Mumbai News : शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करू लागल्यामुळे त्याचा दुष्परिणाम जमिनीवर होताना दिसून येत आहे. पर्यायाने शेतकरी, पाणी, प्राणी, पक्षी, मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे रासायनिक खतांऐवजी शेतीला वरदान असणारी सेंद्रिय खते वापरण्याची पद्धत शेतकऱ्यांनी जोपासली पाहिजे.
यासाठी शेतीमित्र मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू तालुक्यातील वाणगाव-आसनगावमधील कृषी तंत्र विद्यालयातील कृषीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या प्रक्षेत्रावरील जागेत गांडूळ खत प्रकल्प उभारला आहे. गांडूळ खत हे दोन ते अडीच महिन्यात तयार होते. तयार झालेले खत सैल, भुसभुशीत, कणीदार चहाच्या भुकटीसारखे आणि काळसर तपकिरी रंगाचे असते.
गांडूळ खत म्हणजे काय?
गांडूळ आणि सेंद्रिय पदार्थ खाऊन बाहेर टाकलेली विष्टा किंवा अर्धपचन झालेले सेंद्रिय पदार्थ, त्यांची अंडी किंवा कणून अशा एकूण पदार्थाला गांडूळ खत म्हणतात.
सेंद्रिय खताची निर्मिती
पिकांचे अवशेष, जनावरांपासून मिळणारी उपउत्पादिते, घरातील केरकचरा, भाज्यांचे अवशेष, फळांच्या साली, शिळे अन्न
व झाडांचा पालापाचोळा, घरातील सांडपाणी इत्यादी सेंद्रिय पदार्थ वापरून गांडूळ खत निर्मिती करणे शक्य झाले आहे.
शेतीसाठी उपयोग
सर्वसाधारणपणे तृणधान्य आणि कडधान्य पिकांना हेक्टरी पाच टन गांडूळ खत तयार द्यावे. फळझाडांच्या वयोमानानुसार शेणखताच्या मात्रेच्या निम्मी मात्रा गांडूळ खताची द्यावी. गांडूळ खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो, जलधारणशक्ती वाढते, जमिनीची धूप कमी होते, जमिनीतील ह्युमसचे प्रमाण वाढते. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.
लाकडी खोक्यातून गांडुळांची निर्मिती
सिमेंटची टाकी किंवा लाकडी खोक्यातून गांडुळांची निर्मिती करता येते; मात्र दोन्ही पद्धतीत कृत्रिम सावलीची गरज असते. सूर्यप्रकाश व पावसापासून संरक्षण करण्यासाठी छपराची शेड तयार करावी. निवारा शेडच्या दोन्ही बाजू उताराच्या दिशेने असाव्यात. छपरासाठी गवत, भाताचा पेंडा, नारळाची झावळे, तुरीच्या काड्या, ज्वारीची ताटे, जाड प्लॅस्टिकचा कागद किंवा सिमेंट अथवा लोखंडी पत्र्याचा उपयोग करावा.
गांडूळ खत तयार झाल्यावर त्याचा शंकूसारखा ढीग करावा. ढिगाच्या वरच्या भागातील खत वेगळे करून सावलीत वाळवून व चाळून घ्यावे. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडूळे, गांडूळाची पिल्ले आणि अंडकोष याचा पुन्हा गांडूळ खत तयार करण्यासाठी वापर करावा.
निसर्ग व मानवी जीवन रोगमुक्त करण्यासाठी आपण पिकवत असलेल्या भाजीपाल्यामध्ये, फळबागेत गांडूळ खताचा वापर करावा. झाडासाठी किंवा रोपासाठी लागणारे संपूर्ण पोषक अन्नद्रव्ये गांडूळ खतांमध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे फळे, तसेच भाजीपाला पिकाची गुणवत्ता सुधारते व आपण लावलेल्या परसबागेतील भाजीपाला अथवा फुल झाडाला गांडूळ खताचा वापर करून आपले जीवन, तसेच संपूर्ण निसर्ग विषमुक्त व रोगमुक्त करू शकतो.प्राचार्य, सोनालिका पाटील, कृषी तंत्र विद्यालय, आसनगाव
गांडूळ हा प्राणी स्वतःचे रक्षण स्वतः करू शकत नाही. त्यामुळे त्याचे बेडूक, पक्षी, सरडे, साप, गोम, उंदीर, चिचुंद्री, मुंग्या, कोंबड्या या शत्रूपासून रक्षण करावे लागते. जमिनीत घातक रसायनांचा वापर थांबवणे आवश्यकता आहे.प्रवीण भोये, प्राध्यापक, कृषी तंत्र विद्यालय, आसनगाव
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.