Cotton Crop Management : कपाशीतील वाढ नियंत्रण, पाते-बोंड गळ व्यवस्थापन

Cotton Growth control : प्रचलित पद्धतीने कापूस लागवड केल्यास एकरी झाडांची संख्या कमी राखली जाते. झाडांची कायिक वाढ अधिक होते. फलधारणा कमी होऊन त्याचा उत्पादनावर परिणाम होतो.
Crop Management
Crop ManagementAgrowon
Published on
Updated on

डॉ. राजेंद्र वाघ, नवनाथ मेढे, डॉ. अनंत इंगळे

Cotton Growth : प्रचलित पद्धतीने कापूस लागवड केल्यास एकरी झाडांची संख्या कमी राखली जाते. झाडांची कायिक वाढ अधिक होते. फलधारणा कमी होऊन त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. सघन पद्धतीत झाडांची संख्या अधिक वाढवून सरळ वाणांचा किंवा संकरित वाणांचा वापर करणे शक्य आहे. त्यातून कमी खर्च व कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेता येते. मात्र प्रचलित पद्धतीने लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वाढ नियंत्रित ठेवण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी वाढ रोधकांचा तसेच शेंडा खुडण्याचा प्रयोग केला जातो.

वाढरोधक रसायनांचा वापर :
बागायती लागवडीमध्ये पिकाची कायिक वाढ अवास्तव होऊन ओळीतील व झाडांतील अंतर झाडांच्या फांद्यानी पूर्णत: व्यापले जाते. अशा परिस्थितीमध्ये झाडाकडून अन्नद्रव्यांचा वापर कायिक वाढ होण्यासाठी होतो. अशा वेळी ही अवास्तव वाढ रोखण्यासाठी सायकोसील या रसायनाची ६० पी.पी.एम. (१.२ मि.लि. प्रति १० लिटर पाणी) या तीव्रतेची फवारणी पीक अडीच महिन्यांचे असताना करावी. यामुळे कायिक वाढ थांबते. अन्नद्रव्यांचा उपयोग फुले व बोंडे लागण्यासाठी होते. बोंडांचा आकार वाढतो. परिणामी, उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होते.

शेंडा खुडणे :
कापूस पिकाची सरळ होणारी वाढ थांबवून फळधारणा होण्यासाठी शेंडा खुडणे हा एक महत्त्वाचा उपयोग आहे.
कापूस पीक ७० ते ७५ दिवसांचे झाल्यानंतर किंवा ३.४ ते ४ फूट उंच झाल्यावर झाडाचा मुख्य शेंडा खुडावा. प्रत्येक झाडावर १२ ते १६ फळफांद्या राहतील, अशी काळजी घ्यावी.

पाते- बोंड गळ होण्याची कारणे :
कापूस पिकाचे पाते गळ व बोंड गळ या दोन्हींमुळे खूप मोठे नुकसान होते. त्यामुळे या नैसर्गिक विकृतींचे व्यवस्थापन करणे आवश्यक असते.
-विपरीत हवामान : जास्त किंवा कमी झालेला पाऊस किंवा तापमानामध्ये झालेला चढ-उतार यामुळे पाते व बोंड गळ होऊ शकते.
-वाढीच्या अवस्थेत अन्नद्रव्यांसाठी होणारी पिकाची स्पर्धा.
-किडींचा प्रादुर्भाव.
-शेतात पाणी साचून राहणे किंवा जमिनीतील ओलावा कमी होणे.
-सूर्यप्रकाशासाठी होणारी पिकाची स्पर्धा.

पाते- बोंड गळ रोखण्यासाठी उपाय :
-आपत्कालीन परिस्थितीत योग्य अन्नद्रव्ये व पाणी व्यवस्थापन करणे.
-जास्त पाऊस झाल्यास शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेणे.
-एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे.
-नॅप्थील ॲसेटिक ॲसिड (एन. ए.ए.) २० पी.पी.एम. प्रमाणात फवारणी करणे.
-वाढ नियंत्रण व शेंडा खुडणी करणे.
- डी.ए.पी. ची २ टक्के प्रमाणे फवारणी करणे.
- पिकात हवा व सूर्यप्रकाश मुबलक राहील असे व्यवस्थापन करणे.



Crop Management
Cotton Crop : पाते गळतीमुळे कापूस उत्पादक चिंतातूर

कापूस पिकातील ‘लाल्या’ विकृतीचे व्यवस्थापन

मागील १० ते १५ वर्षांपासून कपाशीची पाने लाल होण्याची मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. शेतकरी याला ‘लाल्या’ म्हणून ओळखतात. कपाशीमधील पाने लाल होणे हा बुरशी, जिवाणू किंवा विषाणूंमुळे होणारा रोग नसून ही वनस्पतीची विकृती आहे. यात पानाच्या कडा लाल होण्यास सुरुवात होते. पाने हळूहळू तांबूस होतात. लाल झालेली पाने वाळतात व गळून पडतात. या विकृतीचा प्रादुर्भाव अमेरिकन संकरित बी.टी. वाणावर जास्त दिसून येतो. ही विकृती संकरित वाण, जमीन, खतांच्या मात्रा आणि हवामान यांच्या विविध परिस्थितीमुळे आढळून येते. नत्राच्या कमतरतेमुळे हरित ग्रंथींचे विघटन होऊन त्या प्रथम पिवळ्या पडतात. नंतर लाल होतात. पाण्याचा ताण पडणे किंवा पाणी साचून राहणे, पानात नत्राचे प्रमाण १ टक्क्यापेक्षा कमी होणे आणि रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव इ. काही कारणेही पाने लाल होण्यामागे असू शकतात.

