
विकास जाधव
Health Benefits : सातारा जिल्ह्यातील निसराळे येथील श्रीकांत घोरपडे यांनी मामेबंधू डॉ. श्रीधर पवार यांच्या भागीदारीतून वर्णे (ता. सातारा) येथे औषधी व मसालेवर्गीय वनस्पतींपासून आरोग्यदायी नावीन्यपूर्ण उत्पादने तयार केली आहेत. शेतकऱ्यांसोबत करार शेतीतून उत्पादन निर्मिती व विक्रीपर्यंतची मूल्यसाखळी त्यांनी विकसित केली आहे. महाराष्ट्रासह सुमारे वीस राज्यांत ‘सरस’ उद्योगांतर्गत पंचात्म ब्रॅण्डच्या या दर्जेदार उत्पादनांना मागणी आहे.
निसराळे (ता. जि. सातारा) हे मूळ गाव असलेले श्रीकांत महादेव घोरपडे एमबीएचे शिक्षण घेतलेले युवा शेतकरी आहेत. त्यांची सहा एकर शेती असून दोन एकर खंडाने घेतली आहे. त्यांनी काही काळ श्रीकांत यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. मात्र थोडक्यात यश चुकले. त्यांचे मामे बंधू डॉ. श्रीधर राजेंद्र पवार आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्यांच्यासोबतच्या चर्चेत ग्राहक आरोग्याविषयी अधिक जागरूक झाल्याचा मुद्दा पुढे आला. त्यातूनच आयुर्वेदिक व औषधी वनस्पतींपासून आरोग्यदायी उत्पादने निर्मिती उद्योगाची संकल्पना पुढे आली.
उद्योगाची उभारणी
पहिला टप्पा म्हणून २०१८ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर निसराळे व वर्णे येथे शतावरी, अश्वगंधा, सफेद मुसळी, स्टिव्हिया या औषधी वनस्पती व आले, हळद या मसालेवर्गीय वनस्पतींची लागवड आपल्या शेतात केली. त्यावर आधारित प्रक्रिया करायची असल्याने उत्तर भारतातील बाजारपेठा, म्हैसूर येथील अन्नप्रक्रिया उद्योगातील संस्था, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, बोरगाव कृषी विज्ञान केंद्र यांना भेटी दिल्या.
उद्योग उभारणीसाठी पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री यांच्यासाठी अर्थसाह्य मिळविण्यात अनेक अडचणी आल्या. बँक ऑफ महाराष्ट्रचे सहकार्य मिळाले. सन २०२० मध्ये कोविडच्या सुरुवातीला वर्णे (ता. सातारा) या मामाच्या गावी सरस आंत्रप्रिनर्स या नावाने निर्जलीकरण आणि अन्नप्रक्रिया उद्योगाची उभारणी झाली. सन २०२१ मध्ये प्रत्यक्ष सुरुवात केली.
उद्योगातील ठळक बाबी
कंपनीचे साडेसहा हजार चौरस फूट एकूण क्षेत्र. पैकी दोन हजार चौ. फुटांत प्रक्रिया युनिट, तर १८०० चौ. फुटांत सौरऊर्जेवरील टनेल ड्रायरची उभारणी.
अलीकडील काळात उद्योगातील एकूण गुंतवणूक ७० लाखांहून अधिक.
श्रीकांत पूर्णवेळ उद्योग सांभाळतात. ते कार्यकारी संचालक असून डॉ. श्रीधर संशोधन- विकास जबाबदारी पाहतात. उद्योगात राजेंद्र पवार, महादेव घोरपडे, मानसिंग पवार, बोरगाव कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भूषण यादगिरवार यांच्यासह कृषी विभागाचे वेळोवेळी सहकार्य.
उत्पादने
शतावरी पावडर व ‘ग्रॅन्यूल्स’, लहान मुलांसाठी ब्राह्मीयुक्त सत्वफल, खेळाडू आणि नियमित व्यायाम करणाऱ्यांसाठी टॉनिकव्हिट, अश्वगंधा, स्टिव्हिया, मोरिंगा व सफेद मुसळी यांच्या पावडर्स.
मसाले वनस्पतींपासून सुंठ, हळद, मिरची, लेनमग्रास यांच्या पावडर, हळद, हिरव्या मिरची, लेमनग्रास, जिंजर यांचे फ्लेक्स.
