कु. सुहासिनी केदारे,डॉ.आर.बी.क्षीरसागर
Bibba Ayurvedic Herb: बिब्बा ही वनस्पती महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, ओरिसा आणि तामिळनाडूच्या जंगल भागात आढळते. महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा विभागातील नांदेड, हिंगोली, लातूर, परभणी व बीड या जिल्ह्यांमध्ये नैसर्गिकरित्या बिब्बा झाडे आढळतात. ही वनस्पती आयुर्वेदात भल्लातक या नावाने ओळखली जाते. बिब्बा झाडाचा प्रत्येक भाग औषधी दृष्टिकोनातून उपयुक्त असून त्याचा उपयोग विविध आजारावर केला जातो. बिब्बा ही वनौषधी ग्रामीण भागातील आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे स्रोत ठरू शकते. बिब्ब्याचे बी, तेलास औषधी उत्पादन कंपन्यांकडून मागणी आहे.
बिब्बा हे मध्यम आकाराचे ते मोठ्या उंचीचे झाड आहे. याची उंची साधारणतः १५ ते २५ मीटर पर्यंत जाते. झाडाची पाने मोठी, गुळगुळीत आणि टोकाला गोलसर असतात. फुले हिरवट पांढरट रंगाची असून, फळे ही सुरुवातीला हिरवी असतात व नंतर पिकल्यावर काळसर रंगाची होतात. फळाच्या वरचा भाग नारिंगी-तपकिरी रंगाचा गोडसर गर असतो आणि खालचा भाग काळसर व टणक असतो, ही बी असते.
औषधी उपयोग
पाने : उपयोग पचन सुधारण्यासाठी, ज्वर कमी करण्यासाठी, तसेच त्वचारोगांवर लेप स्वरूपात केला जातो. यामध्ये अॅण्टीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात.
फळ (बी) : विविध आजारांवर आयुर्वेदात वापरली जाते. ही मूळव्याध, कुष्ठरोग, त्वचारोग, संधिवात, मधुमेह, कॅन्सर, कृमिरोग, वायू विकार, रक्तअल्पता यावर प्रभावी आहे.
तेल : बीपासून मिळणारे तेल त्वचारोग, सांधेदुखी, फोडांवर बाहेरून लावण्यासाठी वापरले जाते.
फूल : डोळ्यांच्या विकारावर वापरली जातात.
साल व गोंद : झाडाच्या सालीतून येणारा गोंद मानसिक थकवा, लैंगिक दुर्बलता, आणि त्वचारोगांवर उपयोग होतो.
फळाचा गर : जंतुनाशक आणि कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. मात्र, तो विषारी असल्यामुळे शुद्धीकरण करूनच वापर करावा.
शुद्धीकरणाची गरज
बिब्बा ही वनस्पती उष्ण व तीव्र गुणधर्माची आहे. त्यामुळे तिचा वापर करण्यापूर्वी शुद्धीकरण करणे अत्यावश्यक असते. बिब्ब्याच्या बींमध्ये असणारे बिब्बावनॉल हे घटक त्वचेवर फोड, पुरळ, जळजळ निर्माण करू शकतात.
शुद्धीकरणासाठी बी पाण्यात टाकून फक्त बुडणाऱ्या बी निवडाव्यात. नंतर त्या बी गाईच्या दुधात, दही, गोमूत्रात किंवा नारळाच्या पाण्यात भिजवून ठेवाव्यात. काही वेळ नंतर त्यांचा उपयोग औषधात केला जातो. विटेची भुकटी वापरूनही तीव्रता कमी केली जाते. ही प्रक्रिया तज्ज्ञांच्या सल्यानेच करावी.
पोषणातील महत्त्व
बिब्ब्यामध्ये अमिनो अॅसिड्स, जीवनसत्त्वे, आणि खनिजे यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते, रक्त वाढते, प्रतिकारशक्ती सुधारते.
शुद्ध बिब्बा रसायनाचा नियमित वापर केल्यास शरीरात स्फूर्ती, शक्ती, आणि चयापचय सुधारतो.
गुणधर्म आणि फायदे
दाहशामक : बियांचा अर्क शरीरातील सूज कमी करण्यासाठी प्रभावी आहे. विशेषतः सांधेदुखी, आमवात यावर त्याचा उपयोग होतो. एका अभ्यासात बिब्ब्याचा अर्क इंडोमेथासिन या एलोपॅथी औषधाइतका प्रभावी आढळला.
संधिवात आणि गाठीवर उपचार : बिब्बा दूधमिश्रित अर्काने संधिवाताने त्रस्त प्राण्यांमध्ये लक्षणीय आराम आढळला. यामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून सांध्यांतील सूज व वेदना कमी होतात.
अॅण्टीऑक्सिडंट : बिब्बा विविध अॅण्टीऑक्सिडंट एंझाइम्सची पातळी वाढवतो आणि पेशींच्या नुकसानापासून संरक्षण करतो. त्यामुळे तो कॅन्सर, मधुमेह, वयजन्य आजारांमध्ये उपयोगी ठरतो.
जंतुनाशक : बिब्ब्याच्या अल्कोहोलिक आणि तेलीय अर्कांनी विविध जंतूंवर, विशेषतः टेटनस वायफळ करणाऱ्या जिवाणूंवर प्रभाव दाखवला आहे.
कर्करोगावर परिणामकारक : बींमधील फॅनॉलिक संयुगे जसे की बायफ्लाव्होनॉईड्स, कॅन्सर पेशींच्या वाढीला प्रतिबंध करतात. हे ल्युकेमिया आणि यकृत कर्करोगावर प्रयोगशाळेत प्रभावी ठरले आहे.
गर्भप्रतिबंधक : बिब्ब्याच्या फळाचा अर्क नर उंदरांमध्ये वीर्यनिर्मितीवर परिणाम करतो. त्यामुळे नैसर्गिक गर्भप्रतिबंधक म्हणून याचा अभ्यास सुरू आहे.
रक्तातील साखर कमी करणे : बिब्ब्याच्या अर्काने मधुमेही उंदरांमध्ये रक्तातील साखर कमी झाली. एलोपॅथी मधील टोलबुटामाइड या औषधाशी तुलना करता तो प्रभावी ठरला.
रक्तातील चरबी आणि कोलेस्टेरॉल कमी करणे : बिब्ब्याचा तेलयुक्त अर्क कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतो, आणि चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवतो.
कृमिनाशक : भारतीय गांडुळांवर केलेल्या प्रयोगांमध्ये बिब्ब्याचे विविध अर्क हे कृमींच्या हालचाली थांबवून त्यांना मारतात.
हृदय रक्षण : बिब्ब्याच्या अर्काने हृदयविकाराच्या स्थितीत हृदयातील पेशींना होणारे नुकसान कमी होते. यामुळे हृदय विकारांवरील उपयोगासाठी संशोधन सुरू आहे.
आयुर्वेदीक औषधे : बिब्बा रसायन, महाबिब्बा गुड, बिब्बादी मोदक,बिब्बादी काढा, बिब्बा तेल, संजीवनी वटी, बिब्बा घृत,बिब्बा अवलेह.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.