
News: महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान गुरुवारी (ता. १७) सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवन परिसरात जोरदार हाणामारी झाली.
या घटनेने सभागृहात तणाव निर्माण झाला. या प्रकरणी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे.गुरुवारी सायंकाळी विधानसभेच्या लॉबी परिसरात दोन्ही आमदारांचे कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडले. या भांडणात जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
या घटनेमुळे आमदारांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची दखल घेत तातडीने कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. यासंदर्भात पोलिसांनी दोन्ही गटांतील काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.मध्यरात्री पोलिस नितीन देशमुख यांना अटक करण्यासाठी गेल्यावर जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र विरोध केला.
त्यांनी पोलिसांच्या गाडीखाली येण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती आणखी चिघळली. या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. "महाराष्ट्राची काय अवस्था झाली आहे? आता काही काळानंतर विधानभवन परिसरात खूनही पडतील असं ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "सत्ताधारी आमदारांना वाटतं की सत्ता आली म्हणजे ते कायदा हातात घेऊ शकतात. कुणालाही दमदाटी करू शकतात. सत्ताधारी पक्ष अशा लोकांमार्फत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे."
आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही आपली बाजू मांडली. ते म्हणाले, "हे लोक मला मारण्यासाठीच इथे आले होते. मकोका लागलेल्या गुंडांना सोबत घेऊन आमदार सभागृहात परिसरात येतात आणि गुंडागर्दी करतात. आम्ही आमदार म्हणून राहायचं की नाही? असं चाललं तर आमदार राहण्याचा काय फायदा?" त्यांनी या घटनेमागे सुनियोजित कट असल्याचा आरोप केला.
दुसरीकडे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, "कायदा सर्वश्रेष्ठ आहे. विधानसभा अध्यक्ष जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल. आमच्या सहकाऱ्यांकडून चूक झाली आहे. जी काही कारवाई होईल, ती आम्ही स्वीकारू."
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.