आवळा कॅण्डी, लिंबाचे तेलमुक्त (ऑइल फ्री) लोणचे, आवळा पावडर
शतावरी तसेच उपवासाच्या राजगिरा, मल्टी मिलेट, नाचणी, खपली गहू यांच्या कुकीज.
ड्राय चिकूफोडी, केळी पावडर, मध
एकूण २५ हून अधिक उत्पादने. ‘पंचात्म’ असे ‘ब्रॅण्डनेम’.
१००, २००, ५०० ग्रॅम ‘फूड ग्रेड पेट जार’ पॅकिंग.
ॲल्युमिनिअम फॉइलचा वापर करून जार हवाबंद केले जातात.
उद्योगाचा विस्तार
महाराष्ट्रासह वीसहून अधिक राज्यांपर्यंत आयुर्वेदिक पावडर्स, कच्चा माल, उत्पादनांची विक्री वितरक, रिटेलर्स यांच्या माध्यमातून होते. काही डॉक्टरही उत्पादनांचे ग्राहक असून ते आरोग्यदायी उत्पादनांविषयी रुग्णांना सल्ला देतात. मानवी औषध निर्मितीतील तसेच पशुखाद्य निर्मितीतील कंपन्या, दूध संघ यांनाही पूरक आहार तयार निर्मितीसाठी शतावरी, अश्वगंधा, आले, हळद पावडर, अन्य कच्चा माल, उत्पादने यांचा पुरवठा होतो. देशभरात उत्पादने पोहोचवण्यासाठी भारतीय डाक विभाग व कुरियन क्षेत्रातील काही कंपन्यांसोबत करार केले आहेत.
‘मार्केटिंग’साठी प्रयत्न
सोशल मीडियाच्या विविध माध्यमांतून ‘पंचात्म’ च्या उत्पादनांचे ‘प्रमोशन’.
कृषी प्रदर्शनांमध्ये सहभाग.
‘ऑनलाइन विक्री प्लॅटफॉर्म वर नोंदणी. सीमॅप, स्पाइसेस बोर्ड यांच्या ‘बायर सेलर मीट’मध्ये सहभागी होऊन उत्पादनांचे ‘मार्केटिंग’.
काही मार्केटिंग प्रतिनिधीची नेमणूक केली आहे. पूर्णवेळ प्रशिक्षित सात कामगार कार्यरत.
सन २०२२ मध्ये १२ लाख, २०२३ मध्ये ३५ लाख तर यंदा ६० लाखांपर्यंत वार्षिक उलाढाल.
‘सरस’च्या आदर्श कार्यपद्धती
करारशेती : शेतात कच्चा माल उत्पादनापासून ते प्रक्रिया निर्मिती व विक्री अशी मूल्यसाखळीच विकसित केली आहे. सुमारे २० ते २५ शेतकऱ्यांसोबत करार शेती केली आहे. हमीभाव व ‘बाय- बॅक’ची खात्री देऊन त्यांच्याकडून खरेदी होते. कच्च्या मालाच्या उत्पादनावर नियंत्रण असल्याने प्रक्रिया उत्पादनांची गुणवत्ताही उत्तम ठेवणे व तसे ग्राहकांना पटवून देणे सोपे झाल्याचे श्रीकांत सांगतात.
पर्यावरण संवर्धन
सौरऊर्जेवरील ‘ड्रायर्स’च्या माध्यमातून वीजबिलात दररोज ७०० ते ८०० रुपयांची बच होत आहे.
कंपनी कार्यक्षेत्रात आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची लागवड. दहा मधुमक्षिका पेट्या ठेवल्या आहेत.
प्रक्रिया उद्योगातील टाकाऊ घटकांपासून कंपोस्ट खतनिर्मिती.
आरोग्य स्वच्छता
उत्पादने विक्रीसाठी ‘एफएसएसएआय’चा परवाना.
कर्मचाऱ्यांना अन्नप्रक्रिया व आरोग्य स्वच्छतेचे प्रशिक्षण. हातमोजे, हेअरनेट, मास्क, स्वच्छ गणवेश घालणे बंधनकारक.
सुमारे १६ विविध यंत्रांची सुविधा. सर्व यंत्रे एसएस ३०४ या फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलवर आधारित.
पाण्यासाठी ‘आरओ’ तंत्राचा वापर.
आरोग्य स्वच्छता व अन्न सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन.
श्रीकांत घोरपडे ९२०९९१९९१८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.