
मंगेश तिटकारे, हेमंत जगताप
Indian Agriculture: कृषी क्षेत्राच्या प्रगतीमध्ये पुढील काही वर्षांत धान्य साठवणूक व बाजारातील परिस्थितीचा अंदाज घेऊन शेतीमालाची विक्री करणे, हे घटक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. देशातच नाही तर परदेशात सुद्धा गोदाम पावती व्यवसायावर भर देण्यात येत आहे. या व्यवसायामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक फायदा मिळणार आहे.
गोदामातील पावती वित्तपुरवठ्याची मुख्य वैशिष्ट्ये
गोदाम पावती वित्तपुरवठा संकल्पनेत सुरक्षितरीत्या साठवणूक केलेल्या वस्तू अथवा धान्य कर्जास तारण म्हणून स्वीकारले जाते. याला काही वेळेस इन्वेंटरी क्रेडिट किंवा साठवणूक क्रेडिट असे म्हटले जाते. या घटकामुळे पुरवठा साखळीतील ग्राहक जसे की, शेतकरी, व्यापारी, प्रक्रियादार, खरेदीदार, निर्यातदार तसेच पुरवठा साखळीतील इतर घटक, यांच्यामार्फत सुरक्षिततेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या प्रमाणित गोदामांमध्ये धान्य अथवा वस्तू साठविल्या जातात.
गोदाम पावतीवर विशिष्ट गुणवत्तेचे, वजनाचे व प्रतवारी केलेले दर्जेदार धान्य किंवा वस्तू यांचा संपूर्ण तपशील नमूद असतो. वित्तीय संस्थांकडून ग्राहक ही पावती सादर करून त्याबदल्यात कर्ज घेऊन आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतो. गोदाम पावती वित्तपुरवठ्याची मूलभूत वैशिष्ट्ये तुलनेने सोपी आणि सरळ असतात.
गोदाम पावती वित्तपुरवठा प्रणाली निर्यातदार तसेच आयातदार दोघेही वापरू शकतात. उत्पादन साठविण्यासाठी व साठविलेल्या उत्पादनाकरिता आर्थिक भांडवल उभारण्यासाठी, देशांतर्गत व्यापार आणि उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी या गोदाम पावती वित्तपुरवठा प्रणालीचा उपयोग होऊ शकतो.
ग्राहक गोदाम पावतीच्या बदल्यात विशिष्ट गुणवत्तेचा माल गोदामात जमा करतो. गोदामातून कोणत्याही वेळी विशिष्ट रक्कम आणि वस्तूची गुणवत्ता या आधारे वस्तू काढण्याचा गोदाम पावती अधिकार देते. साठवणूक केलेल्या वस्तूची सुरक्षितता आणि दर्जाची हमी देण्याची जबाबदारी गोदाम व्यवस्थापकाची असते. गोदाम पावती बँकेकडे हस्तांतरित केली जाऊ शकते, जी साठविलेल्या वस्तूच्या मूल्याच्या विशिष्ट टक्केवारीइतके कर्ज देते. मुदतपूर्तीच्या वेळी, ग्राहक (उदा. शेतकरी) वस्तू खरेदीदाराला विकतो.
खरेदीदार नंतर बँकेला थेट पैसे देतो किंवा कर्जदाराला पैसे देतो, जे पैसे नंतर बँकेला कर्जरूपाने परतफेड केले जातात. कर्जाची रक्कम परत मिळाल्यावर बँक खरेदीदार किंवा विक्रेत्याला व्यवहाराच्या प्रकारानुसार गोदाम पावती परत देते, जी गोदाम पावती नंतर गोदामात जमा करून वस्तू अथवा धान्य खरेदीदारास मिळते. कर्जाची थकबाकी झाल्यास, बँक ताब्यात असलेल्या गोदाम पावत्यांचा वापर गोदामात साठविलेल्या वस्तूची अथवा धान्याची विक्री करून कर्जाची रक्कम जमा करून घेते.
निगडीत महत्त्वाचे मुद्दे
गोदाम पावतीचा व्यवहार करतेवेळी, संभाव्य कर्जदार प्रथमत: गोदाम पावती वित्त पुरवठा प्रणालीच्या वापराबाबत व प्रक्रियेबाबत वित्तपुरवठादाराशी म्हणजेच बँकांशी सहमत असतो. त्यानंतर तो गोदाम पावतीचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्या किंवा शेतीमाल तारण व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्या यांचेमार्फत प्रत्यक्ष वापरण्यात येणारी गोदाम पावती व्यवस्थापन प्रणाली व्यवहारात स्वीकारार्ह आहे, यावर सहमत होतो. वित्तपुरवठादार म्हणजेच बँकसुद्धा गोदामाशी निगडित गोदाम व्यवस्थापन करणाऱ्या वेअरहाउसिंग किंवा शेतीमाल तारण व्यवस्थापन कंपन्या यांच्याशी गोदाम पावती प्रणालीचा वापर आणि प्रक्रियेबाबत सहमत असतो. नंतर हेच घटक वस्तूंच्या ठेवी स्वीकारण्यात वित्तपुरवठादाराचे एजंट म्हणून काम करतात.
