
Nashik News : ग्रामविकास, शैक्षणिक सुविधा निर्माण, वृक्षलागवड, आरोग्य या विषयांवर काम करत जाखोरी गावाने नवनवीन संकल्पनासह विकासाचा ध्यास घेतला आहे. गावातील पडीक माळरानावर वृक्ष लागवडीची प्रेरणादायी चळवळ सुरू झाली आहे. ‘वनक्रांती’ उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामविकास आणि पर्यावरण संवर्धनाचे काम येथे होत आहे.
२०१९ मध्ये गावातील काही ध्येयवादी युवकांनी ‘जयम फाउंडेशन’च्या सहकार्याने सुमारे ३५ एकर डोंगराळ जमिनीवर पाच हजार झाडांची लागवड करून ‘वनक्रांती’ हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाचा मुख्य हेतू केवळ वृक्षलागवड नव्हता, तर गावाच्या आर्थिक आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठी उपयुक्त असा वृक्षसंपदा व जैवविविधता निर्माण करणे हा होता.
त्यामुळे येथे आंबा, चिंच, जांभूळ यासारखी आर्थिकदृष्ट्या उत्पन्न देणारी झाडे प्राधान्याने लावण्यात आली आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारच्या २० ते २५ प्रजातींची झाडेही येथे आहेत. त्यामुळे जैवविविधतेचा समतोल राखत पर्यावरणपूरक वातावरण तयार झाले आहे.
‘वनक्रांती’ उपक्रमाच्या माध्यमातून १२ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे ६००० वृक्षांची टप्प्याटप्प्याने लागवड करून संवर्धन केले जात आहे.
दुष्काळी परिस्थितीत टँकरद्वारे पाणी आणून ही झाडे जगवण्यात आली. सिंचनासाठी बोअरवेलची सोय करण्यात आली आहे. स्थानिक ग्रामस्थ व स्वयंसेवकांच्या श्रमदानातून मातीचा बंधारा उभारण्यात आला आहे. हा बंधारा दरवर्षी पावसाळ्यात पूर्ण भरून वाहतो. पावसाळ्यात हिरवाईने नटलेला निसर्गरम्य वनक्रांती परिसर अधिकच मोहक दिसतो.
निसर्गसंपदा बहरल्याने वन्यप्राण्यांचा अधिवास वाढला आहे. येथे मोर, ससे यासह विविध पक्ष्यांचे दर्शन घडते. त्यामुळे हे ठिकाण पर्यावरण अभ्यास, नैसर्गिक छायाचित्रण आणि पक्षी निरीक्षणासाठीही उत्तम ठरत आहे. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक तसेच अनेक पर्यावरणप्रेमी कुटुंबे श्रमदान, भेटीसाठी नियमितपणे येथे येतात.
जाखोरी वनक्रांती हा केवळ वृक्षलागवडीपुरता मर्यादित उपक्रम नसून तो गावाच्या एकात्मतेचे आणि लोकसहभागातून घडवलेल्या विकासाचे प्रतीक आहे. या उपक्रमामुळे जैवविविधता संवर्धन, मृदा व जलसंधारण यासाठी मदत झाली आहे. या ठिकाणावर औषधी वनस्पती, स्थानिक फळझाडे आणि फुलझाडांच्या प्रजाती वाढवून ‘निसर्ग पर्यटन’ विकसित करण्याचाही विचार सुरू आहे.
पुढील पिढ्यांसाठी हरित वारसा
जाखोरी वनक्रांती हा ग्रामविकास, पर्यावरण संवर्धन आणि सामूहिक श्रमदान यांचा संगम असलेला उपक्रम पुढील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करीत आहे. ‘गावच्या विकासासाठी गावकऱ्यांनीच पुढाकार घ्यावा’ असा संदेश यातून दिला जात आहे.
या उपक्रमात नाशिक येथील जयम फाउंडेशन, जाखोरी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद नाशिक, पंचायत समिती नाशिक यांचे सहकार्य लाभले आहे. चिंच, जांभूळ, आंबा, मोह व फणस या झाडांसह काही औषधी वनस्पतींचा समावेश आहे. यामागे ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढावे हा उद्देश ठेवण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.