डॉ भास्कर गायकवाड
Need of Nature Conservation : बदलत्या हवामानाला सामोरे जाऊन उत्पादन घेण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होणे फार महत्त्वाचे आहे. यामध्ये नियंत्रित वातावरणात शेती उत्पादन हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे. उच्च तंत्रज्ञानावर आधारित शेती ज्याला हायटेक अॅग्रिकल्चर असे म्हटले जाते यांचा मोठ्या प्रमाणात अवलंब करावा लागणार आहे. यामध्ये फक्त पिकांचाच विचार न करता पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय तसेच शेतीवर आधारित इतर व्यवसायाचा प्रामुख्याने विचार करावा लागेल. कारण अन्नधान्याबरोबर या व्यवसायांचे उत्पादन आणि उत्पादनाचा दर्जा वाढला तरच एकात्मिक आहाराचा पुरवठा होऊ शकतो. आज खाण्याच्या सवयीमध्ये झालेल्या बदलाचा विचार करून अन्नधान्य सुरक्षा म्हणजेच धान्याच्या सुरक्षेबरोबर आहारात उपयुक्त असलेल्या इतरही उत्पादनाची उपलब्धता याचाही विचार करावा लागेल. अन्नधान्य सुरक्षेसाठी ज्याप्रमाणे नैसर्गिक साधनसंपत्ती, संशोधन आणि तंत्रज्ञान विस्तार या महत्त्वाच्या बाबी आहेत त्याप्रमाणे शासनाच्या योजना आणि निर्णयामध्ये सातत्य असणे गरजेचे आहे.
शेतीचा उत्पादन खर्च वाढत असताना त्या प्रमाणात शेतीमालाला भाव मिळाला नाही तर शेतीमध्ये शेतकरी कमी गुंतवणूक करतो. त्यामुळे उत्पादकता घटते. यासाठी शेती उत्पादनाला उत्पादन खर्च आधारित हमीभाव आणि हमीभाव जाहीर केल्यानंतर प्रत्यक्ष त्यानुसार खरेदी करण्याची प्रक्रिया या बाबी सक्षम केल्या नाही तर त्याचे प्रतिकूल परिणाम अन्नधान्यसुरक्षेमध्ये होतील. महागाईनुसार नोकरी करणाराला महागाईभत्ता वाढविला जातो. त्याच आधारावर दरवर्षीच्या महागाईच्या निर्देशांकानुसार शेतीमालाच्या दरात योग्य वाढ करणे ही उत्पादनवाढीची महत्त्वाची बाब आहे. उत्पादनाला कमी भाव असेल तर उत्पादन वाढणार नाही, याची अनेक उदाहरणे देता येतील.
दुसरी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे शेतीमालाच्या आयात-निर्यात धोरणातील सातत्य आणि दीर्घकाळ नियोजन ही होय. कारण याचाच विचार करून शेतकरी पिकांची निवड करतो, बाजारपेठेनुसार उत्पादन घेण्याचे नियोजन करतो. अचानक आयात-निर्यात धोरणामध्ये बदल झाल्यामुळे बाजारपेठ कोसळते किंवा निर्यातीवर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे झालेले नुकसान शेतकऱ्याला भरून काढणे अवघड जाते. शेती व्यवसाय हा पूर्णपणे परावलंबी आणि अशाश्वत आहे. शेतीसाठी लागणारी प्रत्येक वस्तू शेतकऱ्याच्या हातात नाही आणि काढलेल्या उत्पादनाची विक्री किंवा भावही शेतकऱ्याच्या हातात नाही. शेतकऱ्यांच्या हातामध्ये कष्ट, मिळेल ते उत्पादन आणि मिळेल तो बाजारभाव असल्यामुळे या अशाश्वत व्यवसायाला विम्याचे संरक्षण मिळणे फारच आवश्यक आहे. आज पीकविमा घेतला जातो. परंतु यामध्ये शेतीचा सर्वांगीण विचार केलेला नाही. सर्वंकष आणि एकात्मिक पद्धतीचा विमा ज्यामध्ये हवामानातील बदल, नैसर्गिक आपत्ती, बाजारपेठेतील चढ-उतार आणि शेतकऱ्यांचा विमा या सर्वांचा विचार होऊन विम्याचे संरक्षण मिळाले तर शेतकरी बिनधोकपणे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करेल.
यापुढील काळ शेती क्षेत्रासाठी फारच महत्त्वाचा राहणार आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गाच्या नियमांची पायमल्ली करून आपण निर्धोकपणे राहूच शकत नाही. निसर्गाने आपल्याला काय दिले याचा जाब विचारण्याअगोदर आपण निसर्गाला का दिले, या प्रश्नाचे उत्तर स्वत:लाच विचारले पाहिजे. चंगळवादाची सवय लागलेल्या मानवाने विसरता कामा नये की याच चंगळवादातून निसर्गाचा ऱ्हास होऊन सर्व काही संपू शकते. मानवाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या तीन महत्त्वाच्या बाबींची गरज असते. वस्त्र आणि निवारा मिळाला नाही तर तो जगू शकतो. परंतु अन्नाशिवाय मानव जगूच शकत नाही. अन्नाविना दाही दिशा होऊ नये यासाठी मानवानेच योग्य ती दिशा घेण्याची गरज आहे.
ज्या घटकांवर अन्ननिर्मिती होते त्यांचे जतन करणे गरजेचे आहे. सूर्य, पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू या निसर्गातील पंचमहाभूतातूनच मानवाची आणि सजीवांची निर्मिती होऊन त्यांचे पालनपोषण होत असते. या वसुंधरेचा पारा वाढला तर सृष्टीची उलथापालथ होण्यासाठी फारसा अवधी लागणार नाही. या वसुंधरेला शांत, थंड ठेवण्यासाठी, तिच्याकडून सर्व सजीवांसाठी लागणारे अन्न शेतकरी शेतामध्ये घाम गाळून काढत असतो. तो शेतीसाठी कर्ज घेऊन मुद्दाम कर्ज बुडवत नाही. निसर्गावर आधारित या परावलंबी आणि अशाश्वत व्यवसायाला निसर्गाने तसेच मार्केटने धोका दिला तर त्याने करायचे का? याचा विचार सर्व समाजाने केला पाहिजे. शेती करणारा शेतकरी आणि शेतीला बळ देणाऱ्या निसर्गाला पाठबळ दिले आणि त्याच्या रक्षणासाठी कार्यक्रम राबविला तर मानवाच्या पोषणासाठी अन्नधान्याचे उत्पादन काढण्यासाठी दोघेही सदैव तयार असतील. शेती आणि शेतकरी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. त्यासाठी शेती आणि शेतकरी यांना योग्य सन्मान देऊन निसर्गाचे संवर्धन करून अन्नधान्य सुरक्षेसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे हीच काळाची गरज आहे.
आजही ग्रामीण भागातील तरुण पिढी शेतीमध्ये काम करायला तयार नाही. शिकलेला तरुण शहराकडे जात आहे आणि शहराचा फुगा फुगत आहे. २०५० मध्ये भारतातील शहरी समाजाची संख्या ५२ टक्के, तर ग्रामीण समाजाची संख्या ४८ टक्के होणार आहे, असे आकडेवारी सांगते ही एक विचार करायला लावणारी बाब आहे. यासाठी वेळीच योग्य ती कार्यवाही आणि प्रयत्न सर्व स्तरांतून होणे गरजेचे आहे. अर्थात, याचा विचार करून काही खासगी तसेच सहकारी संस्था प्रयत्न करीत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने तरुण शेतकऱ्यांना एकत्र करून शेती उत्पादन प्रक्रिया आणि विक्री याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे बसवंत गार्डन हा देशातील पहिला अपी-ॲग्री टुरिसम प्रकल्प सुरू करून ग्राम संस्कृती, कृषी संस्कृती, गोमाता संस्कृती या विषयावर शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी, तरुण तसेच समाज प्रबोधनाचे काम करत आहे.
कोल्हापूर येथील कण्हेरी मठ, रायगड जिल्ह्यातील शेखर भडसावळे (सगुणा बाग) यांची शाश्वत उत्पादनासाठी एसआरटी तंत्रज्ञान असो की इतरही अनेक खासगी संस्था, तेही यासाठी प्रयत्न करत आहे. खर तर अशा प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणात अनुकरण आणि प्रसार होऊन त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कारण बदलते हवामान तसेच समाज रचना यांचा विचार करून तंत्रज्ञान आणि शेती पद्धतीचा वापर होण्यासाठी नक्कीच हे उपक्रम भविष्यात उपयुक्त ठरणार आहे. अर्थात, यासाठी शासकीय पातळीवरून मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले, तर आजच्या या तरुण पिढीला दिशा देऊन त्यांना योग्य असे पाठबळ मिळाले तर भविष्यातील अन्नधान्य सुरक्षेचा तसेच शाश्वत जीवन जगण्याचा मार्ग सुखकर होईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.