Soybean Chana  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Chana : काबुली हरभऱ्यासह मेटांगळे झाले सोयाबीनमध्ये ‘मास्टर’

सन २००५ पासून शेती व मुख्य व्यवस्थापन राजाराम पाहतात. दैनंदिन जमाखर्चाचा ताळेबंद ठेवला जातो. दोन्ही बंधू व घरातील महिलावर्गाचे शेतीत योगदान आहे.

 गोपाल हागे

बुलडाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यातील मादणी (जि. बुलडाणा) येथील राजाराम मेटांगळे यांचा संयुक्त परिवार आहे. सर्वांत मोठे भुजंगराव, मधले राजाराम, लहान तेजराव अशा तीन भावांच्या कुटुंबात एकूण १३ सदस्य आहेत. राजाराम सुमारे १९८५ च्या काळातले कृषी पदविकाधारक आहेत.

त्यामुळे तांत्रिक ज्ञानाचा शेतीत उपयोग केला आहे. हंगामी पिकांमध्ये कुटुंबाने सातत्याने प्रयोगशीलता जपली. लागवड पद्धती, पट्टा पद्धत, वाण, सिंचन, आंतरपिके, बाजारपेठ ‘नेटवर्क’ यातून हंगामी पिकांत कुटुंबाने ‘मास्टरी’ मिळवली आहे.

शेती व्यवस्थापन

सन २००५ पासून शेती व मुख्य व्यवस्थापन राजाराम पाहतात. दैनंदिन जमाखर्चाचा ताळेबंद ठेवला जातो. दोन्ही बंधू व घरातील महिलावर्गाचे शेतीत योगदान आहे. गरजेवेळीच मजुरांची मदत घेतली जाते. वडिलोपार्जित २० एकर व १० एकर खरेदी केलेली अशी ३० एकर शेती आहे. हंगामी ओलितासाठी विहीर, बोअरवेल तसेच तीन किलोमीटरवरून मादणी प्रकल्पातून पाइपलाइन केली आहे. तुषार सिंचनाचे पाच संच असून सात एकरांत ठिबक व्यवस्था केली आहे.

सोयाबीनमध्ये हातखंडा

सोयाबीन पिकात राजाराम यांनी हातखंडा तयार केला आहे. यंदाचे प्रातिनिधिक उदाहरण द्यायचे तर १० एकरांत चार फुटी गादीवाफ्यावर सलग लागवड केली. त्यात एकरी १४ क्विंटल उत्पादन मिळाले. चौदा एकरांत ‘बीबीएफ’ तंत्राद्वारे सोयाबीन घेतले. एकरी ११ क्विंटल उत्पादन मिळाले.

दोन एकरांत सोयाबीन अधिक तूर (सहा ओळी सोयाबीन व एक ओळ तूर) तर चार एकरांत हळद अधिक सोयाबीन पीकपद्धती घेतली. एकूण ३० एकरांत ३२८ क्विंटल (एकरी १० ते ११ क्विंटल) सोयाबीन उत्पादन मिळाले. हळदीचे एकरी २२ ते २५ क्विंटल (सुकवलेली) उत्पादन मिळते. कांदा बीजोत्पादन, खरीप कांदा, गादीवाफ्यावर तूर, बटाटा, लसूण आदी प्रयोगही घेतले आहेत.

काबुली हरभरा पिकातील कौशल्य

जॉकी, विजय, गुलक (फुटाण्यासाठी) आदी हरभऱ्याचे वाण पूर्वी घ्यायचे. दहा वर्षांपूर्वी कृषी विभागाचे अधिकारी दिनेश लंबे, विठ्ठल धांडे यांच्या सल्ल्याने राजाराम काबुली (पांढऱ्या रंगाच्या) अर्थात डॉलर हरभऱ्याकडे वळले. आजतागायत त्यात सातत्य राखले आहे. पूर्वी एकरी आठ क्विंटल उत्पादन मिळायचे. पुढे पट्टा पद्धत, ठिबक

सिंचन, टोकण पद्धतीचा वापर सुरू केला. ठिबकमुळे चिबड रानात पाणी साठून राहण्याची समस्या तयार व्हायची. आता तुषार सिंचनाचा वापर होतो. पट्टा पद्धतीत सहा ओळींनंतर एक ओळ रिकामी अशी पद्धत होती. यंदा नऊ एकरांत ‘बीबीएफ’ पद्धतीने पाच ओळींनंतर अडीच फुटांचा पट्टा या पद्धतीने लागवड केली आहे.

शेतीतून मिळवले वैभव

तीन भावांच्या एकीतूनच कुटुंबाने शेतीतून प्रगती साधली आहे. कुठलाही निर्णय सर्व भाऊ एकत्रपणेच घेतात. सन २००५ पासून १० एकर शेती क्षेत्र वाढवले. सुंदर दुमजली घर बांधले. परिवारातील दोन मुलींची लग्ने केली. राजाराम यांचा मुलगा ‘बीएएमएस’ तर एका भावाची मुलगी ‘बीफार्म’आहे. अन्य मुलेही चांगल्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. शेतीकामांत बैलजोडीसह ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर आणि फवारणी यंत्र यांचा वापर होतो.

व्यवस्थापन बाबी

एकरी बियाणे गरज आता ३५ किलोपर्यंत. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत एकरी १५ किलो बियाणे बचत.

दरवर्षी प्रत्येक क्षेत्रात आलटून पालटून एकरी ४ ट्रॉली शेणखताचा वापर.

तुषार संचाद्वारे चार हप्त्यांत पाणी. पहिले- पेरणीपूर्व व मशागतीआधी, दुसरे पेरणीनंतर स्प्रिंकलरच्या साह्याने दोन तास. यामुळे बियाणे उगवणीला फायदा. तिसरे पाणी फूट सुरू होण्यापूर्वी व डवरणीनंतर फांद्या फुटण्याच्या अवस्थेत, तर चौथे पाणी ५० टक्के घाटे धरल्यानंतर.

अधिक उत्पादनासाठी शेंडे खुडणी व वाढ नियंत्रकाचा वापर. विसाव्या व ३५ व्या दिवशी खुडणी.

धुके येण्याची शक्यता असल्यास सकाळी शेकोटीद्वारे संपूर्ण शेतावर धूर केला जातो. सकाळी बुरशीनाशकाची फवारणी.

मजुरांच्या साह्याने कापणी. विशिष्ट चाळणीचा वापर करून ‘थ्रेशर’च्या मदतीने कमी ‘आरपीएम’वर मळणी.

विक्री व्यवस्थापन : काबुली वाणासाठी जळगावची बाजारपेठ प्रमुख आहे. बुलडाणा येथील व्यापाऱ्यांना विक्री होते. राजाराम यांनी मादणी व आरेगाव येथील ३५ ते ४० शेतकऱ्यांना एकत्र करून क्षेत्र १०० एकरांपर्यंत पोहोचवले आहे. त्यामुळे विक्रीचा शाश्‍वत पर्याय मिळतो. व्यापाऱ्यांना एकत्रितपणे चांगल्या दर्जाचा माल मिळतो.

उत्पादन व दर : सन २०१५ पासूनचा विचार केल्यास काबुली हरभऱ्याखालील सरासरी क्षेत्र दोन एकर, सहा, आठ, दहा एकर असे बदलत राहिले आहे. सन २०१८-१९ मध्ये गारपिटीत नुकसान झाले. प्रति क्विंटल ७०००, ७५०० रुपयांपासून ते ९ हजार, १० हजार रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. एकरी उत्पादन खर्च किमान २५ हजार रुपये येतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT