Carbon Emission Agrowon
ॲग्रो विशेष

Carbon Emission : कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी उपाययोजना

Team Agrowon

डॉ. राहुल शेलार

Measures to Reduce Carbon Emissions : हवामान बदल ही संपूर्ण जगामध्ये एक व्यापक समस्या बनली आहे. यामुळे पृथ्वीच्या सरासरी तापमानामध्ये सतत वाढ होताना दिसत आहे, त्याचाच विपरीत परिणाम म्हणून अलीकडच्या काळामध्ये पाऊस पद्धतीमध्ये अनियमितता, समुद्र पातळीत वाढ, अतिवृष्टी, दुष्काळ आणि इतर हवामानविषयक आपत्तींमध्ये वाढ झाली आहे. या सर्व घटकांचा एकत्रित प्रभाव आपले दैनंदिन जीवन, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवर होत आहे.

सततचे वाढते तापमान, अनियमित पाऊस, दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेती उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे अन्न सुरक्षेला धोका निर्माण झाला असून त्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. हवामान बदलामुळे नवीन कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, ज्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. समुद्र पातळीत होणाऱ्या वाढीमुळे किनारपट्टीच्या भागात शेत जमीन बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. वातावरणामधील सतत वाढत चाललेली कार्बन डायऑक्साइडची पातळी हे हवामान बदलामागील प्रमुख कारण आहे.

वातावरणात कार्बन डायऑक्साइड वाढण्याची कारणे

जंगलतोड : अमर्याद वृक्षतोडीमुळे जंगलांची कार्बन शोषण क्षमता कमी होते.

जीवाश्म इंधन : कोळसा, पेट्रोल, डिझेल हे जीवाश्म इंधन जळल्याने कार्बन उत्सर्जनात वाढ होते.

औद्योगिकीकरण : कारखान्यांमधून सोडल्या जाणाऱ्या वायुमधून प्रदूषणात वाढ होते.

वाहतूक : वाहनांच्या धुरातून कार्बन उत्सर्जन होते.

ऊर्जा उत्पादन : विद्युत निर्मितीसाठी जीवाश्म इंधनांचा वाढता वापर.

कृषी : शेतीमध्ये वापरली जाणारी रासायनिक खते आणि सदोष शेती पद्धती कार्बन उत्सर्जनात भर टाकतात.

कार्बन स्थिरीकरण

कार्बन डायऑक्साइड हा एक प्रमुख हरितगृह वायू आहे, जो पृथ्वीच्या वातावरणात उष्णता अडकवून तापमान वाढवतो. कार्बन स्थिरीकरण ही हवामान बदलाच्या परिणामांना मंदावण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. कार्बन स्थिरीकरण म्हणजे वातावरणातून अतिरिक्त कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन त्याला सुरक्षित ठिकाणी साठवणे. कार्बन साठवणुकीच्या जैविक आणि भूगर्भशास्त्रीय अशा दोन प्रमुख पद्धती आहेत.

जैविक कार्बन स्थिरीकरण

जैविक कार्बन स्थिरीकरण म्हणजे वनस्पती, माती आणि इतर जीवसृष्टीच्या मदतीने कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन त्याचे साठवण करण्याची प्रक्रिया आहे. यामध्ये वनसंवर्धन, वृक्षारोपण, मातीचे संवर्धन आणि जैविक कृषी यांचा समावेश होतो.

भूगर्भशास्त्रीय कार्बन स्थिरीकरण

म्हणजे कार्बन डायऑक्साइडला पृथ्वीच्या कवचात साठवण्याची प्रक्रिया आहे. यामध्ये कार्बन डायऑक्साइडला द्रव अवस्थेत बदलून खोल समुद्रात किंवा खडकांच्या पोकळीमध्ये इंजेक्ट केले जाते. या पद्धतीला अत्यंत प्रगत तंत्रज्ञान आणि सुरक्षा उपाय आवश्यक असतात. त्यामुळे ही पद्धत थोडीशी खर्चिक असते.

जैविक कार्बन स्थिरीकरण

जैविक कार्बन स्थिरीकरण म्हणजे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन त्याचे साठवण करण्याची प्रक्रिया आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी वनस्पती, माती आणि इतर जैविक घटकांच्या मदतीने होते.

