Mango Farm Management Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Management : खंडाळा येथील उमेश रहाटे यांचे आंबा नियोजन

Mango Production : रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद-खंडाळा येथील उमेश रहाटे यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००३ मध्ये वडिलोपार्जित हापूस आंबा व्यवसायाची धुरा सांभाळली. कृषी मधील ६ महिन्यांचा एक अभ्यासक्रम पूर्ण केला.

Team Agrowon

शेतकरी : उमेश संभाजी रहाटे

गाव : वाटद-खंडाळा, जि. रत्नागिरी

एकूण क्षेत्र : २५ एकर

हापूस आंबा लागवड : २५ एकर

Mango : रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद-खंडाळा येथील उमेश रहाटे यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००३ मध्ये वडिलोपार्जित हापूस आंबा व्यवसायाची धुरा सांभाळली. कृषी मधील ६ महिन्यांचा एक अभ्यासक्रम पूर्ण केला.

त्याचा फायदा त्यांना आंबा बागेच्या व्यवस्थापनामध्ये झाला. आंबा बागेचे व्यवस्थापन आणि विक्री व्यवसाय यांचे बाळकडू उमेश यांना घरातूनच मिळाले होते. मागील २० वर्षांपासून आंबा बागेचे उत्तम व्यवस्थापन करत दर्जेदार हापूस आंबा उत्पादन ते घेत आहेत.

बागेत अधिकतम सेंद्रिय आणि आवश्यकतेनुसार रासायनिक खतांचा वापर करत हापूसची गुणवत्ता राखण्यात त्यांना यश मिळाले आहे. उत्पादित दर्जेदार हापूस आंब्याला बाजारात दरही चांगले मिळतात.

मागील महिनाभरातील कामकाज

- साधारण १० मेच्या दरम्यान मुंबईतील वाशी बाजारात आंब्याची आवक वाढते. त्या काळात दरही कमी होतात. अशावेळी चांगला आंबा बाजूला काढून उर्वरित फळे कॅनिंगसाठी देण्यावर भर दिला जातो. त्यानुसार आंब्याची प्रतवारी करून कमी वजनाचे आणि थोड्या कमी प्रतीचे आंब्याची निवड केली जाते.

साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे चित्र पाहायला मिळते. या आंब्यास सरासरी २५ ते ३० रुपये प्रति किलो इतका दर मिळतो. या वर्षी हापूस आंब्याचे उत्पादन कमी मिळाले. फक्त ३० ते ४० टक्केच हापूस उत्पादन मिळाले. त्यामुळे कॅनिंगला ५० रुपये प्रति किलो इतका दर मिळाला आहे.

- चांगला दर्जेदार आंबा बाजूला काढून त्याची मागणीनुसार ग्राहकांना विक्री केली. साधारण पाच ते सात डझनाच्या पेटीला ५०० ते ६०० रुपये अधिक दर मिळतो. सध्या बाजारात १५००, १८०० आणि २००० रुपये असा दर मिळत आहे. पाऊस पडल्यानंतर कॅनिंगचा दर घसरतो, असे श्री. रहाटे यांनी सांगितले.

- दरवर्षी २५ एकरांतून सरासरी ३ हजार पेटी हापूस आंबा उत्पादन मिळते. या वर्षी वातावरणातील बदलांमुळे ४० टक्केच पेट्या आंबा उत्पादन मिळाल्या आहेत. सरासरी दर २००० रुपये पेटीला मिळतो.

मागील सहा महिन्यांचे नियोजन

- ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस थांबल्यानंतर बागेमध्ये कीटकनाशकांची पहिली फवारणी घेतली. त्यामुळे नवीन पालवीवरील कीटकांचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहण्यास मदत झाली.

- नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाडांना मोहर येण्यास सुरुवात होते. त्या वेळी कीटकनाशकांची दुसरी फवारणी घेतली. त्यानंतर पुढील १५ ते २० दिवसांनंतर सेटिंग होण्यास सुरुवात होते. साधारण कणी आकाराची फळे लागल्यावर बुरशीनाशके आणि कीटकनाशकांची तिसरी फवारणी घेतली जाते. तसेच झाडावरील सुकलेला मोहर काढून टाकण्यासाठी झाडे हलवली जातात.

