Hapus Mango : देवगडच्या नासीर सोलकरांनी दिली हापूस आंब्याला राम्बुतानची साथ

Success Story : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मणचे (ता. देवगड) येथील नासीर जैनुद्दीन सोलकर यांनी हापूस आंब्याच्या जोडीला सात वर्षांपूर्वी परदेशी राम्बुतान फळाचा प्रयोग दोन एकरांत केला. तीन वर्षांपासून कष्ट आणि प्रयोगाला गोड फळे मिळू लागली आहेत.
Rambutan
RambutanAgrowon

Mango Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळेरे- विजयदुर्ग मार्गावर मणचे (ता. देवगड) गाव आहे. देवगड तालुका हा देवगड हापूस आंब्यासाठी जगप्रसिद्ध आहे. मणचे गावातही हापूस आंब्याची मोठी लागवड आहे. विजयदुर्ग मार्गावरून जाताना रस्त्याकडेला हापूसच्या बागाच दिसून येतात.

गावात नासीर सोलकर कुटुंबासमवेत राहतात. मुंबई येथे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर घरच्यांच्या आग्रहाखातर ते मुंबईत खासगी कंपनीत बॅंकिंग क्षेत्रात नोकरीला लागले. गावी वडिलोपार्जित १०० ते १२५ हापूस आंब्याची झाडे होती.

लहानपणापासून बागायतीची आवड असल्याने मुंबईत असूनही सगळे लक्ष गावाकडेच होते. काही वर्षे नोकरीचा अनुभव झाल्यानंतर मात्र गावी शेतीच करावे असे सोलकर यांना वाटू लागले.

अखेर नोकरीत साठविलेल्या पुंजीतून गावानजीक गोवळ गावात २०१२ मध्ये तीन एकर व २०१४ मध्ये गावातच १० एकर जमीन खरेदी केली. गोवळ येथील जमिनीत हापूसच्या १७५ कलमांची लागवड केली. त्यानंतर पंधरा दिवसांतून किंवा महिनाभरातून फेरी गावी होऊ लागली. अखेर २०१५ मध्ये मुंबई सोडण्याचा निर्णय घेत सोलकर यांनी गावचा रस्ता धरला.

Rambutan
Mango Rate : शेतकऱ्यांकडून हापूस म्हणून कर्नाटकी आंब्यांची विक्री

राम्बुतान फळाचा शोध

हापूस लागवडीतून उत्पादन सुरू होण्यास विलंब असल्याने शेळीपालन सुरू करण्याचा निर्णय घेतला. विविध ठिकाणच्या ‘गोटफार्म’ना भेटी देऊन अभ्यास करीत व्यवसायास प्रारंभ केला. पुढे हापूस आंब्याच्या शेतीतही अनुभव तयार होऊ लागला. आजमितीला शेतीचा नऊ वर्षांचा अनुभव तयार झाला आहे.

तीन एकरांत वडिलोपार्जित आंबा लागवड, तर तीन एकरांत नव्याने हापूस लागवड केली आहे. उत्पादन व बाजारपेठ यात स्थैर्य आल्यानंतर कोकणात फारशी लागवड न होणाऱ्या मात्र बाजारपेठ देण्याची क्षमता असलेल्या फळाचा प्रयोग करावा, असे सोलकर यांना वाटू लागले.

परदेशी फळांची इंटरनेटवरून माहिती घेत असताना राम्बुतान फळापर्यंत हा शोध संपला. त्याची लागवड महाराष्ट्रात कुठे आहे याची माहिती घेतली. केरळमध्ये रोपवाटिका असल्याचा व्हिडिओ पाहण्यात आला. या फळाची चव, रंग, मागणी, दर यांची माहिती घेण्यासाठी मुंबई बाजार समितीतून फळे खरेदी केली. व्यापाऱ्यांशी चर्चा केली. मग मित्राला घेऊन कांजिरापल्ली (केरळ) गाठली. तेथे चार दिवस वास्तव्य करून बागांची पाहणी करून सोलकर मणचेत परतले.

