Wild Vegetable : रानभाज्यांच्या संवर्धनाला मिळतेय बळ

रानभाज्यांबद्दल जाणीव जागरूकता वाढीस लागली तशी त्यांची क्रेझ वाढत आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून ते श्रावण संपेपर्यंत जंगलातून भरपूर रानभाज्या मिळतात. त्याच प्रमाणे अनेक जण आपापल्या परीने रानभाज्यांचा प्रचार-प्रसार व्हावा म्हणून प्रयत्न करत आहेत. हे प्रयत्न जसे सार्वजनिक असतात, तसेच ते वैयक्तिक पातळीवरही व्हायला हवेत. मुळात औषधी रानभाज्या खाणे हे उत्तम आरोग्यासाठी हितकारक आहे. हे समजल्यावर त्याबद्दलची वस्तुस्थितीही जाणून घेणे आवश्यक ठरते. रानात, जंगलात आपोआप उगवून आलेल्या रानभाज्या खाल्ल्या जातात. काही भाज्या त्यांच्या वस्तिस्थानातच येतात, तर काही भाज्या लागवड करून देखील येतात.
Wild Vegetable
Wild Vegetable Agrowon

सध्या सगळीकडे रानभाज्यांची (Wild Vegetable) चर्चा आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून ते श्रावण संपेपर्यंत जंगलातून भरपूर रानभाज्या मिळतात. त्याच प्रमाणे अनेकजण आपापल्या परिने रानभाज्यांचा प्रचार-प्रसार व्हावा म्हणून प्रयत्न करत आहेत. हे प्रयत्न जसे सार्वजनिक असतात, तसेच ते वैयक्तिक पातळीवरही व्हायला हवेत. मुळात औषधी रानभाज्या खाणे हे उत्तम आरोग्यासाठी हितकारक आहे. हे समजल्यावर त्याबद्दलची वस्तुस्थितीही जाणून घेणे आवश्यक ठरते. रानभाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यात मर्यादा येतात. कारण रानभाज्या या मुद्दाम लागवड (Wild Vegetable Cultivation) करून वाढवल्या जात नाहीत. रानात, जंगलात आपोआप उगवून आलेल्या भाज्या खाल्ल्या जातात. काही भाज्या त्यांच्या वस्तिस्थानातच येतात, तर काही भाज्या लागवड (Vegetable Cultivation) करून देखील येतात.

Wild Vegetable
Wild Vegetable : शाश्वत आरोग्यासाठी रानभाज्या

यंदा जंगलातल्या रानभाज्या पाऊस नसतानाही त्यांच्या वेळेत उगवल्या. शेवळ, चाई, कोळू आणि वांगुट्या (वाघाटीची फळे) सर्व काही खाता आले या वर्षी. ही कमाल आहे इथल्या अस्सल स्थानिकत्वाची. मूळ इथले असणारे अथवा हजारो वर्षांपूर्वी इथे येऊन स्थायिक झालेल्या झाडाझुडपांना हवामानात झालेला बदल पचवता येतो.

या वर्षी झाडे लावताना काही गोष्टी ध्यानात घेऊया. आपल्या पोषणासाठी व अडीनडीला हाताशी भाजी असण्यासाठी उपयोगी पडतील, अशी झाडं लावूया. प्रत्येक घराच्या परसदारी ही झाडे असलीच पाहिजेत. ज्यांना स्वतःची जागा नाही अशांनी किमान पाच कुटुंबाना अशी पोषक झाडांची एक किट बनवून देता अली तर? आपण कुठल्या गावात फिरायला गेलो किंवा आपल्याला भेटणाऱ्या भाजीवाली, दूधवाला यांना अशी रोपे देऊ शकतो का? विचार करूया, अशा वेगळ्या पद्धतीने झाडे लावूया, हिरवाई वाढवूया. कोणती झाडे यात असावीत?

Wild Vegetable
Wild Vegetable : रानभाज्यांची श्रीमंती

शेवगा- शेवगा झटपट वाढतो. पाला, फुले, शेंगा यांची भाजी होते तर बिया पाणीशुद्धीसाठी वापरता येतात. शेवगा प्रचंड पौष्टिक आहे.

हादगा- हादगा झटपट वाढतो. पाने, फुले, शेंगा यांची भाजी होते. हादगा जमिनीची धूप थांबवतो. पक्ष्यांसाठी मधुरसाचे भांडार. शरीराला आवश्यक असणारी विविध खनिजे मिळतात.

कढीपत्ता- स्थानिक झाड. पोषकत्व देते. पाण्याची टंचाई सहन करून सदा हिरवे असते.

लिंबू- क, इ जीवनसत्त्वाचे भांडार. रोग प्रतिकारकता वाढवते.

पपई/ पेरू/ आंबा यापैकी कोणतेही एक फळझाड.

रानभाज्यांचे संवर्धन करणाऱ्या महाराष्ट्रातील काही ठळक प्रयोग-प्रयत्नांची ही उदाहरणे ः

मागच्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र सरकारतर्फे राज्यात वेगवेगळ्या पातळ्यांवर रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यास सुरुवात झाली आहे. गावपातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा स्तरावर असे महोत्सव घेऊन रानभाज्यांचा प्रचार-प्रसार केला जातो. उपलब्ध असलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शन भरवले जाते. परिसरात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या रानभाज्या यावेळी मांडल्या जातात. स्थानिक महिलांना त्याद्वारे रोजगार उपलब्ध होतो. नाशिक जिल्हा परिषदेतर्फे नाशिक येथे दर शुक्रवारी रानभाज्या महोत्सव भरवला जातो. यातून रानभाज्यांच्या प्रचार-प्रसाराबरोबरच त्यांच्या संवर्धनाची जाणीवही स्थानिकांना नक्कीच होईल.