वेअरहाउसिंग कंपन्या किंवा तारण व्यवसाय करणाऱ्या कंपनीमार्फत त्रयस्थ पुरवठादाराने साठवणूक ठेवलेल्या सर्व वस्तू तारण पावतीवर घेऊन स्वयंचलितपणे त्यावर वित्तपुरवठा करणे हे देखील बँकेसाठी शक्य असल्याने या कंपन्यांचा एजंट म्हणून बँकेमार्फत वापर करण्यात येतो. उदाहरणार्थ, राष्ट्रीय बल्क हँडलिंग कॉर्पोरेशन या शेतीमाल तारण कंपनीने गोदाम पावती वित्तपुरवठा व्यवसायासाठी सुमारे ३४ बँकांशी करार केला आहे.
गोदाम पावती व्यवसायातील काही प्रकरणांमध्ये, एखादी कंपनी प्रथम माल गोदामात जमा करू शकते आणि नंतर गोदाम पावत्यांच्या तारणावर वित्तपुरवठा करण्यास तयार असलेली बँक शोधू शकते. उदा. मलेशियाच्या मिरपूड विपणन मंडळाने सुरू केलेल्या गोदाम पावती योजनेत मिरपूड उत्पादकांना सुलभतेने वित्तपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलली आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने गोदाम पावतीवर इतर वित्तपुरवठादारांच्या तुलनेत कमी कर्जदराने २४ तासांत वित्तपुरवठा देणे सुरू केले आहे.
बरेच ग्राहक (उदा. शेतकरी, व्यापारी) एका बाजूला वखार महामंडळाच्या गोदामात धान्य साठवितात आणि त्याचवेळेस तासाभरात खासगी वित्तपुरवठादाराकडून महागड्या व्याजदराने वखार महामंडळाची गोदाम पावती देऊन कर्ज घेतात. वेअरहाउस रिसिप्ट फायनान्स किंवा गोदाम पावती वित्तपुरवठ्याची अशा प्रकारची अनेक उदाहरणे असून याबाबत युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड ॲण्ड डेव्हलपमेंटतर्फे झालेल्या परिषदेत चर्चा करण्यात आली आहे.
गोदाम पावतीशी निगडीत वित्तपुरवठा करण्यासाठी गोदाम पावत्यांचा वापर वेगवेगळ्या स्वरूपात होतो. गोदाम पावती केवळ वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशावरच नव्हे तर गोदामांच्या स्वरूपावर, गोदाम चालकांच्या आर्थिक परिस्थितीवर आणि ज्या कायदेशीर व नियामक व्यवस्थेखाली वित्तपुरवठ्याची रचना केली जाते, त्यावर अवलंबून असतो.
गोदामांचे स्वरूप
गोदामात साठविलेल्या वस्तू कर्जासाठी तारण म्हणून वापरल्या जातात, हे गोदाम पावती वित्तपुरवठा करण्याचे मूलभूत तत्त्व आहे. तथापि, गोदामात वस्तू ठेवण्यासाठी उत्पादित जागेवरून वस्तू हलविणे व वाहतूक आणि हाताळणी खर्च करणे हे कर्जदारास महाग पडू शकते, हे लक्षात ठेवले पाहिजे.
बहुतेक वस्तू अवजड असतात. अनेक जिल्ह्यांची अथवा देशांची दळणवळण, वाहतूक प्रणाली आणि रस्ते नेटवर्क हे अविकसित असते. म्हणून कर्जदार सामान्य पुरवठा साखळीतील गोदामे वापरणे पसंत करतात, ज्यात त्यांच्या स्वतःच्या जागेवरील गोदामांचा समावेश असतो. कर्जदाराला त्या वस्तू विकण्यापूर्वी जर त्यावर प्रक्रिया करावी लागणार असेल, तर त्या वस्तू कर्जदाराच्या जागेपासून दूर असलेल्या गोदामात हलविणे योग्य नसते. त्यामुळे चांगली व विश्वासार्ह सार्वजनिक गोदामे जेवढी असतील, तितकाच त्यांचा वापर करणे शेतकरी व प्रक्रियादारांच्या दृष्टीने फायदेशीर नसते. उदाहरणच घ्यायचे झाले, तर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत उभारण्यात आलेली गोदामे मोक्याच्या ठिकाणी असली तरी ती सर्वच ठिकाणी उपलब्ध असतीलच असे नाही.
शेतापासून महामंडळाची गोदामे दूर असल्याने व या परिसरात इतर गोदामे उपलब्ध नसल्याने, तसेच गावागावात असणाऱ्या व शेतकऱ्यास पीककर्ज देणाऱ्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडेसुद्धा गोदामासारखी साठवणुकीची सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकरी गोदामात धान्य साठवून गोदाम पावती संकल्पनेत स्वत:ला सामावून घेत नाही.
वित्तपुरवठादाराच्या दृष्टिकोनातून, कर्जदारांकडील वस्तूंकडे कर्जाची जोखीम हलविण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे वित्तपुरवठादारासाठी कर्जावरील जोखीम कमी करणे. परंतु हे तेव्हाच खरे असेल, जेव्हा गोदाम ऑपरेटर कर्जदारापेक्षा अधिक विश्वासार्ह असेल. तसेच संबंधित देशाची कायदेशीर आणि नियामक व्यवस्था वित्तपुरवठादाराला कर्जदाराने केलेल्या चुकांकरिता वस्तूंवरील त्याच्या महत्त्वाच्या अधिकारांचा वापर करण्यास परवानगी देईल. या सर्व कारणांमुळे, गोदाम पावतीसाठी वित्तपुरवठा वेगवेगळ्या गोदामांच्या प्रकारानुसार करता येतो
- प्रशांत चासकर ९९७०३६४१३०
(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., साखर संकुल, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.