितपणे १५ दिवसांच्या अंतराने प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या जातात.

लागवडीनंतरचे नियोजन

दांड्यावरील फुले संपल्यावर एकदा छाटणी केली जाते. त्यामुळे पुढील कळी धारणा होण्याचा जोम वाढतो.

जमिनीतील वाफसा स्थिती आणि पिकाची पाण्याची गरज यांचा अंदाज घेऊन दर दोन ते तीन दिवसांनी ठिबकद्वारे सिंचन केले जाते.

तीन महिन्यांनी उत्पादनाला सुरुवात

लागवडीनंतर साधारण तीन महिन्यांनी फुले काढणीस येतात. पूर्ण वाढ झालेल्या फुलांचे पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू झाल्यावर टप्प्याटप्प्याने फूल काढणीस सुरुवात केली जाते.

पहिल्या तोड्यास साधारण १ किलो प्रमाणे उत्पादन मिळते.

साधारण सहा ते नऊ महिन्यांनी दररोज सुमारे ५० किलोपर्यंत निशिगंध फुलांचे उत्पादन मिळते. हे उत्पादन सलग तीन वर्षे नियमित राहते. विविध सणासमारंभाच्या काळात बाजारात फुलांना चांगली मागणी असून दरही चांगला मिळतो.

सलग तीन वर्षे मिळते उत्पादन

निशिगंध कंदाची एकदा लागवड केल्यानंतर साधारण तीन वर्षे सलग फुलांचे उत्पादन सुरू राहते. दर्जेदार फुलांच्या उत्पादनासाठी आठवड्याच्या अंतराने खुरपणीची कामे, फुलांच्या फुगणवीसाठी आणि झाडांच्या आरोग्यासाठी खतांची मात्रा यात सातत्य राखले जाते. कीड-रोग नियंत्रणासाठी गरजेनुसार फवारणीचे नियोजन केली जाते.

काढणी पद्धत

निशिगंध फुलांची काढणी ही सकाळी लवकर म्हणजे पहाटे सहा ते सात वाजेपर्यंत पूर्ण केली जाते. कारण, भर उन्हामध्ये फुलांची काढणी केल्यास त्यांचा दर्जा खालावतो. उन्हामुळे कळी फुलते आणि कळी फुलल्यानंतर वाहतुकीमध्ये दर्जा खालावतो. यामुळे कळी अवस्थेमध्येच फुल काढणी करणे आवश्यक असते.

पहाटेच्या वेळी फुलांची काढणी केल्यामुळे दर्जा चांगला राखला जाऊन दरही चांगले मिळतात. यासाठी योग्य वेळेत नियोजनपूर्वक काढणी महत्त्वाची असल्याचे श्री. म्हेत्रे यांनी सांगितले.

विक्री नियोजन

नारायणगाव येथील स्थानिक फुल आणि हार विक्रेत्यांना फुलांची विक्री केली जाते. त्याशिवाय उत्पादित फुलांच्या साधारण ५० टक्के फुले ही मुंबई येथील दादर बाजारात विक्रीसाठी पाठविली जातात. दादर येथील मार्केटमध्ये साधारण प्रति किलो फुलांना साधारण १०० रुपये दर मिळतो.

गणेशोत्सव, नवरात्री, दसरा, दिवाळी या सणांच्या कालावधीत प्रतिकिलो फुलांस ३०० ते ५०० रुपयांपर्यंत दर मिळतो. वर्षभरातील सरासरी दर १०० ते १५० रुपये इतका कायम राहत असल्याचा श्री. म्‍हेत्रे यांचा अनुभव आहे.

- सोमा म्हेत्रे, ७५८८०७१२६८, (शब्दांकन ः गणेश कोरे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement Center : मका, सोयाबीन किमान आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करावीत

Rabi Season 2024 : शेतात गाळ, माती, शेणखत टाकण्यास वेग

Solapur DPDC Meeting : ‘जिल्हा वार्षिक’मधील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवा

Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

Kasuri Methi Market: जास्त उत्पादन देणारी कसुरी मेथीची शेती कशी कराल ?

SCROLL FOR NEXT