अश्विनी चोथे
Wild Vegetable : रानभाज्यांची फुले, फळे, शेंगा, कंद पक्व झाल्यानंतर त्यांच्या बिया जमा करून वाळवून पुन्हा पावसाळ्यात त्याची रोपवाटिकेमध्ये त्याची रोपे तयार करावी. ही रोपे आपल्या परसबागेत, तसेच पडीक जमिनीवर लावावीत. इतरांना लावण्यासाठी द्यावीत.
पावसाळा सुरु झाला म्हणजे डोंगरावर, माळरानावर रस्त्याच्या कडेला अनेक वनस्पती उगवतात. त्यापैकी काही वनस्पती आपण रानभाज्या म्हणून ओळखतो. रानभाज्या म्हणजे रानात नैसर्गिकपणे उगवणाऱ्या भाज्या की, ज्यामध्ये फळे, शेंगा, फुले, कंदमुळे, बिया, खोड, पाने या सगळ्यांचा समावेश होतो. डोंगरकपारीला, रस्त्यावर, जंगलात नैसर्गिकपणे उगवत असल्यामुळे त्यावर कुठल्याही प्रकारची कीटकनाशके, बुरशीनाशके फवारली जात नाही म्हणून सेंद्रिय भाजीपाला म्हणून रानभाज्या ओळखल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरवातीपासून शेवूळ, तरोटा, बदड्या, लोथ, उळशी, वाघेटी, सफेद मुसळी, रानकेळी, आंबाडयाचा पाला, कुरडू, तेरा, बाफळी, केना, कोहरूळचा पाला, माठ, काटेमाठ, राजगिरा, चाई, उळशी, डोंगरजीरा, मोख्याचा पाला, कुडा, भारंगीचा पाला, कोहरूळचा पाला, खडकतेरी, रानकेळी, वास्ते, घोळ या रानभाज्या तसेच करटूले, पेंढार, मोहाचे फळे, मेक, आंबाडाची फळे, अळीव, चीचूर्डी, भोकारीचे फळे, तोरण, करवंद, टेमभूर्णी, जांभूळ, हुम्भ, गोमेटी, वाघेटी ही रानफळे पाहायला मिळतात. ऋतुमानानुसार शिरीचे दोडे, तागाडयाची फुले, बहाव्याची फुले, मोहाची फुले, कुडाची फुले, काटेसावरीची फुले, भोकारीची फुले, चाईचा मोहोर, उलशीचा मोहोर, भारंगीची फुले रानात उपलब्ध होतात.
रानभाज्या नामशेष होण्यामागील कारणे
१) ग्रामीण भागात नैसर्गिकपणे उगवणाऱ्या या भाज्यांकडे शहरी लोकही खूप मोठ्या प्रमाणात आकर्षित होवू लागले आहेत. आता शहरातील लोकांनाही रानभाज्यांचे महत्त्व वाटू लागले आहे त्यासाठी शहरातील अनेक संस्था मेळावे, प्रदर्शन भरवतात. त्यासाठी फांद्याच्या फांद्या किंवा मुळासकट या भाज्या उपटल्या जातात. त्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असून हे कुठे तरी थांबले पाहिजे.
२) काही रानफुले भाजी म्हणून वापरली जातात. त्यामुळे फुलाचे फळात, शेंगा यामध्ये रूपांतर होत नाही. तसेच काही शेंगा, कच्चे फळेही रानभाजी म्हणून खाण्यासाठी वापरली जातात. अशा वेळी त्याच्या पुनरूज्जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या भागाची पूर्ण वाढ न झाल्यामुळे त्याच्या बिया तयार होत नाही त्यामुळे त्याची अभिवृद्धी होत नाही.
३) खूप रानभाज्या आता नामशेष होत आहेत. काही भाज्या आता दाखवण्यासाठी ही उपलब्ध नाहीत, त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात, अनावश्यक तसेच चुकीच्या काढणीच्या पद्धती व अभिवृद्धी शून्य प्रयत्न. त्यामुळे आजच्या घडीला नैसर्गिकपणे उगवून देखील या रानभाज्या नव्याने लावण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागत आहे. बदलत्या हवामानामुळे आधीच नैसर्गिकपणे उगवत असलेल्या या भाज्यांची उगवण क्षमता कमी झाली आहे.
नामशेष होणाऱ्या वनस्पती आणि कारणे ः
रानभाजी---नामशेष होण्याची कारणे
तोरण ---फळे अपरिपक्व काढली जातात त्यामुळे अभिवृद्धीसाठी उपलब्ध झालेल्या बियाण्याची उगवण क्षमता कमी असते.
अळंबी/भुईफोड ---बदलत्या हवामानाने उगवण क्षमता कमी झाली आहे.
फटांगरी ---कोवळा पाला भाजीसाठी वापरल्याने झाडाची पुनरुत्पादन वाढ पूर्ण होत नाही.
करवल ---कच्ची फळे भाजीसाठी वापरली जातात त्यामुळे लागवडीसाठी बियाणे तयार होत नाही.
कोवळी भाजी ---व्यावसायिक उपयोगासाठी मोठ्या प्रमाणात कंदाची काढणी केल्याने पुढील वर्षी कंदाची उगवण कमी प्रमाणात होते.
कोहरूळ ---कोवळा पाला भाजीसाठी वापरल्याने बियाणे तयार होत नाही.
मोखा ----कोवळा पाला भाजीसाठी वापरल्याने बियाणे तयार होत नाही.
बांबू ---कोवळी डिरे भाजीसाठी वापरल्याने पूर्ण वाढ होत नाही.
बाफळी ---कोवळा पाला भाजीसाठी वापरल्याने बियाणे तयार होत नाही.
डोंगरजीरा ---कोवळा पाला भाजीसाठी वापरल्याने बियाणे तयार होत नाही.
दूध हलिंदा ---औषधी उपयोगासाठी कंद मोठ्या प्रमाणात काढल्याने उगवण क्षमता कमी झाले आहे.
शिरी ---भाजीसाठी फुले तसेच शेंगा काढल्याने बियाणे तयार होत नाहीत.
नाडूकली ---भाजीसाठी फुले काढल्याने बियाणे तयार होत नाहीत.
कशाप्रकारे संवर्धन करता येईल?
१) रानभाज्या जंगलात उगवून आल्यानंतर तीचा जितका भाग उपयोगात आणायचा आहे तितकाच भाग काढावा. झाडाच्या फांद्या तसेच तो मुळासकट उपटू नये. त्यामुळे त्या रोपांचे अस्तित्व नष्ट होत नाही. नंतर त्यापासूनही आपण संवर्धन करू शकतो.
२) रानभाज्यांची फुले, फळे, शेंगा, कंद पक्व झाल्यानंतर त्यांच्या बिया जमा करून वाळवून पुन्हा पावसाळ्यात त्याची रोपवाटिकेमध्ये त्याची रोपे तयार करावी. ही रोपे आपल्या परसबागेत, तसेच पडीक जमिनीवर लावावीत. इतरांना लावण्यासाठी द्यावीत.
३) काही रानभाज्या जसे सुरण, करांदा, तेरा, लोथ, चीचरडी, मेक, वाघेटी, करवंद, करटुली, गोमेटी, मोह यांची फळे किंवा कंद तयार झाल्यावर सुकवून बिया लागवडीसाठी जमा कराव्या. पुढच्या वर्षी पाऊस झाल्यावर परसबागेत, शेताच्या बांधावर, पडीक जागेवर लावाव्यात.
४) रानफळे जसे तोरण, हुम्भ, कुकरवळ, असंद, भोकर, तेटू, खरशिंग, बहावा, शिरी, (वेल) यांची उंच झाडे वाढतात. म्हणून यांच्या बिया गादी वाफ्यावर पेरून नंतर ही रोपे शेताच्या बांधावर, मोकळ्या जागी, किंवा रस्त्याच्या कडेला लावावी.
५) आरक्षित वने, वनराई (उदा. देवराई- निसर्ग संवर्धन परंपरांना प्रोत्साहन).
६) लोकसहभागातून रानभाज्या जपण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यक्रम घेण्यात यावे.
७) रानभाज्यांच्या रोपवाटिका तयार करून त्यामध्ये रोपांची वाढ करावी.
८) जंगलातून रोपे गोळा करावीत. जंगलातून पिकलेल्या फळांच्या बिया गोळा करणे. शेताच्या बांधांवर तसेच पिशव्यांमध्ये त्याच्या खुंट्यांची लागवड करावी.
९) काही समाजसेवी संस्थांनी या कामासाठी पुढाकार घेऊन रानभाज्या संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजे.
१०) रानभाज्या जतन केल्या तरच त्यांची जैवविविधता जपली जातील नाहीतर त्या नामशेष होतील.
लोकांनी त्या वाढवण्यासाठी त्याच्या अभिवृद्धीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच त्या भविष्यात आपणाला खाण्यासाठी मिळतील.
११) मोकळ्या जागी, बगीचा अशा ठिकाणी जे झाडवर्गीय रानभाज्या आहेत त्याचे संवर्धन करता येईल.
१२) फुलांचा, तसेच कच्च्या फळांचा वापर कमी केला पाहिजे. जेणेकरून ते फळ त्याचे जीवनचक्र पूर्ण करून बिया तयार होतील. त्या बिया नैसर्गिकपणे जंगलात प्रसार होतील.
------------------
संपर्क ः अश्विनी चोथे, ७७४३९९१२०६
(सहाय्यक प्राध्यापिका, के.के. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.