Pune News : पावसाचे जवळपास दोन महिने उलटले आहेत. या कालावधीत राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपाचा पाऊस पडला. काही भागात मुसळधार पाऊस झाला. राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी तब्बल २२५ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडल्याची धक्कादायक नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. त्याचा फटका खरिपातील पेरणीवर झाला असून, अनेक ठिकाणी पुरेसा पाऊस नसल्याने पिके अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र आहे.
चालू वर्षी हवामान विभागाने १०६ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार राज्यातील १३० तालुक्यांत १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाल्याची नोंद झाली. पावसाने काही ठिकाणी दमदार हजेरी लावली. विशेष म्हणजे मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. परंतु जून व जुलै महिन्यांत कमीअधिक स्वरूपात पाऊस पडला.
यामध्ये एक जून ते ३१ जुलै या कालावधीत कोकण विभागात प्रत्यक्षात सरासरीच्या १७२६.३ पैकी १४९३.७ मिलिमीटर म्हणजेच ८६ टक्के, नाशिक विभागात सरासरीच्या ३५८.२ पैकी २६४.५ मिलिमीटर म्हणजेच ७३ टक्के, पुणे विभागात सरासरीच्या ५२५.८ पैकी ४१६.७ मिलिमीटर म्हणजेच ७९ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात सरासरीच्या ३२०.२ पैकी १७५.२ मिलिमीटर म्हणजेच ८८ टक्के, अमरावती विभागात सरासरीच्या ३८७.२ पैकी ३७०.१ मिलिमीटर म्हणजेच ९५ टक्के पाऊस पडला. तर नागपूर विभागात सरासरीच्या ५४९.४ पैकी ६२०.५ मिलिमीटर म्हणजेच ११२ टक्के पाऊस पडला आहे.
सद्यःस्थितीत पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील अनेक धरणे भरली आहेत. तर काही धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तो अजूनही सुरू असला तरी विसर्ग केलेल्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने त्याचा फटका बागायती जिरायती भागातील खरीप पिकांना बसत आहे. यंदा मे अखेरीस झालेल्या मुसळधार पावसामुळे भूजल पातळीत काहीशी वाढ होऊन धरणातही आवक सुरू झाली होती. मुसळधार पावसामुळे मे मध्येच शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आशा पल्लवीत झाल्या होत्या.
अनेक शेतकऱ्यांनी नियोजन करत पेरण्या केल्या होत्या. मात्र त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, खानदेश, मराठवाडा व विदर्भात पुरेसा पाऊस न झाल्याने त्याचा परिणाम पेरण्यांवर झाला. त्यामुळे राज्यात सरासरीच्या १४४ लाख ३६ हजार हेक्टरपैकी १३७ लाख ३४ हजार हेक्टर म्हणजेच ९५ टक्के पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात १४५ लाख ८२ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी ८ लाख ४८ हजार हेक्टरने कमी पेरणी झाली आहे.
ज्येष्ठ हवामान अभ्यासक डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले, की गेल्या काही वर्षांत राज्यातील विभागनिहाय पाऊसमान बदलत आहे. हवामान बदलामुळे १९७२ मध्ये प्रथम महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. १९७२ च्या दुष्काळात महाराष्ट्रातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी ८४ तालुके दुष्काळी वर्तविण्यात आले होते.
२००४ मध्ये मी कृषी हवामान शास्त्र विभागाचा प्रमुख असताना या तालुक्यांच्या एकूण ३० वर्षांचा हवामान विषयक आकडेवारीचा मी अभ्यास केला असता असे दिसून आले की हे सर्व तालुके एकूण १४ जिल्ह्यांतील असून दुष्काळी हवामान विभागातील आहेत.
या दुष्काळी पट्ट्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत एकूण ९ ते १० पाऊस जोरदार होतात. रब्बी ज्वारी, करडई, हरभरा ही पिके कमी पावसाच्या पाण्यावर उत्तम प्रकारे येतात, हा संशोधनाचा अहवाल मी कृषी विभाग भारत सरकारकडे सादर केला. मात्र पुढे हवामान बदलाचे प्रभावाने २०१२, २०१५, २०१८ आणि २०२३ अशी ४ वर्षे महाराष्ट्राने दुष्काळी वर्षे अनुभवली आणि त्यात एकूण १९ जिल्ह्यांतील १३२ तालुक्यांची वाढ झाल्याचे दिसून आले.
एक जून ते १ ऑगस्ट या कालावधीत पडलेल्या तालुकानिहाय पावसाची वर्गवारी :
वर्गवारी --- तालुके संख्या
२५ टक्क्यांपेक्षा कमी --- ०
२५ ते ५० टक्के ---- १०
५० ते ७५ टक्के ---- ६७
७५ ते १०० टक्के --- १४८
१०० टक्क्यांपेक्षा जास्त --- १३०
१०० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडलेले तालुके
२५ ते ५० टक्के ः नवापूर, तळोदा, धरणगाव, श्रीरामपूर, पाथर्डी, इंदापूर, करमाळा, चंदगड, आष्टी, लातूर.
५० ते ७५ टक्के ः पोलादपूर, श्रीवर्धन, कर्जत, माणगाव, दापोली, संगमेश्वर, सावंतवाडी, दोडामार्ग, वसई, इगतपुरी, धुळे, शिंदखेडा, शहादा, अक्राणी, अक्कलकुवा यावल, रावेर, अमळनेर, चोपडा, नगर, कोपरगाव, राहाता, जामखेड, शेगाव, नेवासा, राहुरी, बारामती, जुन्नर, उत्तर सोलापूर, माळशिरस, बार्शी, माढा, पंढरपूर, सांगोला महाबळेश्वर, पाटण, कडेगाव, खानापूर विटा, राधानगरी, शिरूर कासार, पाटोदा, धारूर, जळकोट, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, दवनी, धाराशिव, धर्माबाद, मुखेड, देगलूर, गंगाखेड, सोनपेठ, हिंगोली, नांदुरा, संग्रामपूर, अकोला, धारणी, अचलपूर, अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, दिग्रस, पुसद, सेलू, सिरोंचा.
७५ ते १०० टक्के ः ठाणे, उल्हासनगर, कल्याण, भिवंडी, शहापूर, रोहा, मुरुड, म्हसळा, तळा, पनवेल, खालापूर, सुधागड, महाड, चिपळूण, खेड, मंडणगड, रत्नागिरी, राजापूर, लांजा, देवगड, मालवण, वेंगुर्ला, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, पालघर, मालेगाव, चांदवड, देवळी, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगाणा, शिरपूर, नंदुरबार, जळगाव, जामनेर, बोधवाडा, मुक्ताईनगर, एरंडोल, संगमनेर, अकोला, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, पुरंदर, हवेली, वेल्हे, मंगळवेढा, अक्कलकोट, मोहोळ, सातारा, कोरेगाव, खटाव वडूज, माण दहिवडी, फलटण, मिरज, जत, तासगाव, आजरा, पन्हाळा, शाहूवाडी, बावडा, गडहिंग्लज, गंगापूर, सोयगाव, परतूर, घनसावंगी, मंठा, बीड, वडवणी, गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई, केज, परळी, औसा, रेणापूर, शिरूर अनंतमाळ, तुळजापूर, परंडा, भूम, कळंब, नांदेड, माहूर, उमरी, अर्धापूर, नायगाव, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, परभणी, पूर्णा, पालम, सेलू, मानवत, कळमनुरी, बसमत, सेनगाव, जळगाव जामोद, शेगाव, मलकापूर, मोताळा, चिखली, बुलडाणा, खामगाव, अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, वाशीम, मानोरा, कारंजा, दर्यापूर, अंजनगाव, चांदूर बाजार, धामणगाव, चिखलदरा, चांदूर रेल्वे, मोर्शी, वरुड, यवतमाळ, मोहगाव, घाटंजी, राळेगाव, बाभूळगाव, कळंब, नेर, उमरखेड, समुद्रपूर, कळमेश्वर, नरखेड, मोहाडी, तुमसर, आमगाव, तिरोडा, सडक अर्जुनी, गोंडपिपरी, वरोरा, भद्रावती, मुलचेरा.
राज्यातील पावसाची स्थिती
- राज्यात दोन महिन्यांत सरासरीच्या ५३८.५ मिलिमीटरपैकी ४९७.८ मिलिमीटर म्हणजेच ९२ टक्के पाऊस.
- राज्यातील १२ जिल्ह्यांत १०० टक्क्यांहून अधिक पाऊस.
- राज्यात २२ जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस.
- मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, मराठवाडा, खानदेश, पश्चिम विदर्भात कमी पाऊस.
यंदा राज्यातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी २२५ तालुक्यांत जून व जुलै या दोन महिन्यांचे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप पिके पुरेशा ओली अभावी संकटाशी सामना करीत आहेत. हवामानाचे दृष्टीने हे वर्ष अत्यंत वेगळे असून, खूप मोठा हवामान बदलाचा प्रभाव जाणवत आहे. या पुढे चांगला पाऊस होईल आणि बहुतांशी पिकांना जीवदान मिळेल, अशी अपेक्षा आहे.- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान अभ्यासक, पुणे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.