वनस्पतींची भूमिका

वनस्पती कार्बन चक्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. वनस्पती प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. त्याचा वापर कार्बोहायड्रेट्स तयार करण्यासाठी करतात. हे कार्बन त्यांच्या शरीरात, विशेषत: लाकडात आणि मुळांमध्ये साठवले जाते.

मातीची भूमिका

जेव्हा वनस्पती संपते किंवा त्यांची पाने गळतात, तेव्हा त्यांचे अवशेष जमिनीत पडतात. या अवशेषांचे विघटन होऊन मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ म्हणून कार्बन साठवला जातो.

मातीतील सूक्ष्मजीव हे सेंद्रिय पदार्थ विघटित करतात. त्यातून मिळालेला कार्बन मातीमध्ये ह्यूमस म्हणून साठवला जातो. ह्यूमस हा मातीला सुपीक बनवणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. तो पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवतो, मातीची रचना सुधारतो आणि पिकांना आवश्यक पोषक तत्त्वे पुरवतो.Measures to reduce carbon emissions

कार्बन साठवणुकीचे मार्ग

वनसंवर्धन आणि वृक्षारोपण

कार्यप्रणाली : वृक्ष प्रकाशसंश्लेषणाद्वारे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि त्याचा वापर कार्बोहायड्रेट्स तयार करण्यासाठी करतात. हा कार्बन त्यांच्या लाकडात, मुळांमध्ये आणि मातीमध्ये साठवला जातो.

फायदे

मोठ्या प्रमाणात कार्बन साठवण, जैवविविधता वाढवणे.

मातीची धूप रोखणे, हवेची गुणवत्ता सुधारणे.

मातीचे संवर्धन

कार्यप्रणाली : मातीचे संवर्धन हे कार्बन साठवणुकीचा एक प्रभावी आणि दीर्घकालीन उपाय आहे. मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढवून कार्बन साठवण वाढवता येते.

पद्धती

पिकांची फेरपालट : वेगवेगळ्या पिकांची एकाच जागी एकाआड एक लागवड करून मातीची सुपीकता वाढवता येते.

आच्छादन पिके : पिकांच्या दरम्यान इतर पिके लावून मातीची धूप रोखता येते आणि सेंद्रिय पदार्थ वाढतो.

जैविक खते : जनावरांचा कचरा आणि इतर जैविक पदार्थ वापरून तयार केलेले खते मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढवतात.

कमी नांगरणी : नांगरणीमुळे मातीतील सेंद्रिय पदार्थ नष्ट होतो. कमी नांगरणीमुळे मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ टिकून राहतो. पारंपरिक नांगरणीच्या तुलनेत कमी प्रमाणात किंवा कमी खोल नांगरणी करणे.

या सर्व प्रक्रिया एकत्रितपणे जैविक कार्बन साठवणुकीला चालना देतात. मात्र, या प्रक्रियेला वेळ लागतो आणि दीर्घकालीन दृष्टिकोन आवश्यक आहे. जैविक कार्बन स्थिरीकरणासाठी वनसंवर्धन, शेती पद्धतींमध्ये बदल आणि जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.जैविक कार्बन स्थिरीकरण ही हवामान बदलाच्या वाढत्या धोक्याला तोंड देण्यासाठी एक अत्यंत आवश्यक आणि प्रभावी रणनीती आहे. वातावरणात वाढत्या प्रमाणात सोडल्या जाणाऱ्या कार्बन डायऑक्साइडमुळे होणाऱ्या जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाच्या परिणामांना रोखण्यासाठी ही एक प्रमुख पद्धत आहे. तरी, त्याचे यश सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांवर अवलंबून असते. शासन, उद्योग आणि नागरिकांनी आपापल्या पातळीवर प्रयत्न करून या दिशेने काम करणे आवश्यक आहे.

डॉ.राहुल शेलार, ९८८१३८०२२७ (मृद व जल संधारण अभियांत्रिकी विभाग,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी,जि.नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Power : पश्चिम विदर्भातील ६ हजार घरांवर सौर ऊर्जानिर्मिती

Suryaghar Yojana : छत्रपती संभाजीनगर परिमंडलात ३६५३ जणांना सूर्यघर योजनेचा लाभ

Majhi Ladki Bahin Yojana : तुम्ही ताकद द्या, ‘लाडकी बहीण’चा निधी वाढवू

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT