Book Agrowon
ॲग्रो विशेष

Book Review : स्त्रियांच्या वेदनांची ‘कूस’

Article by Dr. Randhir Shinde : ज्ञानेश्‍वर जाधवर याच्या अलीकडे प्रकाशित झालेल्या कूस कादंबरीमध्ये असंघटित मजुरांचे काळवंडलेले जग विस्तृतपणे मांडलेले आहे. या कादंबरीमध्ये त्रिदल स्वरूपाची सूत्रे आहेत.

Team Agrowon

डॉ. रणधीर शिंदे

Striyanchya Vednanchi Kus :

ज्ञानेश्‍वर जाधवर याच्या अलीकडे प्रकाशित झालेल्या कूस कादंबरीमध्ये असंघटित मजुरांचे काळवंडलेले जग विस्तृतपणे मांडलेले आहे. या कादंबरीमध्ये त्रिदल स्वरूपाची सूत्रे आहेत. फड, पिशवी आणि काजळी या त्रिमिती दर्शनातून अतिशय भयावह वाटावं, असं वास्तव मांडलेलं आहे. आणि ते एका स्त्रीची प्रातिनिधिक कहाणी न राहता, समाज आणि समूह केंद्रीची गोष्ट होते. विशेषतः कष्टकरी आणि वंचित परिघावरच्या स्त्रियांचे दुःख अतिशय बिकट आहे.

ते काळोखासारखं गडद आहे. त्यात मासिक पाळी हा विषय येतो. कादंबरीची नायिका सुरेखाचा सातत्याने रक्तस्राव होतो. त्यातून ती गर्भाशय काढण्यापर्यंत जाते. त्याचे चित्रण कादंबरीत आहे. त्यात तिचा जीवघेणा प्रवास आहे. अतिशय असाह्य यातनादायी, स्त्रियांच्या आरोग्याच्या आणि मानसिक जडण घडणीचे प्रश्‍न यात आलेले आहेत.

वंश सातत्य, की जो तथाकथित पुरुषांच्या चौकटीमधून स्त्रियांच्या वरती लादलेला विषय आहे. स्त्री ही गुलाम आहे, पितृत्वाचं ओझं वागवत ती जगत असते. तिच्या शरीरावर, मनावर, आणि वाढीवर देखील मालकी हक्क सांगणाऱ्या व्यवस्थेची विविध बाजूने मांडणी या कादंबरीत आली आहे.

ऊसतोड मजूर स्त्रीला मोळी बांधण्यासाठी एका मिनिटांत २० सेकंदाला चार वेळा ऊठबस करावी लागते. आणि तिची कंबर, वटीपोट यांची ज्या प्रकारची हालचाल होते ते यातनादायी आहे. त्याचा तिच्या शरीरावरती, अवयवांवरती, गर्भधारणेवरती काय परिणाम होतो, याचे अत्यंत अस्वस्थ करणारे चित्रण या कादंबरीमध्ये आहे.

मुलं होणं हेच जीवनाचं सार्थक मानलं जातं. एका बाजूला चौकटींचे, व्यवस्थांचे, संस्कृतीचे, परंपरांचे उद्दात्तीकरण करणारे जग आहे आणि दुसऱ्या बाजूला गर्भाची पिशवी काढून टाकण्याचा कित्ता गिरवला जातो. पिशवी का काढून टाकली जाते या पाठीमागचे सगळे कंगोरे लेखकाने कादंबरीमध्ये सविस्तर मांडलेले आहेत.

बाईपण डिस्कनेक्ट करण्याची जी वेदना आहे, ती सुरेखाच्या जगण्यामध्ये आलेली आहे. ती एका हतबल प्रसंगी गायीशी संवाद साधते, गायीशी बोलते. “गायी तुझ्या शेपटीमध्ये किंवा शरीरामध्ये ३३ कोटी देवता आहेत तर त्या देवतांना अशी विनंती कर, की पुढच्या जन्मी मला बाई सोडून कोणताही जन्म दे म्हणावं, पण बाईचा जन्म देऊ नये” हे भारतातल्या दुखऱ्या पितृसत्ताक शोषित वास्तवाचं एक चित्र फार गडदपणानं लेखकाने चितारलं आहे.

हे सगळं बाईच कथन आहे. त्यात घराचा, कोपीचा, फडाचा अवकाश आहे. बाई ज्या वेळेस बोलते तर त्या कथनाचा आवाका किती लांबतो आणि त्याचा पदर किती विस्तृत होत जातो, याची प्रचिती आणि जगण्यातले, सांगण्यातले, अस्तित्वातले बारकावे सुरेखाच्या निवेदनातून जाणवत राहतात.

या कादंबरीची शब्दकळा अस्सल आहे. उस्मानाबाद व बीड परिसरातली प्रादेशिक, स्थानिक बोली आहे. परिसरातले अनेक शब्द आणि रीतिरिवाज, त्यांची चिन्हं येथे भेटतात. उदा - कलवरी, गडांगण, कावदान, तळवट, ईर काढणं याची एक सिम्फनी इथं आहे, ज्याला समाजशास्त्रीयदृष्ट्या महत्त्व आहे.

या कादंबरीला शोध पत्रकारितेचा आणखी एक आयाम आहे. उत्तरार्धामध्ये एक तरुण पत्रकार या फडांवरती, कोपीवरती या समूहांमध्ये जातो, वेगवेगळ्या माणसांशी बोलून त्यांचे प्रश्‍न जाणून घेतो आणि टीव्हीवर त्यांना बोलतं करतो.

मराठी कादंबरी परंपरेमध्ये साखर कारखानदारीवर खूप कादंबऱ्या आल्या आहेत. परंतु त्या एक तर कारखान्यातल्या भ्रष्टाचाराचं चित्र मांडतात किंवा शेतमजुरांचे किंवा शेतमालकांचं चित्र मांडतात. पण या तळातल्या शोषित पिढीत शेवटच्या बाजूला जी बाई आहे, तिचं दुःख मराठी कादंबरीमध्ये आलेलं नव्हतं.

तर हे पिचलेलं, कष्टी असलेलं वेदनादायी जगणं कूस या कादंबरीत प्रकर्षाने मांडलेलं आहे. आणि म्हणून समस्याप्रधान, प्रश्‍नकेंद्री कादंबरी मांडणाऱ्या परंपरेमध्ये या कादंबरीने एक महत्त्वाची भर घातली आहे. लेखकाच्या सामाजिक जाणीवा तीव्र आहेत. ही कादंबरी वाचून झाल्यावर मन अस्वस्थ होऊन जातं. वाचकाच्या अंतःकरणापर्यंत या दुःखदायी प्रश्‍नांची आच पोहोचवणारी आणि सामाजिक भान देणारी ही कादंबरी आहे.

पुस्तकाचे नाव : कूस
लेखक : ज्ञानेश्‍वर जाधवर
प्रकाशक : रोहन प्रकाशन
पाने : २२७
किंमत : रु. ३६०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT