Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon 2025: जुलैअखेर मॉन्सून काठावर पास

Maharashtra Rain Forecast: जूनमध्ये सरासरी ओलांडल्यानंतर जुलैमध्ये मॉन्सून काठावर पास झाला आहे. १ जून ते ३१ जुलै या कालावधीत राज्यात ५५०.१ मिलिमीटर म्हणजेच ३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली.

अमोल कुटे

Pune News: जूनमध्ये सरासरी ओलांडल्यानंतर जुलैमध्ये मॉन्सून काठावर पास झाला आहे. १ जून ते ३१ जुलै या कालावधीत राज्यात ५५०.१ मिलिमीटर म्हणजेच ३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. जुलैत कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोटात जोरदार सरी कोसळल्या असल्या, तरी पावसाचे प्रमाण कमी आहे. मराठवाड्यातही तूट असून, विदर्भात मात्र समाधानकारक स्थिती आहे.

यंदा केरळपाठोपाठ महाराष्ट्रातही विक्रमी वेगाने दाखल झाल्यानंतर मॉन्सूनची वाटचाल अडखळली. पुरेशा प्रणाली पोषक नसल्याने जुलैमध्ये पावसाची दडी असल्याचे दिसून आले. कोकण, घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार बरसणाऱ्या मॉन्सूनने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वाट पाहायला लावली. महिन्याच्या अखेरच्या टप्प्यातील पावसाने खरिपाला जीवदान दिले. जुलैमध्ये पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले.

जूनमध्ये राज्यात २२२.३ मिमी म्हणजेच ६ टक्के अधिक पाऊस पडला होता. केवळ जुलैचा विचार करता राज्यातील महिन्याची पावसाची सरासरी ३२४.२ मिमी आहे. यंदा तब्बल ३२७.९ मिमी (१ टक्का अधिक) पावसाची नोंद झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात नद्यांना पूर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक लहान-मोठ्या प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग करावा लागला. जुलैत धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख चार विभागांत पडलेल्या पावसाची स्थिती पाहता यंदा पावसाचे प्रमाण कमीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा जुलैअखेर मध्य महाराष्ट्रात १० टक्के अधिक पाऊस झाला. विदर्भात ९ टक्के अधिक, कोकण आणि गोवा विभागात १ टक्का अधिक, तर मराठवाड्यात पावसात १९ टक्क्यांची तूट आहे. एकूणच महाराष्ट्रात सर्वदूर चांगल्या पावसाने हजेरी लावल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

जुलै अखेरपर्यंत राज्यात विभागनिहाय पडलेला पाऊस

विभाग---सरासरी---पडलेला---तफावत (टक्क्यांमध्ये)

कोकण-गोवा---१७५५.०---१७७५.८---अधिक १

मध्य महाराष्ट्र---३८७.२---४२४.७---अधिक १०

मराठवाडा---३०५.१---२४६.७---उणे १९

विदर्भ---४८४.७---५२९.८---अधिक ९

नाशिकमध्ये सर्वाधिक, सोलापूरमध्ये सर्वांत कमी पाऊस

जुलैअखेर पालघर, नाशिक, पुणे, कोल्हापूर भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ५० टक्के अधिक पावसाची नोंद झाली. सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाची दडी होती. जुलैअखेर सोलापुरात पावसात तब्बल ४८ टक्क्यांची तूट दिसून आली. मुंबई शहर, अहिल्यानगर, सोलापूर, जालना, बीड, लातूर, हिगोली आणि अमरावती या जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. उर्वरित राज्यात पावसाने सरासरी गाठल्याचे हवामान विभागाच्या नोंदींवरून स्पष्ट होत आहे.

राज्यात जिल्हानिहाय पडलेल्या पावसाची स्थिती :

सरासरीपेक्षा अधिक (२० ते ५९ टक्के अधिक) :

पालघर, नाशिक, पुणे, कोल्हापूर भंडारा, गडचिरोली.

सरासरी इतका (उणे १९ ते १९ टक्के अधिक) :

ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, जळगाव, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर.

सरासरीपेक्षा कमी (उणे ५९ ते उणे २० टक्के) :

मुंबई शहर, अहिल्यानगर, सोलापूर, जालना, बीड, लातूर, हिगोली, अमरावती.

पावसाला पोषक प्रणालीचा प्रभाव कमी

जुलैमध्ये पावसाला पोषक प्रणालींचा प्रभाव कमी दिसून आला. मध्य प्रदेशात एक आणि बंगालच्या उपसागरात दोन अशी तीन तीव्र कमी दाब क्षेत्रे (डिप्रेशन) तयार झाली. यासह पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा अधिक लाभदायक ठरू शकला नाही. जुलैमध्ये प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्य पातळीवर होते. हिंद महासागरातील इंडियन ओशन डायपोल (आयओडी) देखील तटस्थ स्थितीत होता. मॉन्सूनचा आस बराच काळ त्याच्या सर्वसाधारण स्थितीत आणि उत्तरेकडे राहिला.

Chart

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

Flower Farming : फुलशेतीत उत्साहाचा ‘फुलोरा’

Paddy Plantation : पालघर जिल्ह्यामध्ये भात लावणी अंतिम टप्प्यात

Wildlife Crop Damage : नेसरी भागात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; बाजरीचे दर स्थिर, ढोबळी मिरची तेजीत, पपई दर टिकून तर काकडीला उठाव

SCROLL FOR NEXT