Natural Farming : नैसर्गिक शेतीतून साधली प्रगती

Indian Agriculture : एकेकाळचे प्रगतिशील द्राक्ष बागायतदार ते आज नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते असा प्रवास आहे, चळे (जि. सोलापूर) येथील वासुदेव गायकवाड यांचा. या प्रवासात कष्ट करत येणाऱ्या संकटांवर जिद्दीने मात केली.
Vasudev Gaikwad
Vasudev GaikwadAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : वासुदेव गायकवाड यांची ३० एकर शेती आहे. त्यांनी राज्य द्राक्ष संघाचे सोलापूर विभागाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्याकडे पूर्वी २० एकरांत द्राक्ष आणि १० एकरांत डाळिंब बाग होती. त्यातून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासह त्यांनी बेदाणा निर्मितीही केली.

शेती नदीकाठी असल्याने पाणी व क्षारांमुळे जमिनीची प्रत खालावली होती. शिवाय द्राक्ष बागेत रासायनिक निविष्ठांच्या वापराशिवाय पर्याय नव्हता. याच दरम्यान त्यांनी खर्चिक व समस्यायुक्त रासायनिक शेतीला पर्याय शोधण्यास सुरुवात केली. तीन एकरांत नैसर्गिक शेतीचे प्रयोग सुरू केले. जागतिक नैसर्गिक शेतीचे प्रणेते मासानोबु फुकुओका यांच्या तत्त्वानुसार Do Nothing पद्धतीची शेती करण्यास सुुरुवात केली.

विना नांगरणी, विना खुरपणी, विना फवारणी आणि विना रसायन ही चार तत्त्वे शेती करताना पाळली जातात. शेतात बाहेरून कोणत्याही जैविक वा सेंद्रिय निविष्ठांचा वापर होत नाही. शेतात उगवणाऱ्या प्रत्येक वनस्पतीला मुक्तपणे वाढू दिले जाते. पीक अवशेष, पालापाचोळा यांचा सेंद्रिय खत, आच्छादन म्हणून वापर केला.

Vasudev Gaikwad
Natural Farming : उत्कृष्ट नैसर्गिक शेती करणाऱ्या महिलांचा सन्मान

नैसर्गिकरीत्या कीड नियंत्रण

दहा एकरांतील आंबा बागेत खोडकीड जास्त त्रास देते. या किडीचे नियंत्रण करणारे निसर्गात अनेक मित्रकीटक आहेत. पण एकेदिवशी या किड्याची मांजराने शिकार केलेली पाहिल्याचे गायकवाड सांगतात. निसर्गातील जीवच कीड नियंत्रणात उपयोगी येतात असे त्यांचे म्हणणे आहे.

नैसर्गिक शेतीची तत्त्वे

विनानांगरणी

जमिनीमधील थरांमध्ये सूक्ष्मजीवांचे एक वेगळेच जग आहे. सतत नांगरणी करून या सूक्ष्म जिवांची घरे मोडून त्यांच्या कार्यात आपण बाधा आणतो. विनानांगरणी सुरू करताच जमिनीची कण रचना तयार करणारे सूक्ष्म जिवाणू कार्यरत होतात. कण रचना सुधारल्याने पावसाचे पाणी जमिनीत चांगले मुरते. जमिनीत पोकळी तयार झाल्याने ऑक्सिजनचा संचार वाढतो, असे वासुदेव गायकवाड सांगतात.

विनाखुरपणी

तण हा आपल्या पुढचा प्रश्‍न नसून, त्या त्या वेळी जमिनीत असणाऱ्या प्रश्‍नाचे उत्तर आहे. अत्यंत हलक्या जमिनीत फक्त कुसळ उगवते, ही गवते तिथेच कुजल्यानंततर हळूहळू रुंद पानाची गवते उगवतात. त्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढल्यानंतर द्विदल तणे उगवतात, द्विदल तणांमुळे जमिनीचे आरोग्य सुधारताच, तेथे झुडपे वाढू लागतात. झुडपांनी तयार केलेल्या कर्बामुळे जमीन आणखी सुपीक होते, त्यानंतर तेथे वृक्षवर्गीय वनस्पती उगवतात. वृक्षवर्गीय वनस्पतींमार्फत वर्षभर सुर्यप्रकाशाचा वापर करून जो लिक्विड कार्बन जमिनीत सोडला जातो. त्यामुळे जमिनीला सुपीकता प्राप्त होते. जमीन जेवढी Bacteria Dominant तेवढी तणे जास्त. जसजशी जमीन सुपीक बनते, तसे तणांचे प्रकार बदलतात व हळूहळू कमी होत जातात. जमीन Fungal Dominant होताच तणांचे कार्य संपल्याने तण उगवणे बंद होते. परंतु वृक्षवर्गीय वनस्पती उगवत राहतात, अशा पद्धतीने निसर्ग एकपीक पद्धतीचे घनदाट जंगले तयार करतो.

Vasudev Gaikwad
Natural Farming : नैसर्गिक शेतीसाठी मिळणार ३०० कोटी

विनाफवारणी

कोणत्याही प्रकारची फवारणी निसर्गातील सजीव सृष्टीसाठी हानिकारक असते. सर अल्बर्ट हार्वर्ड म्हणतात, की तुमच्या पिकावर येणारे कीड आणि रोग हे तुमचे मित्र असतात. शेती करताना आपले पीक नियोजनामधील कामकाज चुकते आहे, हे सांगण्यास आलेले दूत म्हणजे कीड-रोग होय. प्रत्येक सजीवाच्या जन्माचा उद्देश पुढची पिढी सशक्त तयार करणे हा आहे. सशक्त बीज वाढले पाहिजे आणि या स्पर्धेत अशक्त बीज नष्ट झाले पाहिजे, यासाठी कीड आणि रोगांची निर्मिती आहे. त्यामुळे सुपीक जमिनीत सशक्त पिके असतील, तर कोणत्याही फवारणीची गरज राहणार नाही. हळूहळू आम्ही याचा प्रत्यय घेत आहोत, असे वासुदेव गायकवाड सांगतात.

विनारसायन

जमीन सुपीकतेच्या पटीत पीक उत्पादन देत असते. परंतु रसायनांचा वापर करून आपण अधिक चांगले पीक उत्पादन देण्यासाठी जमिनीस भाग पाडतो. पिकाला अन्नद्रव्ये उपलब्ध करून देण्यासाठी जमिनीतील सूक्ष्म जीवसृष्टी जमिनीत साठलेला कर्ब वापरते आणि पिकाला ती अन्नद्रव्ये विनासायास उपलब्ध होतात. खरेतर पिकाने प्रकाश संश्‍लेषणातून बनवलेला कर्ब जमिनीतील सूक्ष्म जीवांसाठी सोडणे अपेक्षित आहे. परंतु पिकाला विनासायास जमिनीतून अन्नद्रव्ये उपलब्ध झाल्याने पीक सूक्ष्मजीवांसाठी कर्ब सोडत नाही. त्यामुळे जमिनीतील सूक्ष्म जीवसृष्टीची उपासमार होते. पिकांमध्ये आपण वापरलेली सर्व रसायने, कीडनाशके, बुरशीनाशके या सूक्ष्मजीव सृष्टीसाठी हानिकारक आहेत. त्यामुळे या सूक्ष्मजीवसृष्टीचे कार्य हळूहळू मंदावत जाते. जमिनीत साठलेला सेंद्रिय कर्ब वापरून काही काळ रसायनांच्या मदतीने पिके चांगली येतात. परंतु जसजसा सेंद्रिय कर्ब कमी होत जाईल, तसे उत्पादनात घट येत जाते.

नैसर्गिक पद्धतीने आंबा उत्पादन

दिवसातील जास्तीत जास्त वेळ सूर्यप्रकाश पकडणे म्हणजे शेती. मानवी प्रयत्नापेक्षा अत्यंत वेगाने निसर्ग स्वतः जमिनीत सुधारणा करतो. त्यातूनच सशक्त पिके घेता येतात, याचा प्रत्यय आम्ही घेत आहोत. मागील सहा ते सात वर्षांत आमचा आंबा बागेतील एक प्लॅाट Fungal Dominant झालेला आहे. जमीन एवढी सुपीक झाली आहे, की तणे उगवणे जवळपास बंद झाले आहे. परंतु त्याच वेळेस तिथे वृक्षवर्गीय वनस्पती मात्र उगवत आहेत. आंबा बाग काहीही न करता उत्तम उत्पादन देत आहे. असे वासुदेव गायकवाड सांगतात.

वासुदेव गायकवाड, ९०११०७७५७५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com