Inter-Cultivation In Cotton Crop : एखादी वनस्पतीची वाढ आणि त्याने व्यापली जाणारी जागा यावर वातावरणाचा परिणाम होत असतो. पिकांची तणाशी स्पर्धा करण्याची एक ठराविक कार्यक्षमता असते. त्यावरही परिणाम होतो. त्यामुळे कापूस पिकामध्ये हेक्टरी झाडांची संख्या निर्धारित संख्येच्या जवळपास असावी.
दोन ओळीतील अंतर व दोन झाडातील अंतर यावर हेक्टरी झाडांची संख्या अवलंबून असते. रिकाम्या जागेत तणे फार जोमाने वाढतात. त्यामुळे नांगे किंवा खाडे लवकरात लवकर भरावेत. तसेच पीक फार दाट असेल तर पिकांमध्येच स्पर्धा सुरू होते. ही स्पर्धा सुरू होण्याआधीच विरळणीचे काम उरकून घ्यावे. पिकांच्या दोन ओळीतील अंतर कमी केल्यास तण नियंत्रण पातळीत वाढ होते.
कोरडवाहू स्थितीमध्ये अनेक शेतकरी (९०-९५ टक्के ) कमी कालावधीच्या बीटी कपाशीची लागवड करतात. कमी कालावधीच्या वाणांमध्ये आंतरमशागतीची कामे ही वेळेवर होणे महत्त्वाचे असते. सध्याची कापूस पिकाची अवस्था लक्षात घेता या पिकामध्ये आंतरमशागतीची कामे प्राधान्याने करावीत. त्यात उगवणीनंतर पहिल्या आठवड्यात खाडे किंवा नांगे भरण्याचे काम महत्त्वाचे असते. ते बहुतांश शेतकऱ्यांनी पार पाडले असेल. सध्या उशिरा पेरलेल्या
कापूस पिकात विरळणीची कामे बाकी असतील. ती लवकरात लवकर उरकून घ्यावीत. त्यानंतर वरखताची मात्रा देणे, डवरणी व खुरपणीद्वारे तणांचे व्यवस्थापन करावे.
आंतरमशागतीचे प्रमुख फायदे
तण नियंत्रण
जलधारण क्षमता वाढविणे.
जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकवून ठेवणे.
जमिनीला पडलेल्या भेगा बुजवणे.
जमिनीचा पृष्ठभाग कडक झाल्यास तो मोकळा करणे.
जमिनीतील हवेचे प्रमाण संतुलित ठेवणे.
जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या व त्याची कार्यक्षमता वाढवणे.
प्रति हेक्टरी झाडांची अपेक्षित संख्या ठेवणे इ.
आंतर मशागत व तण व्यवस्थापन
कपाशीचे पीक पहिले ९ आठवडे तण विरहित ठेवणे आवश्यक असते. त्याकरिता बियाणे उगवणीनंतर १० ते २० दिवसाच्या अंतराने दोन ते तीन वेळा डवरणी करावी. आवश्यकतेनुसार २ ते ३ वेळा निंदणी करावी. खुरपणी व निंदणी ही शेतकऱ्यांमध्ये प्रचलित असलेली महत्त्वाची आंतरमशागतीची कामे आहेत.
पण निंदणीचे काम त्रासदायक, वेळखाऊ व खर्चिक असते. आपल्याकडे असलेला जमिनीचा प्रकार, मजुरांची उपलब्धता व मजुरीचे दर या बाबींचा विचार करून खुरपणीच्या कामाचे योग्य नियोजन करावे. (उदा.लाल माती असलेल्या जमिनी लवकर कडक होतात. म्हणून त्यात काळ्या जमिनीच्या तुलनेत अधिक मजूर लागतात.) विविध पिकांचा कालावधी, पीक व तण स्पर्धेचा कालावधी व पिकांचा प्रकार यानुसार २ ते ३ वेळा खुरपणी करावी.
डवरणीच्या कामाचे नियोजन योग्य प्रकारे केल्यास उत्पादन वाढीसाठी फायदा होतो. पिकातील दोन ओळीतील अंतर जास्त असल्यास डवरणीचे काम खोल व दीर्घकाळ करणे शक्य होते. शेतात हरळी, लव्हाळा या सारखी तणे असल्यास डवरणीचे काम करण्यात अडचणी येतात. त्यामुळे अन्य वार्षिक तणांचेही नियंत्रण होण्यात अडथळा निर्माण होतो. म्हणून या बहुवार्षिक तणांचे योग्य वेळी नियंत्रण करावे.
