माणिकराव खुळे
Maharashtra Weather: देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत ९६ ते १०४ टक्के श्रेणीत पडणारा पाऊस हा सरासरी इतका मानला जातो. तर १०५ ते ११० टक्के श्रेणीत पडणारा पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या शक्यतेच्या श्रेणीत मोडतो. भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार या वर्षी येत्या पावसाळ्यात देशात गुणात्मकदृष्ट्या १०५ टक्के (± ५) पाऊस अपेक्षित आहे, जो सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या शक्यतेच्या श्रेणीत मोडतो. मागील वर्षी २०२४ च्या मॉन्सून वर्षात ही शक्यता जवळपास इतकीच म्हणजे १०६ टक्के होती.
त्यामुळे अंकानुसार नकारात्मक शक्यतेच्या जरी विचार केला तरी ही शक्यता (१०५ टक्के वजा ५ टक्के) म्हणजे ती १०० टक्के येते, जी सरासरीइतक्या म्हणजे (९६ ते १०४ टक्के) पावसाच्या श्रेणीत मोडते. त्याचबरोबर अंकानुसार सकारात्मक शक्यतेचा विचार केल्यास ही शक्यता (१०५+५) ११० टक्के येते, जी सरासरीपेक्षा अधिक (१०५ ते ११० टक्के) पावसाच्या श्रेणीत मोडते.
आता ‘पूर्वानुमान (भाकीत) संभाव्यता’ व ‘वातावरणीय जलवायू संभाव्यता’ म्हणजे काय? या दोन्हीही संभाव्यतांची संकल्पना स्पष्ट करताना, असे म्हणता येईल, की संपूर्ण २०२४-२५ वर्षात जागतिक पातळीवरून गेल्या आठ महिन्यांपासून भाकितासाठी आवश्यक असलेली सर्व हवामान घटकांची माहिती गोळा करून केलेल्या निरीक्षणांची नोंद व त्यावरून निष्कर्षांप्रत आलेली शक्यता म्हणजेच ‘पूर्वानुमान (भाकीत) संभाव्यता’ होय. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीवरून सांख्यिकीच्या आधारावरून निष्कर्षांप्रत आलेली शक्यता म्हणजे ‘जलवायू (वातावरणीय) संभाव्यता’ होय.
परंतु मॉन्सूनच्या अंदाजातील उपलब्ध डेटा रकाण्यावरून ‘पूर्वानुमान (भाकीत) संभाव्यता’च्या पाचही श्रेणीतील आकडे पहिले असता असे जाणवते, की आता सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असलेल्या पूर्वानुमान संभाव्यता या रकान्यातील शेवटच्या ओळीत ३३+२६ अशी ५९ टक्के म्हणजे अत्याधिक शक्यता मानली जाते. म्हणजेच देशात १०४ टक्क्यांपेक्षा अधिक श्रेणीतील पाऊस पडण्याची शक्यता ही ५९ टक्के आहे. त्यामुळे देशात सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यताच अधिक आहे.
या वर्षीच्या (२०२५) पूर्वमोसमी काळात म्हणजे मार्च, एप्रिल व मे २०२५ पर्यंत ‘एल-निनो-साऊथ ओसिलेशन्स’ म्हणजे ‘एन्सो'' विषुववृत्तीय प्रशांत महासागरीय परिक्षेत्रात तटस्थ अवस्थेत कार्यरत आहे. परंतु एकंदरीत हवेच्या दाबाचे व वाऱ्यांचे पॅटर्न पाहता असेच दिसते, की अजूनही ‘ला-निना’चा प्रभाव या कार्यक्षेत्रात काहीसा टिकून आहे. असे जरी असले तरी पावसाळ्यातील चार महिन्यात ‘एल -निनो-साऊथ ओसिलेशन्स’ म्हणजे ‘एन्सो’ची ही अवस्था तटस्थच राहण्याची शक्यता अधिक आहे.
अशी अवस्था म्हणजेच ना ‘ला-निना’ किंवा ना ‘एल-निनो.’ म्हणजे येत्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडण्यासाठी कोणताही वातावरणीय घटकांचा अटकाव होण्याची शक्यता या अंदाजात जाणवत नाही. या वर्षी एन्सो तटस्थेचा काळ, जो मॉन्सूनला पूरक ठरणारा असल्यामुळे पावसास अनुकूल असणार आहे. परंतु पूर्वार्धात म्हणजे जून व जुलै हा काळ मॉन्सूनच्या आगमनाच्या संक्रमणाचा काळ असतो. त्यात पूर्व- मॉन्सून सरीही कोसळत असतात. परंतु मॉन्सूनच्या वाटचालीत मॉन्सून करंट काय असेल, ते त्या वेळच्या प्रणालीवर अवलंबून असेल.
‘भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता’ची (आयओडी - इंडियन ओशन डायपोल) जेव्हा धन अवस्था असते म्हणजे अरबी समुद्र पाण्याचे तापमान अधिक तर बंगालचा उपसागर पाण्याचे तापमान कमी असते, तेव्हा भारतात पावसाळ्यात पाऊस पडण्यासाठी ही स्थिती अधिकच पूरक असते. परंतु या दोन्हीही सागरीय पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान जेव्हा समसमान असते तेव्हा ती तटस्थ अवस्था मानली जाते. आयओडी हा सुद्धा भारत देशाचा अधिक पाऊस पाडणारा ‘ला-निना’च समजला जातो.
सध्याच्या पूर्वमोसमी काळात म्हणजे मार्च, एप्रिल व मे २०२५ भारतीय महासागरात आयओडी तटस्थ अवस्थेत आहे. येत्या जून ते सप्टेंबर मध्येही आयओडी तटस्थच राहण्याची शक्यता आहे. या घटकामुळे येत्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडण्यासाठी अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या दोन्हीही सागरीय पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान समसमान राहून ही स्थिती या वर्षी पाऊस पडण्यास पूरक नसली तरी कमीत कमी अटकाव करणारी नाही, ही जमेची बाजू समजावी.
शिवाय मागील जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत पृथ्वीच्या उत्तर अर्ध गोलार्धातील अमेरिका-कॉन्टिनेन्टल, आर्टिक सर्कल, अलास्का, डेन्मार्क तसेच युरेशिया म्हणजे ४५ अंश उत्तर अक्षवृत्ताच्या उत्तरेकडील चीन, रशिया युरोप तिबेटचे पठार हिमालयाच्या उत्तर भागातील बर्फाळ परिक्षेत्रात सरासरीपेक्षा कमी झालेली हिमवृष्टीची अवस्था देशातील मॉन्सूनला अधिक पूरक असून, देशाला सरासरीपेक्षा अधिक पाऊस देण्याची शक्यता जाणवत आहे.
महाराष्ट्राचे काय?
महाराष्ट्र हा मध्य भारत विभागात मोडतो. ‘टरसाइल’ श्रेणी प्रकारानुसार संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी पेक्षा अधिक म्हणजे १०५ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचीच शक्यता असून, ही शक्यता सर्वाधिक म्हणजे ५५ टक्के आहे. मराठवाडा व कोकणात ही स्थिती ६५ टक्के आहे. मात्र या सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या शक्यतेमुळे हा अधिक पावसाचे वितरण कसे होते, यावरच पडणारा पाऊस लाभदायी की नुकसानदेही ह्याचे उत्तर येणारा काळच देईल, असे वाटते.
मॉन्सूनचे आगमन
सरासरी एक १ जूनला केरळात दाखल होणारा मॉन्सून १० जूनला मुंबईत सलामी देतो. मॉन्सून आगमन कालावधीत सहा वातावरणीय घटकांच्या निरीक्षणानुसार आगमनाची स्थिती त्या त्या वेळेस सांगितली जाते. मुंबईतल्या आगमनानंतर उर्वरित महाराष्ट्रात त्याचा प्रवेश ठरवता येतो. हे खरे असले तरी मॉन्सूनचे आगमन व चार महिन्यांत पडणारा मॉन्सून या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. त्यांच्या भाकितांचे निकषही स्वतंत्र आहेत.
वायव्य भारतातील पहाटेचे किमान तापमान, दक्षिण भारतातील चार राज्यांतील पूर्वमोसमी पावसाचे वर्तन, दक्षिण चीन समुद्रातून रात्रीच्या वेळी बाहेर पडणारी दीर्घलहरी उष्णता ऊर्जा, मलेशिया थायलंड पश्चिम किनारपट्टीवर एक ते दीड किमी. दरम्यानचे वाहणारे वारे, वायव्य प्रशांत महासागरावरील हवेचा दाब आणि बंगालच्या उपसागरातील, बांगला देश, इंडोनेशिया, दरम्यानचा, पण साधारण १० किमी. उंचीवरील वाहणारा वारा अशा या सहा घटकांच्या सतत निरीक्षणावरून मॉन्सून आगमनाचा अंदाज बांधला जातो. ३१ मेच्या दुसऱ्या टप्प्यातील सुधारित अंदाजात मॉन्सून आगमनासंबंधी सविस्तर खुलासा केला जातो. तेव्हाच अंदाजे मुंबईमध्ये मॉन्सून कोणत्या तारखेला दाखल होईल, हे कळते. ९४२२०५९०६२
(लेखक ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.