Monsoon Prediction 2025: देशात यंदा दमदार पाऊसमान

Maharashtra Rainfall: हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार यंदा मॉन्सून हंगामात देशभर सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः महाराष्ट्रातील मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अधिक पाऊस पडण्याचे संकेत आहेत.
Rain Alert
Rain AlertAgrowon
Published on
Updated on

Pune News: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात यंदा चांगल्या पावसाचे संकेत आहेत. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीपेक्षा अधिक (१०५ टक्के) पावसाचे पूर्वानुमान भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक तफावतीची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे. राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मंगळवारी (ता. १५) मॉन्सून हंगामातील पावसाचा पहिल्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. १९७१ ते २०२० कालावधीत देशाची मॉन्सून पावसाची सरासरी ८७ सेंटिमीटर म्हणजेच ८७० मिलिमीटर आहे. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो.

Rain Alert
Monsoon 2025: देशातील १७ राज्यांना माॅन्सून चांगली साथ देणार: १० राज्यांची चिंता वाढणार

मॉन्सून हंगामातील पहिल्या टप्प्याचा अंदाज वर्तविताना प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान, भारतीय महासागरातील द्वि-धृविता (इंडियन ओशन डायपोल - आयओडी) आणि उत्तर गोलार्धातील हिमाच्छादन हे घटक विचारात घेतले आहेत. यंदाच्या मॉन्सूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (३३ टक्के), सरासरीइतक्या पावसाची शक्यता ३० टक्के आहे. तर दुष्काळाची शक्यता अवघी २ टक्के असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे. तर भारताचा अति उत्तरेकडील भाग, पूर्वोत्तर राज्ये आणि तसेच तमिळनाडू राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी ते सरासरी राहण्याची शक्यता आहे. मे अखेरीस हवामान विभागनिहाय सुधारित अंदाज जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी हवामान विभागाने देशात १०६ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात देशात सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक, तर महाराष्ट्रात २६ टक्के अधिक पाऊस पडला होता.

Rain Alert
Marathwada Monsoon 2025: मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस; राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जास्त पावसाचा अंदाज

‘एल निनो’ तटस्थ राहणार

विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान सरासरीवर असून, सध्या तटस्थ स्थिती म्हणजेच ‘ला-निना’ नाही, आणि ‘एल-निनो’ नाही अशी स्थिती आहे. मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडल्सनुसार मॉन्सून हंगामात ही तटस्थ स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. यातच उत्तर गोलार्धातील युरेशियामध्ये डिसेंबर ते मार्च दरम्यानच्या कालावधीत यंदा सरासरीपेक्षा कमी हिमाच्छादन होते.

बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (इंडियन ओशन डायपोल - आयओडी) सध्या तटस्थ (न्यूट्रल) स्थितीत आहे. मॉन्सून हंगामात आयओडी ही स्थिती टिकून राहण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरातील ‘ला-निना’ आणि तटस्थ स्थिती, युरेशियातील कमी हिमाच्छादन, हिंद महासागरातील धन आणि तटस्थ ‘आयओडी’ हे घटक मॉन्सूनच्या चांगल्या पावसासाठी अनुकूल मानले जातात.

महाराष्ट्रात यंदा चांगल्या पावसाचे संकेत

यंदाच्या मॉन्सून हंगामात महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे संकेत आहेत. मॉन्सून पावसाच्या वितरणाबाबत जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच दमदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मे अखेरीस सुधारित अंदाजात मॉन्सूनचे महाराष्ट्रातील वितरण आणखी स्पष्ट होऊ शकणार आहे.

मॉन्सूनची शक्‍यता :

पावसाचे प्रमाण----शक्‍यता

९० टक्‍क्‍यांहून कमी---२ टक्के

९० ते ९५ टक्के---९ टक्के

९६ ते १०४ टक्के---३० टक्के

१०४ ते ११० टक्के---३३ टक्के

११० टक्‍क्‍यांहून अधिक---२६ टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com