- फळे करवंद किंवा सुपारीच्या आकाराएवढी झाल्यानंतर शिफारशीनुसार चौथी फवारणी घेतली जाते.

- जानेवारी महिन्यात फुलकिड्यांचा प्रादुर्भाव दिसण्यास सुरुवात होते. नियंत्रणासाठी आवश्यकतेनुसार रासायनिक फवारणीचे नियोजन केले जाते.

- त्यानंतर तुडतुडे आणि इतर किडींच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांची पाचवी फवारणी घेतली जाते. याच वेळी झाडांवर पिवळ्या रंगाच्या कैऱ्या पाडून टाकल्या जातात.

- अवकाळी पाऊस आणि वातावरण बदलानुसार कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी घेतली जाते.

फळ काढणी नियोजन

- मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तयार झालेली फळांच्या काढणीस सुरुवात होते. यंदा कमी उत्पादन असल्यामुळे झाडावरील फळांची विशेष काळजी घेतली. फळांना नैसर्गिकरीत्या आलेला रंग, आंब्याची गोलाई आणि देठाला पडलेला खड्डा ही परिपक्वतेची लक्षणे ओळखून काढणीस सुरुवात केली जाते.

- झाडांवर चढून झेल्याच्या साह्याने आंबा फळांची काढणी केली जाते. फळे काढणीनंतर लगेच सावलीत आणून ठेवली जातात. फळांना इजा होऊ नये म्हणून योग्य काळजी घेतली जाते.

- फळांची काढणी केल्यानंतर त्यांची प्रतवारी केली जाते. डागाळलेली आणि कीड-रोगग्रस्त फळे बाजूला काढली जातात. त्यानंतर इलेक्ट्रिक वजन काट्यावर फळांचे वजन केले जाते. साधारण २०० ते २३० ग्रॅम वजनाचे फळ ७ डझन, २३० ते २७० ग्रॅमचे फळ ६ डझन आणि २७० ते ३०० ग्रॅम वजनाचे फळ ५ डझनांच्या पेटीत भरले जाते.

- आंबा विक्रीसाठी पाठवण्यासाठी लाकडी पेट्यांचा वापर केला जातो. पेटीत गवताचा पेंढा भरून त्यात आंबे भरले जातात. जेणेकरून वाहतुकीमध्ये फळांना इजा होणार नाही. तसेच बाजारात आंबा जाईपर्यंत नैसर्गिकरीत्या पिकतो. सध्या लाकडी पेट्यांना पर्याय म्हणून प्लॅस्टिकचे पोर्टेबल खोके वापरले जात आहेत.

आगामी नियोजन

- जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर झाडांवरील अतिरिक्त फांद्यांची छाटणी केली जाईल. बागेतील पालापाचोळा गोळा करून झाडाच्या बुंध्यात रचला जाईल.

- साधारण २० जूननंतर झाडाजवळ ६ इंच रुंद आणि ६ इंच खोल खड्डा तयार केला जाईल. त्यात सेंद्रिय खतांचे मिश्रण प्रति झाड ८ ते १० किलो प्रमाणे टाकले जाईल.

- सेंद्रिय खतामुळे जमिनीची पोत सुधारण्यास मदत होते. तसेच झाडांना येणारी पालवी हिरवीगार राहते, झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

- त्यानंतर झाडांना बोरॉन, कॅल्शिअम नायट्रेट या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा प्रति झाड दीड ते २ किलो प्रमाणे दिले जाईल.

- खतमात्रा दिल्यानंतर चर बुजवून टाळमाती केली जाईल.

- साधारण ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात बागेत वाढलेले तण कापले जाते. बागेची साफसफाई केली जाईल.

संपर्क - उमेश रहाटे, ८८८८० ९६९११, (शब्दांकन - राजेश कळंबटे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT