School Agrowon
ॲग्रो विशेष

Sport School: स्पोर्ट्स स्कूल सुरू करायची गरज!

Sport Development: अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील मुलांनी जिल्हा क्रीडा स्पर्धांमध्ये कमालीची कामगिरी केली. मात्र अशा गुणवत्ता असलेल्या मुलांना योग्य प्रशिक्षण, पोषण व मार्गदर्शन मिळाले तर ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचू शकतात.

Team Agrowon

Rural Sport Infrastructure: अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जिल्हा पातळीवरील स्पर्धा नुकत्याच पार पडल्यात. आमच्या अकोले तालुक्यातील आदिवासी भागातल्या काटक पोरापोरींनी धावणे, उंच उडी, लांब उडी खो खो आणि इतर काही क्रीडा प्रकारांमध्ये चमकदार आणि धमाल कामगिरी करून दाखवलीय. विशेष हे की शंभर मीटर धावताना एका मुलाने इतर खेळाडूंना बरेच मागे सोडले होते!अनेक प्रकारच्या अभावांवर मात करत ही गरीब कुटुंबातली पोरं जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकताहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेला धड मैदान नसताना, खेळाचे शिक्षक नसताना, माध्यमिक शाळांना मिळते तसे मैदानासाठीचे अनुदान दिले जात नसतानाही मुलं चांगली कामगिरी करून दाखवताहेत, हे केवढे मोठे आशादायी चित्र आहे.

प्रचंड गुणवत्ता, थक्क करणारी अचाट आणि अफाट क्षमता, विलक्षण चिकाटी असलेली ही जिगरबाज पोरं प्राथमिक, माध्यमिक शाळेत असताना शालेय पातळीवरील स्पर्धेत चमकतात आणि भूतकाळाच्या अंधारात कुठं तरी गुडूप होऊन इतिहासजमा होऊन जातात. कारण असे की तालुका आणि जिल्हा पातळीवरील स्पर्धा झाल्या की प्लॅटफॉर्म नसल्याने या चपळ मुलांमधले 'क्रीडा नैपुण्य' लुप्त होऊन जाते. या उपजत टॅलेंट असलेल्या पोरापोरींना हेरून नीट मार्गदर्शन केल्यास चमत्कार करून दाखवण्याची क्षमता या मुलांमध्ये नक्की आहे. क्रीडा प्रबोधिनी मार्फत होणारी निवड प्रक्रिया सर्व गुणी खेळाडूंना माहीत होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. बरं तिथले लॉबिंग आणखी वेगळे असते.

यासाठी जिल्हा किंवा विभागाच्या पातळीवर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया 'साई'च्या धर्तीवर निवासी शाळा(स्पोर्ट्स स्कूल) स्थापन करून मुलांना क्रीडा प्रकाराचे ताकदीनं प्रशिक्षण दिल्यास, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर सराव करून घेतल्यास, भौतिक सोयीसुविधा पुरवल्या आणि उत्तम खुराक दिल्यास ही पोरं कविता राऊत, मेरी कोम यांच्यासारखे राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळू शकतात. राज्य आणि देशाला लौकिक मिळवून देण्याची प्रचंड क्षमता या मुलांमध्ये नक्की आहे. क्रीडा मंत्रालयाने स्वतंत्र आर्थिक तरतूद करायला हवी. कॉर्पोरेट सोशल रेस्पोंसिबिलिटी(CSR) मधून यासाठी काही निधी उभा करता येईल. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी.

बुद्धिमत्ता म्हणजे केवळ पुस्तके वाचणे, पाठांतर करणे, गुंतागुंतीच्या गणिती क्रिया करणे, फाडफाड इंग्रजी बोलणे, लिहिणे, परीक्षेत चांगले गुण मिळवणे इतकेच नसते. बहुविध बुद्धिमत्तावाला सिद्धांत सांगतो की, एक प्रकारची नसते त्या बुद्धिमत्ता विविध(आठ/दहा) प्रकारच्या असतात!

सगळी मुलं काही इंजिनीअर, डॉक्टर, अधिकारी किंवा असेच काहीतरी होत नसतात. खेळातील गुणवत्ता, उत्तुंग भरारी घेण्याचे सामर्थ्य आणि त्यासाठी तोडीस तोड शारीरिक क्षमता असूनही स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची संधी हजारो मुलांना आयुष्यभर मिळत नाही ही अत्यंत खेदाची बाब म्हणावी लागेल... आपल्या पोरांना खेळाडू म्हणून घडवायचं पालकांनी ठरवलं तरी ही बाब अत्यंत खर्चिक आणि त्याहून अवघड असते. ग्रामीण भागात प्रशिक्षक मिळत नाहीत. खर्च परवडत नाही. वेळ देता येणे शक्य नसते.

केरळमधील अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या आणि सध्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या विग्नेश पुथुर याने परवा क्रिकेट खेळताना सुंदर गोलंदाजी करत क्रीडा रसिकांचे लक्ष वेधून घेतले. कोणतीही मोठी स्पर्धा खेळलेला नसताना त्याला असेच कोणीतरी बघितले, हेरले आणि थेट आफ्रिकेत नेऊन प्रशिक्षण दिल्याची बातमी वाचनात आली.

ऑलिंपिक पदक तालिकेमध्ये भारताचे नाव शोधून सापडत नाही. चीनमध्ये आयोजित केलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत यजमान देशाने पदकांची लयलूट केली होती. त्यामागील रहस्य समजून घेतलं तेव्हा लक्षात आलं की शाळेत प्रवेश घेतल्यापासून एकेका खेळाडूवर किती विचारपूर्वक मोठं काम केलं होतं. 'दे रे हरी खाटल्यावरी' अशी आमच्या समाजाची विचित्र उदासीन मानसिकता आहे!

आजच्या काळात महत्त्वाचे बन(व)लेले नॉन इश्यूज थोडेसे बाजूला ठेवून अशा विषयांत लक्ष घालायला कोणाला वेळ आणि रस असल्यास याबाबत काही सुचवू शकता. निदान विचार, चर्चा तर करू. मी फार नवीन काही विषय समोर ठेवत आहे असेही काही नाही. यापूर्वी अनेकांनी हा विषय मांडलेला असू शकतो. अर्थात ही फारच ढोबळ कल्पना आहे, याची नम्र जाणीव आहे. क्रीडा प्रबोधिनी, 'साई'ची केंद्र आहेत मात्र ती पुरेशी नाहीयेत. याशिवाय तिकडे जागा देखील मोजक्याच आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

Flower Farming : फुलशेतीत उत्साहाचा ‘फुलोरा’

Paddy Plantation : पालघर जिल्ह्यामध्ये भात लावणी अंतिम टप्प्यात

Wildlife Crop Damage : नेसरी भागात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; बाजरीचे दर स्थिर, ढोबळी मिरची तेजीत, पपई दर टिकून तर काकडीला उठाव

SCROLL FOR NEXT