लागवडीचे नियोजन

केरळवरून राम्बुतानची १९० रोपे प्रति नग ३५० रुपये दराने आणली. मँगोस्टीनची १० रोपेही सोबत आणली. केरळ ते मणचे गाडीभाडे २५ हजार रुपये द्यावे लागले. पेंढरी येथील जमिनीत ऑगस्ट २०१६ मध्ये लागवड केली. लांबच्या प्रवासामुळे काही रोपांचे नुकसान झाले.

परंतु उर्वरित १४० रोपे चांगल्या स्थितीत राहिली. चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन सुरू केले. पण मनात सारखे प्रश्‍न उपस्थित व्हायचे. राम्बुतान फळ आपल्या मातीत रुजेल का? उत्पादन आले नाही तर काय करायचे? मनातील संभ्रम कमी करण्यासाठी राम्बुतानच्या दोन झाडांमध्ये काजूचे एक झाड लावायचा निर्णय घेतला.

जूनमध्ये त्याची रोपे लावली. परंतु त्याच वर्षी (तिसऱ्या वर्षी) राम्बुतानला नोव्हेंबरमध्ये मोहोर आला, फळधारणा झाली. सोलकर यांचे प्रयत्न सत्यात उतरले. आनंद द्विगुणित झाला.

राम्बुतानचे व्यवस्थापन

-राम्बुतानची २० बाय २० फूट अंतरावर लागवड. शेणखत, सेंद्रिय खतांचा भरपूर वापर.

-प्रति झाडाला प्रति दिन सरासरी २० ते २५ लिटर पाण्याची गरज. त्यासाठी ठिबक सिंचन.

-वर्षातून दोनदा बागेची साफसफाई. रासायनिक खते व कीडनाशके यांचा फारसा वापर नाही.

-नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये मोहोर येण्यास, तर मेपासून फळे पक्व होण्यास सुरुवात... हंगाम ऑगस्टपर्यंत चालतो.

-सुरुवातीला फळ हिरवे दिसते. पक्व होण्यास सुरुवात झाल्यानंतर सफेद-पिवळसर आणि त्यानंतर पिकलेल्या फळांचा रंग गुलाबी, लालसर होतो.

-पिकल्यानंतर फळ झाडावर २० दिवसांपर्यंत, तर काढणी केल्यानंतर दहा दिवस टिकून राहते.

उत्पादन आणि विक्री

लागवडीपासून तीन ते चार वर्षांनी मोजक्या झाडांना फळधारणा झाली. काही फळे मित्रमंडळींना चाखायला दिली. अलीकडील वर्षांत ४५० किलो ते ६५० किलोपर्यंत एकूण उत्पादन मिळाले आहे. पहिल्या वर्षी (२०२०) एकूण क्षेत्रातून ७५ हजार रुपये, तर मागील वर्षी ९५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले.

यंदाचा हंगाम मेच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झाला. आतापर्यंत १२५ किलो फळांची विक्री झाली आहे. थेट विक्रीवर अधिक भर असतो. त्यास ३०० ते ३५० रुपये दर मिळतो.

सावंतवाडी, गोवा, कुडाळ या स्थानिक बाजारपेठांमध्ये घाऊक विक्रीला २५० रुपये दर मिळतो. आंबा बागेतून वर्षाला सात ते आठ लाखांची उलाढाल होते. त्याचीही थेट तसेच वाशी मार्केटमध्ये विक्री होते.

Rambutan
Mango Research Center : राष्ट्रीय संशोधन केंद्राची शाखा रत्नागिरीमध्ये व्हावी

राम्बुतान फळाविषयी

-मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया आदी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

-मलेशियातील मलाई भाषेत केसांना राम्बुत असे म्हटले जाते. या फळांवर केसांसारखे आवरण असल्यामुळे त्याला राम्बुतान नाव पडले असल्याचे उल्लेख.

-फळ लिची फळाप्रमाणे रसाळ, पांढरे. आतील गर गोड. फळाची बीही खाल्ली जाते. त्याची चव काहीशी बदामाप्रमाणे असते.

संपर्क - नासीर जैनुद्दीन सोलकर, ९३५९८३५१५१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com