तणे एक व दोन पानांवर असताना डवरणी करून नष्ट करावीत. ही वेळ साधण्याचे कारण म्हणजे तणांच्या बियातील अन्नद्रव्यांचा साठा संपलेला असतो आणि मशागतीस लवकर बळी पडतात. तणे उंच वाढू दिल्यास त्याचे तुकडे होऊन त्यापासून नवीन रोपे तयार होतात. ( उदा. विंचू, उंदीरकाणी व हरळी इ.) डवरणी करताना फार खोल करू नये. त्यामुळे पिकांच्या मुळांना इजा पोचू शकते.
पीक उंच झाल्यावर डवरणी केल्यास फांद्या तुटून नुकसान होते. त्यामुळे डवरणीचे काम जमिनीत योग्य ओलावा असताना व वाढीची अवस्था लक्षात घेऊन करावे. जमीन कडक असल्यास डवऱ्याला दातेरी पास लावावी. डवरणी खोल करणे शक्य होते. डवरणीमुळे पिकांच्या मुळाच्या कार्यकक्षेत हवा खेळती राहते. पिकांना ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो.
रासायनिक खतांचे नियोजन
पिकाच्या वाढीसाठी खत व्यवस्थापन हे प्रामुख्याने माती परीक्षण आणि विद्यापीठांच्या शिफारशीनुसार करावे. रासायनिक खतांची पहिली मात्रा बहुतांश शेतकरी पेरणीसोबत देतात. त्यामुळे बियांचे अंकुरण झाल्याबरोबर झाडांच्या संतुलित वाढीकरिता भरपूर पालाश व स्फुरद पहिल्या एका महिन्यात कापसाच्या पिकाला लागतो.
या दरम्यान मुळांचा विस्तार परिपूर्ण झालेला नसल्यामुळे झाड जमिनीतील खोलवर असलेली मूलद्रव्ये घेऊ शकत नाही. त्यामुळे कापूस पीक वाढीच्या अवस्थेत (म्हणजेच पीक उगवणीपासून ३५ ते ४० दिवसांच्या आत) रासायनिक खताचा दुसरा हफ्ता द्यावा. तो पिकाला लागू होतो. मात्र हाच हफ्ता ४५ दिवसानंतर
दिल्यास पिकामध्ये कायिक वाढ जात होते. फांद्या जास्त निघून फुले व बोंडे कमी लागतात. परिणामी उत्पादनात घट येते. त्यामुळे कापूस पिकात वरखताची मात्रा ही वेळेवर द्यावी.
बागायती बीटी कपाशीसाठी १/३ नत्राची मात्रा (८७ किलो युरिया प्रती हेक्टरी ) उगवणीनंतर एक महिन्यांनी आणि उरलेली १/३ नत्राची मात्रा (८७ किलो युरिया प्रती हेक्टरी ) उगवणीनंतर दोन महिन्यांनी द्यावी. तर कोरडवाहू बीटी कपाशीस प्रती हेक्टरी १०० किलो युरिया पेरणीनंतर एक महिन्याने द्यावा. नत्रयुक्त वरखताची ही मात्रा जमिनीत पेरून द्यावी.
जमिनीत ओलावा असल्यास खतांची कार्यक्षमता वाढते. खत देताना ती झाडावर पडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. वरखते ओळीमधून किंवा रोपांभोवती टाकून जमिनीत चांगली मिसळावीत. ठिबक सिंचन असलेल्या शेतकरी पाण्यात विरघळणारी खते पिकाची अवस्था व गरजेनुसार अधिक वेळा विभागून खते देऊ शकतात.
(उदा. १९:१९:१९, १३:०:४५, ०:५२:३४ इ.) त्यामुळे खतांची कार्यक्षमता वाढेल. तुलनेने महाग असलेल्या रासायनिक खतांवर खर्चातही बचत शक्य होते. बीटी कपाशी पिकामध्ये खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे शिफारशीच्या १०० टक्के नत्र व पालाश पाच वेळा विभागून द्यावे. तर स्फुरद पेरणीसोबत जमिनीतून देण्याची विद्यापीठाची शिफारस आहे.
फवारणीद्वारे खतांचे नियोजन
बीटी / संकरित कपाशीस सुरवातीच्या काळात येणाऱ्या फुलांचे रूपांतर पात्यात व बोंडात होण्याचे प्रमाण जास्त असते. उत्तम उत्पादनासाठी व नंतर होणाऱ्या लाल पानाचे प्रमाण कमी करण्यासाठी जमिनीद्वारे मुख्य अन्नद्रव्यांसोबत दुय्यम तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणीसुद्धा आवश्यक असते. अन्नद्रव्यांची फवारणी करताना कीटकनाशकांचा वापर टाळावा.
कपाशीचे पीक फुलोरा अवस्थेत असताना कपाशीवर २ टक्के युरिया किंवा २ टक्के डीएपी (२०० ग्रॅम प्रती १० लिटर पाणी ) किंवा १९:१९:१९ (५० ग्रॅम प्रती १० लिटर पाणी) ४५ व ६५ व्या दिवशी फवारणी करावी.
फुलोरा अवस्थेत ००:५२:३४ (४ ग्रॅम प्रती १ लिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी.
फुलोरा अवस्था, पाते व बोंडे तयार होण्याच्या अवस्थेत १ टक्का पोटॅशिअम नायट्रेटची (१० ग्रॅम प्रती लिटर पाणी) फवारणी करावी.
उगवण पश्चात तणनाशकांचा वापर
कापूस हे जास्त कालावधीचे पीक आहे. मजुरांची कमी उपलब्धता आणि सततचा पाऊस यासारख्या कारणांमुळे खुरपणी व डवरणी सारखी आंतरमशागतीची कामे करणे शक्य नसल्यास तण नियंत्रणासाठी उगवण पश्चात तणनाशकांचा वापर करणे शक्य आहे.
उगवणपश्चात तणनाशकामध्ये उभ्या पिकात पीक ३०-४० दिवसाचे असताना रूंद पानांच्या तणांसाठी पायरीथिओबॅक सोडिअम (१०% ई.सी.) या तणनाशकाची ०.६२५ ते ०.७५० किलो प्रति हेक्टरी (१२.५ ते १५ मिलि प्रती १० लिटर पाणी) किंवा
तृणवर्गीय तणांचा जास्त प्रादुर्भाव असल्यास, क्विझालोफॉप इथाइल (५% ई.सी.) या तणनाशकाची १ लिटर प्रती हेक्टरी (२० मिलि प्रती १० लिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी.
वरील दोन्ही प्रकारच्या तणांचा बंदोबस्त करण्यासाठी पायरीथिओबॅक सोडिअम (६%) अधिक क्विझालोफोप इथाइल (४ % ई.सी.) या संयुक्त तणनाशकाची २० ते २५ मिलि प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात कपाशी पिकात फवारणी करावी.
टीप ः फक्त शिफारशी उगवणपश्चात तणनाशकांचा योग्य वेळी व योग्य प्रमाणातच वापर करावा. तणनाशक फवारणी साठी शक्यतो वेगळा पंप वापरावा. तणनाशकाचा वापर करताना वापरायचे नोझल, हेक्टरी द्रावण, तणनाशकाची मात्रा इत्यादी बाबतीत दक्षता बाळगावी.
विद्राव्य खतांची शिफारस
खतमात्रा पिकाची अवस्था (पेरणी नंतरचे दिवस)
शिफारशीच्या १० टक्के नत्र व पालाश पेरणीच्या वेळी
शिफारशीच्या २० टक्के नत्र व पालाश पेरणी नंतर २० दिवसांनी
शिफारशीच्या २५ टक्के नत्र व पालाश पेरणी नंतर ४० दिवसांनी
शिफारशीच्या २५ टक्के नत्र व पालाश पेरणी नंतर ६० दिवसांनी
शिफारशीच्या २० टक्के नत्र व पालाश पेरणी नंतर ८० दिवसांनी
- डॉ. संजय काकडे, ९८२२२३८७८०
कृषीविद्यावेत्ता, कापूस संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.