शेतातले प्रयोग ते स्वयंपाकघर हा अनोखा प्रयोग सांगणे व त्याबद्दल लिहिणे खूप महत्त्वाचे आहे. हा प्रयोग होता निरोगी आणि गुणी कोरडवाहू लाल अंबाडीच्या सहपिकाचा. जो २०० टक्के यशस्वी झाला. लाल अंबाडीचे इंग्रजी नाव Rosell आहे तर तिचे शास्त्रीय नाव Hibiscus sabdariffa आहे. पूर्वी मूळची जंगलात आढळणारी लाल अंबाडी गेल्या काही वर्षांत रानातून गायब झाली; पण विदर्भात विशेषतः नागपूर भागात काम करणाऱ्या काही शेतकऱ्यांनी तिला जीवदान दिले. अंबाडीपासून वेगवेगळे पदार्थ बनवून त्यातून उत्पन्नही मिळवू लागले.

अंबाडी हे विविध गुण असणारे कोरडवाहू पीक आहे. ती कोणत्याही वातावरणात चांगली येते, असे एकले होते. शेतात भात लावला तेव्हा बांधावर अंबाडीच्या मूठभर बिया टाकल्या होत्या. बांधावर ना खत ना काही. भाताला कांसे भरली तेव्हा हिची पाने मस्त हिरवीगार आणि डवरलेली होती. तेव्हा पानांची भरपूर भाजी मिळाली. ज्वारीच्या कण्या घालून केलेली ही भाजी पौष्टिक आणि हटके.

भाताची कापणी झाली तेव्हा अंबाडी फुलायला लागली होती. परवाच्या शनिवारी शेतात गेले तर पूर्ण पक्व झालेले फुले कापणीसाठी तयार होती. एकेका झाडाला २५ ते ३० मोठे बोंड लागलेले. बियाही पक्व झालेल्या. कापणी करून प्रत्येक बोंडाच्या पाकळ्या हाताने काढल्या. आतली बिया असणारे बोंड उन्हात वळत घातले. दुसऱ्या दिवशी उकललेल्या बोंडातून थोड्याशा सोडून सर्व बिया सहज निघाल्या. बापरे एक बी पेरली होती, तेथे एका झाडाने २५० ग्रॅम पाकळ्या आणि २०० च्या आसपास बिया दिल्या होत्या.

अंबाडीच्या ओल्या पाकळ्यांची चटणी, जाम असे पदार्थ बनवले. ते पाच-सहा महिने साठवून ठेवता येतील. बियांची कोंडी मिरची चांगली बनते. शिवाय त्याचे पीठही बनते. ते बेसन पिठासारखे सर्व पदार्थ बनवण्यासाठी वापरता येते. शिवाय पुढच्या वर्षीच्या पेरणीसाठी बियाणेही मिळाले. झाडाच्या खोडाचे वाख तयार करून चऱ्हाट (दोरी) बनवता येते; पण मी त्यापासून शोभेसाठी ‘फ्लॉवरस्टिक्स’ बनवणार आहे. वाळवलेल्या पाकळ्यांची पावडर आंबट असते. भाजीत आंबटपणासाठी वापरता येते. त्याचं सरबतही बनते. ते शरीराची उष्णता कमी करते, पित्तशामक आहे. रक्त वाढीसाठी अंबाडी ही खूप महत्त्वपूर्ण आहे. अशा या गुणी आणि निरोगी अंबाडीची लागवड घरोघरी व्हायला हवी. वर्षभर पुरेल इतके उत्पन्न ती सहज देते.

रानभाज्यांच्या मोहिमेला बळ

आजच्या काळात समाजमाध्यमे ही ज्ञानाची देवाणघेवाण, प्रसार करण्याचे मोठे काम करत आहेत. यात रानभाज्या व दुर्मीळ वनस्पतींचे संवर्धन करण्यासाठी काम करणाऱ्या दोन समुहांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. रानभाजी हा व्हॉट्सॲप गट अभिजित व्यास गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चालवत आहेत. महाराष्ट्रातील अनेक तज्ज्ञ व रानभाजीप्रेमी या गटावर आहेत. या गटात अतिशय उत्तम चर्चा घडते. त्याच प्रमाण फेसबुकवर दुर्मिळ वनस्पती व जैवविविधता संवर्धन गट म्हणून एक समूह अतिशय चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहे. त्याच प्रमाणे प्रा. मधुकर बाचुळकर यांच्या ‘औषधी रानभाज्या’ या पुस्तकातून रानभाज्यांची सविस्तर माहिती मिळते. तसेच प्रस्तुत लेखिकेने म्हणजे नीलिमा जोरवर यांनी लिहिलेल्या ‘बखर रानभाज्यांची’ या पुस्तकातून अनेक रानभाज्यांची सचित्र माहिती मिळते. मला वाटते, सर्वार्थाने ज्ञान-माहिती संकलन, लागवडीचे विविध प्रयोग आणि जबाबदारीने प्रचार-प्रसार या माध्यमातून हा रानभाज्यांचा वारसा आपल्याला टिकवून ठेवता येईल.

ranvanvala@gmail.com

(लेखिका निसर्ग अभ्यासक आणि कार्यकर्त्या आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com