राहुल वडघुले
विविध कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशके तसेच बुरशीनाशकांचा सर्रास वापर केला जातो. मात्र शेतामध्ये नैसर्गिक पद्धतीने कीड व रोग नियंत्रण होते. निसर्गात काही बुरशी आहेत, ज्या किडींवर उपजीविका करून व त्या किडींना रोगग्रस्त करून मारतात. व किडींचे नियंत्रण करतात, अशा बुरशींना कीटकांवरील परोपजीवी बुरशी व त्यापासून तयार केलेल्या कीटकनाशकांना ‘जैविक कीटकनाशके’ असे म्हणतात.
यांचा नियमित वापर केल्यास प्रभावी नियंत्रण मिळविता येते. यामुळे रासायनिक कीटकनाशके व बुरशीनाशके यांचा वापर कमी करून पर्यावरणाचे रक्षण करू शकतो. तसेच या माध्यमातून रसायन अवशेषमुक्त अन्न लोकांना पुरविले जाईल.
सध्याच्या वातावरणात आपण सोयाबीन, मका या पिकांचे निरीक्षणे केल्यास आपल्याला सोयाबीनच्या पानावर किंवा मक्याच्या कणसावर काही अळ्या मेलेल्या व तिथेच चिकटलेल्या दिसतात. या अळ्या अगोदर पांढऱ्या रंगाच्या असतात. कालांतराने त्या हिरव्या दिसू लागतात. बऱ्याच वेळा त्या पक्ष्यांच्या विष्ठेसारख्या देखील दिसतात. असे का होते..? याविषयी आजच्या लेखात माहिती घेऊ.
मेटाऱ्हायझियम बुरशीची ओळख
ही एक प्रकारची बुरशी आहे.
बुरशीचे शास्त्रीय नाव ः मेटाऱ्हायझियम रीलेयी (Metarhizium rileyi)
बुरशीचे डिव्हिजन ः Ascomycota
परजीवी प्रकार ः नेक्रोट्रोफीक परजीव (Necrotrophic Parasite)
उपयोग ः अनेक पतंग, भुंगे, मावा, मिलीबग, हुमणी यांचे नियंत्रण.
पोषक वातावरण
या बुरशीच्या वाढीसाठी साधारणपणे २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान आणि ७० ते ७५ टक्के आर्द्रता अत्यंत पोषक असते.
नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी करावयाचे प्रयत्न
जैविक कीडनाशकांचा वापर वाढवावा.
प्रत्येक कीटकनाशकांच्या फवारणीसोबत जैविक कीडनाशकाचा वापर करता येईल.
आवश्यकता असेल तरच बुरशीनाशकांचा वापर करावा.
शक्यतो बुरशीनाशकांचा वापर टाळावा. किंवा बुरशीनाशकांच्या फवारणीनंतर ८ दिवसांनी पुन्हा जैविक कीडनाशकांचा वापर करावा.
जैविक कीडनाशक जमिनीवर धुरळणी
किंवा फवारणीच्या माध्यमातून जास्त वापर करावा.
मेटाऱ्हायझियम बुरशी कशी काम करते?
या बुरशीचे बीजाणू शेतात असतात. ज्या वेळी एखादी अळी झाडावर फिरत असते, तेव्हा हे बीजाणू त्या अळीच्या शरीरावर चिकटतात. एकदा शरीरावर हे बीजाणू चिकटले की त्यांची पुढील वाढ सुरू होते. त्यानंतर ही बुरशी कायटीनेज, लिपेज, प्रोटीयेज अशी संप्ररके (एन्झाईम) तयार करून कीटकांच्या शरीरात प्रवेश करते.
शरीरामध्ये (Hemocoel) ही बुरशी पसरत जाते. या बुरशीचा संसर्ग झाल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून अळीची हालचाल मंदावते, खाणे बंद होते आणि तिचा रंग बदलत जातो (फिक्कट पिवळसर). बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यापासून साधारणपणे एक आठवड्यात अळी मरते. चौथ्या दिवसापासून अळीच्या शरीरावर पांढऱ्या रंगाची, तर दहाव्या दिवसापासून ही वाढ हिरवी दिसू लागते.
सूक्ष्मदर्शकाखाली काय दिसते?
सूक्ष्मदर्शकाखाली आपण या बुरशीचे बीजाणू (कोनिडिया) स्पष्टपणे पाहू शकतो. हे बीजाणू तिळाच्या आकारासारखे दिसतात. बीजाणूमध्ये पेशी भित्तिका नसते. बीजाणूदंड (Conidiophore) हे सरळ असतात, त्यावर दोन ते चार गुच्छामध्ये बीजाणू तयार होतात. एखाद्या झाडाच्या फांदीप्रमाणे हे बीजाणूदंड दिसतात.
कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत. फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे.
खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे.
बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे.
लेबल क्लेम वाचावेत.
पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत.
रसायनांचा गट तपासावा.
पीएचआय, एमआरएल तपासावेत.
पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.
मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा.
पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.