Crop Management
Crop Management : योग्य व्यवस्थापन केल्यास पिकाची वाढ होते

कपाशीची पाने लाल होण्याची कारणे :
भारतात १९०८ मध्ये ही विकृती सर्वप्रथम आढळली. पाने लाल होण्याची पुढील प्रमाणे अनेक कारणे असू शकतात. त्यातील नेमके आपल्या बागेत कोणते आहे, हे समजून घेतल्यास त्याचे व्यवस्थापन सोपे होईल.
१) जमिनीची निवड :
-कपाशीची लागवडीवेळी जमिनीची निवड योग्य प्रकारे केली पाहिजे. सध्या अनेक शेतकरी अधिक उत्पादनक्षम संकरित बी. टी. वाणांची लागवड हलक्या जमिनीमध्ये करतात. त्यात उपलब्ध अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पाने लाल झालेली दिसून येतात.
-पाणथळ व चिबड जमिनीमध्ये लागवड केल्यास अतिरिक्त पाण्यामुळे अन्नद्रव्य शोषणात अडथळा येतो. पाण्यासोबत नत्राचा निचरा झाल्यामुळे झाडांना नत्राचीही कमतरता भासते. परिणामी पाने लाल होतात.
-पाण्याच्या कमतरतेमुळेही मातीतून अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते. परिणामी, प्रकाश संश्‍लेषण कमी होते. पानातील अन्नद्रव्यांचे विघटन होऊन पाने लाल होतात व गळतात.

२) हवामान
जमिनीतील ओलाव्याची कमतरता व रात्रीचे वेळी तापमान (१५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी) यामुळे पानातील हरितद्रव्याचे विघटन होऊन अॅन्थोसायनीन (Anthocyanin) हे रंगद्रव्य तयार होते. त्यामुळे पानांना लाल रंग येतो.

३) अन्नद्रव्यांची कमतरता
-कापूस पिकामध्ये एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचा अवलंब न केल्यास, तसेच शिफारशीप्रमाणे खतांची मात्रा न दिल्यास अन्नद्रव्यांच्या
कमतरता निर्माण होता. त्यामुळे बोंडे लागणे व बोंडे फुटण्याच्या वेळी झाडाची पाने लाल होतात.
-जमिनीतील नत्राचे प्रमाण कमी झाल्यामुळे बोंडे लागणे व पक्व होण्याच्या काळात झाडाच्या खालच्या भागातील नत्राचे बोंडाकडे वहन होते. त्यामळे जुनी पाने पिवळसर होऊन नंतर वाळतात. मॅग्नेशिअम या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे पानांच्या शिरांमधील भाग लाल होतो.

४) रस शोषण करणाऱ्या किडींच्या प्रादुर्भावामुळे सुद्धा पाने लाल होतात. तुडतुडे किडीमुळे पानाच्या कडा लाल होण्यास सुरुवात होते. नंतर पूर्ण पाने लाल होतात. फुलकिडीमुळे पानाच्या खालच्या बाजू चमकदार होऊन पाने विटकरी रंगाची होतात.

‘लाल्या’ची मुख्य लक्षणे :
या विकृतीमुळे पाने लाल होऊन बऱ्याच वेळा शिरा हिरव्या राहतात. रसशोषक किडीच्या तीव्रतेनुसार पाने कमी किंवा अधिक लाल होतात. पुढे गळून पडतात.

लाल्या विकृतीचे व्यवस्थापन :
१) जमीन निवड व पीक फेरपालट
-चिबड व हलक्या जमिनीमध्ये कपाशीची लागवड करू नये.

-शिफारस केलेल्या वेळेतच कापसाची लागवड करावी.
-पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये.
-जमिनीस शक्यतोवर भेगा पडू देऊ नये. जमीन भुसभुशीत ठेवावी. पाण्याचा निचरा होईल याची दक्षता घ्यावी.
-कोरडवाहू परिस्थितीत संरक्षित पाणी द्यावे किंवा शक्य नसल्यास नियमित कोळपण्या कराव्यात.
-कापूस पीक घेण्यापूर्वी जमिनीमध्ये जास्त अन्नद्रव्ये शोषून घेणारी (उदा. मका, ऊस, केळी इ.) अशी पिके घेतलेली असल्यास अशा जमिनीमध्ये सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून येते.
-जमिनीचा सामू वाढल्यास या जमिनीमध्ये नत्र, सूक्ष्म अन्नद्रव्य यांचे शोषण कमी होते. त्यामुळे कापूस पीक घेण्यापूर्वी मूग, उडीद, ज्वारी, सोयबीन, बाजरी असे पिके घ्यावीत.
-कपाशीचा खोडवा घेऊ नये.

२) नत्र व अन्नद्रव्य व्यवस्थापन :
-कापूस पिकास एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचा अवलंब करावा. त्यासाठी शेणखत, सेंद्रिय खत, गांडूळ खत यांचा वापर करावा.
-नत्रयुक्त खतांच्या मात्रा विभागून द्याव्यात. पाते व बोंडे लागताना युरियाची किंवा डी ए पी खतांची २ टक्के या प्रमाणात फवारणी करावी.
-कपाशीमध्ये द्विदलवर्गीय पिकांचा अंतर्भाव करावा.
-मॅग्नेशिअम सल्फेट २५ किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीतून वापर करावा. पाते व बोंडे लागताना मॅग्नेशिअम सल्फेटची १ टक्क्याने फवारणी करावी.
-रस शोषणाऱ्या किडीपासून पिकाचे संरक्षण करावे.
-जमिनीत पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी मूलस्थानी जलसंधारण पद्धतीचा अवलंब करावा.

प्रा. नवनाथ मेढे (कृषी विद्यावेत्ता), ८९९९३०८३७३
डॉ. अनंत इंगळे (संशोधन सहयोगी), ९६८९६५३८५४
(कापूस सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com